भारतीय चित्रसृष्टीच्या विकासात महाराष्ट्राचा फार मोठा वाटा आहे. दादासाहेब फाळके आणि बाबूराव पेंटर यांनी सुरू केलेले हे कार्य समर्थपणे पुढे नेणाऱ्या काही महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये ‘व्ही शांताराम’ यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ‘चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून समाजप्रबोधन साधणे हीदेखील आपली नैतिक जबाबदारी आहे’ हा  विचार शांतारामांनी चित्रसृष्टीला दिला. ‘अद्ययावत तंत्रांचा उपयोग’ आणि ‘आपली प्रतीकात्मक दिग्दर्शन शैली’ याने व्ही शांताराम यांनी भारतीय चित्रसृष्टीवर आपला ठसा उमटवला. चित्रसृष्टीतील आपल्या कारकिर्दीत त्यांनी ७० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली, ४४ चित्रपटांचे दिग्दर्शन केले, तर २१ चित्रपटांत अभिनय केला. 

जडणघडण 

१९०१ ते १९२९

भारतीय चित्रपट व्यवसायाच्या प्रारंभीच्या काळातील ‘चित्रसृष्टीचे शिल्पकार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्ही शांताराम यांचे मूळ नाव शांताराम वणकुद्रे आहे. शांतारामांचा जन्म राजाराम वणकुद्रे आणि कमलाबाई यांच्या पोटी १८ नोव्हेंबर १९०१ रोजी कोल्हापूर येथे झाला. कोल्हापूरच्या समृद्ध आणि सांस्कृतिक वातावरणात शांतारामांच्या कलात्मक मनाची घडण झाली. घरच्या  सामान्य आर्थिक परिस्थितीने त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव आणि आयुष्यात यशस्वी होण्याची प्रेरणा जागृत झाली. लहान वयातच शांतारामांच्या आग्रहाखातर वडिलांनी शांतारामांना ‘गंधर्व नाटक मंडळी’मध्ये पाठवले. अभिनय, नृत्य आणि संगीताशी शांतारामांची प्राथमिक ओळख येथेच झाली. चित्रसृष्टीतील त्यांच्या भावी प्रवासाची जणू ती पायाभरणी होती!

शांतारामांनी १९२० मध्ये ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’मध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला खरे वळण मिळाले. प्रसिद्ध चित्रकार आणि आद्य चित्रपट निर्माते बाबूराव पेंटर यांनी ही संस्था कोल्हापूरमध्ये स्थापन केली होती. शांतारामांचे मावस भाऊ बाबूराव पेंढारकर यांनी त्यांना ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त आणले. बाबूराव पेंटर यांच्याकडून त्यांना पटकथा, नेपथ्य, अभिनय, संकलन अशा चित्रपटनिर्मितीच्या विविध पैलूंचे शिक्षण मिळाले. शांतारामांनी अभिनय केलेला ‘सुरेखा हरण’ हा पहिला चित्रपट ठरला! चित्रपटात विष्णू आणि कृष्णाच्या प्रमुख भूमिका शांतारामांनी  निभावल्या. त्यानंतर १९२८ मध्ये ‘नेताजी पालकर’ या चित्रपटाचे त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शन केले.

  

शांताराम : गंधर्व नाटक मंडळी 

प्रभात फिल्म कंपनी 

  

प्रभातचे भागीदार, बाबुराव पेंटर यांच्या समवेत 

१९२९ ते १९४२

कालांतराने विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, केशवराव धायबर आणि शांताराम हे ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’तून बाहेर पडले. सीताराम कुलकर्णी यांच्या आर्थिक सहाय्याने पाच भागीदारांनी १९२९ मध्ये ‘प्रभात फिल्म कंपनी’ची स्थापना केली. पाचही भागीदारांत शांताराम सर्वांत लहान होते. सर्वप्रथम कंपनीचा ‘लोगो’ तयार झाला. ‘पहाटेच्या  मंगलसमयी पूर्व दिशा तेजःपुंज होऊ लागली आहे. समोर एक नवयुवती आपल्या हातातील तुतारी फुंकून सूर्याच्या आगमनाची ललकारी देत आहे’ प्रभातने तयार केलेला हा लोगो चित्रसृष्टीत अजरामर झाला. 

