व्ही शांताराम : १९५७ - १९९०
१४. यशस्वी अर्धशतक
‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटाच्या यशाने शांतारामांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. शांताराम आता ५७ वर्षांचे झाले होते. यशाच्या शिखरावर असतानाच आता शांतारामांनी निवृत्त व्हावे असे त्यांच्या काही सल्लागारांनी सुचवले. परंतु अजूनही अनेक उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट देण्याचा आत्मविश्वास शांतारामांमध्ये होता. शांतारामांची सिनेसृष्टीतील वाटचाल चालूच राहिली.
‘दो आँखें बारह हाथ’
ग दि माडगूळकर यांच्याबरोबर चर्चा करत असताना माडगूळकरांनी शांतारामांना एक किस्सा सांगितला. औंध संस्थानाच्या राजांनी एका आयरिश मनोवैज्ञानिकाच्या साहाय्याने गावापासून दूर असा ‘खुला तुरुंग’ निर्माण केला होता. त्या तुरुंगात कट्टर गुन्हेगारांना सुधारण्याचा प्रयोग ते करीत होते. त्या तुरुंगाच्या परिसरात दुधाचा रतीब घालणाऱ्या एका गवळणीचा प्रवेश झाला आणि त्यामुळे त्या तुरुंगाच्या दुनियेत चांगलीच खळबळ उडाली. हा किस्सा ऐकून या कथानकावर चित्रपट काढण्याची कल्पना शांतारामांना सुचली. त्यांनी माडगूळकरांना कथा आणि संवाद लिहिण्यास सांगितले. चित्रपटाची गीते भरत व्यास यांनी लिहिली तर संगीताची जबाबदारी वसंत देसाई यांच्यावर सोपवण्यात आली.
चित्रपटात सर्व कैदी एक प्रार्थना म्हणतात असे दृश्य होते. ही प्रार्थना कोण्या एका धर्माची नसून मानवतावादाची प्रेरक असावी असे शांतारामांनी गीतकार भरत व्यास यांना सुचवले. त्यावर भरत व्यासांनी ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ हे काव्य लिहिले. काव्य ऐकताच हे अजरामर होणार हे भाकित शांतारामांनी केले. नायकाची भूमिका स्वतः शांतारामांनी केली. इतर प्रमुख भूमिका संध्या, बाबूराव पेंढारकर, केशवराव दाते यांनी केल्या. शांतारामांनी चित्रपटात अनेक सांकेतिक दृश्ये घालून दिग्दर्शनाला वेगळी झालर आणली. नायक आणि नायिका यांच्यात कोणतेही प्रणय दृश्य नव्हते, तरी त्या दोघांमधील प्रेम अतिशय खुबीने शांतारामांनी दर्शवले.
‘दो आँखें बारह हाथ’ मुंबईमध्ये २७ सप्टेंबर १९५७ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला. पत्रकारांनी आणि समीक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला. सतत ६५ आठवडे हा चित्रपट ऑपेरा हाऊस, मुंबई येथे चालला. चित्रपटावर बक्षिसांचा वर्षाव झाला.
सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट, हिंदी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी रौप्यपदक, सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शक अशी सरकारी पारितोषिके चित्रपटाला मिळाली. पारितोषिक वितरण समारंभात चित्रपटाला मिळालेल्या पारितोषिकांची यादी पाहून अध्यक्षपदी असलेले पंतप्रधान नेहरू यांनीदेखील शांतारामांचे विशेष कौतुक केले. 'ऑल इंडिया क्रिटिक्स अवॉर्ड' यांचे वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट ध्वनिलेखन, उत्कृष्ट संकलन ही पारितोषिके मिळाली. ‘फिल्म क्रिटिक्स (मुंबई) अवॉर्ड’ तर्फे उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, ध्वनिलेखन आणि संकलन ही पारितोषिके मिळाली.
'गोल्