‘प्रभात’ने १९२९ ते १९३१ या काळात सहा मूकपट तयार केले. ‘अयोध्येचा राजा’ हा ‘प्रभात’चा पहिला बोलपट १९३२ मध्ये प्रदर्शित झाला. शांतारामांनी यासाठी ‘ऑडिओ-कॅमेक्स’ तंत्राचा अवलंब केला. या आधीच्या बोलपटात चित्रण आणि ध्वनी-मुद्रण एकाच फितीवर रेकॉर्ड केले जात असे. परंतु ‘ऑडिओ-कॅमेक्स’ पद्धतीत चित्रण आणि ध्वनी यांचे वेगवेगळे रेकॉर्डिंग करून ते एकत्र प्रदर्शित होत असे. चित्रपटाच्या संकलनासाठी ते अतिशय उपयुक्त होते. ‘अयोध्येचा राजा’ हा भारतातील पहिला ऑडिओ-कॅमेक्स चित्रपट आणि मराठीतील पहिला बोलपट ठरला. त्यानंतर १९३३ मध्ये ‘प्रभात’ने ‘सैरंध्री’ हा भारतातील पहिला रंगीत चित्रपट तयार केला. चित्रपटाचे प्रिंटिंग जर्मनीमध्ये करण्यात आले. ‘सैरंध्री’ला आर्थिकदृष्ट्या फार मोठे यश मिळाले नसले; तरी चित्रपटसृष्टीत, हा चित्रपट एक महत्त्वाचा टप्पा मनाला जातो. ‘प्रभात’ने १९३६ मध्ये ‘अमर ज्योती’ हा चित्रपट प्रदर्शित केला. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला.   १९२९ ते १९४२ ही शांतारामांची ‘प्रभात’मधील कारकीर्द; या काळात ‘अमृतमंथन’, ‘संत तुकाराम’, ‘कुंकू’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘शेजारी’ इत्यादी  २९ चित्रपट निर्माण करण्यात आले. त्यापैकी १७ चित्रपट शांतारामांनी दिग्दर्शित केले आहेत. चित्रपटांतून समाजप्रबोधनाचे कार्य व्हावे, हा शांतारामांचा प्रयत्न असे. आपल्या चित्रपटांतून प्रेक्षकांना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘प्रभात’च्या ‘धर्मात्मा’ या चित्रपटात अस्पृश्यतेवर तर ‘अमर ज्योती’ मध्ये समाजातील पुरुषप्रधान संस्कृतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. ‘कुंकू’ चित्रपटात जरठ विवाहाच्या विरोधात आवाज उठवला, तर ‘माणूस’मध्ये वेश्याव्यवसायात पडलेल्या स्त्रियांची व्यथा मांडली. 

राजकमल कलामंदिर

१९४२-१९९०

अंतर्गत मतभेदांमुळे शांतारामांनी १९४२ मध्ये प्रभात कंपनी सोडली आणि स्वतःची ‘राजकमल कलामंदिर’ ही चित्रपट कंपनी सुरू केली. ‘राजकमल’ने निर्माण केलेला ‘शकुंतला’ हा पहिलाच चित्रपट खूप गाजला. १९४२ ते १९७० या २८ वर्षांत ‘डॉ कोटनीस की अमर कहानी’, ‘दहेज’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गीत गाया पत्थरोंने’ इत्यादी २९ चित्रपट ‘राजकमल’ने प्रदर्शित केले. यापैकी १९ चित्रपटांचे दिग्दर्शन शांतारामांनी केले होते आणि ४ चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांनी केलेली डॉक्टर कोटणीस यांची भूमिका प्रचंड गाजली. १९७० ते १९८३ या १३ वर्षांत; वयाच्या सत्तरीनंतरदेखील शांतारामांनी ९ चित्रपट निर्माण केले. त्यापैकी चार चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी स्वतः केले. ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’, ‘पिंजरा’ यासारखे अजरामर चित्रपट त्यांनी या काळात केले. ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ या चित्रपटातील गाणी ‘स्टिरिओ रेकॉर्डिंग’ पद्धतीने ध्वनिमुद्रित करण्यात आली.  स्टिरिओ रेकॉर्डिंग केलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला.

‘राजकमल’मध्येदेखील शांतारामांनी अनेक सामाजिक चित्रपट काढले. ‘जीवन यात्रा’मध्ये श्रमजीवी वर्गाच्या शोषणाविरुद्ध लढा चित्रित केला, तर ‘दहेज’ मध्ये हुंडा पद्धतीच्या विरोधात आवाज उठवला. ‘अपना देश’ आणि ‘तीन बत्ती चार रास्ता’ मध्ये भाषावार प्रांतरचनेचे दुष्परिणाम आणि हिंदी राष्ट्रभाषा व्हावी म्हणून प्रचार केला. ‘दो आँखे बारह हाथ’ मध्ये गुन्हेगारांच्या सुधारणेचा विषय लोकांसमोर मांडला.  शांतारामांची सांकेतिक दिग्दर्शन शैली ‘शांताराम टच’ म्हणून प्रसिद्ध होती. प्रभातचे ‘माणूस’, ‘पडोसी’, तर राजकमलचे ‘दो आँखे बारह हाथ’, ‘पिंजरा’ या चित्रपटातील त्यांचे ‘सांकेतिक दिग्दर्शन’ अजरामर झाले. 

  

राजकमल कलामंदिरची स्थापना 

उत्तरकाळ

  

व्ही शांताराम, यशाच्या शिखरावर 

१९४२-१९९०

ध्येयाने झपाटलेल्या शांतारामांनी व्यवसाय आणि संसार याचा समतोल राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शांतारामांनी आपल्या आई-वडिलांवर अतोनात प्रेम केले आणि त्यांच्या उतारवयात त्यांना सुख देण्याचा प्रयत्न केला. शांतारामांनी तीन विवाह केले. प्रथम पत्नी विमलाबाई यांच्यापोटी त्यांना १ मुलगा आणि ३ मुली झाल्या. द्वितीय पत्नी जयश्रीबाई यांच्यापोटी १ मुलगा आणि २ मुली झाल्या. १५ वर्षांच्या संसारानंतर दोघांचा घटस्फोट झाला. शांतारामांचा तिसरा विवाह विजया देशमुख उर्फ संध्या यांच्याशी झाला. शांतारामांनी सर्व मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे संसार मार्गी लावले. २८ ऑक्टोबर १९९० रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 

चित्रपट निर्मितीत लागणारे नेतृत्वगुण शांतारामांमध्ये होते. चित्रपट निर्मितीचे कार्य एकट्या निर्मात्याच्या किंवा दिग्दर्शकाच्या बुद्धीवर आणि कर्तृत्वावर अवलंबून नसते, तर निर्मितीत लागणाऱ्या इतर सहकाऱ्यांचा त्यात तेवढाच सहभाग असतो हे ते जाणत होते. सर्वसामान्य जनतेला चित्रपटाद्वारे काय दिले पाहिजे आणि कसे दिले पाहिजे याचे गणित त्यांना चांगले कळले होते. चित्रपट निर्मितीकडे कलेबरोबरच व्यवसाय म्हणून पाहण्याचे कौशल्य त्यांना अवगत होते. सर्वांकडून सल्ला घेऊन अखेर आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून योग्य तो निर्णय घेण्याची कला त्यांना अवगत होती. एकदा घेतलेला निर्णय तडीस नेण्याची धडाडी त्यांच्यात होती. हे त्यांचे गुणविशेष त्यांच्या यशाला कारणीभूत होते.

चित्रपट क्षेत्रातील शांतारामांच्या कार्याचे सरकार आणि जनतेने भरभरून कौतुक केले. १९५५ मध्ये मुंबईमध्ये शिवाजी पार्क येथे झालेल्या सत्कारात आचार्य प्र के अत्रे यांनी शांतारामांना ‘चित्रपती’ असा किताब देऊन सन्मानित केले.  तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांनी १९७१ मध्ये मद्रासमध्ये (आताचे चेन्नई) शांतारामांचा सत्कार केला. १९८० मध्ये नागपूर विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा बहुमान केला. १९८६ मध्ये ‘दादासाहेब फाळके अवॉर्ड’ हा चित्रसृष्टीतील सर्वोच्च बहुमान शांतारामांना मिळाला. शांतारामांच्या मृत्यूनंतर १९९२ मध्ये शांतारामांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला.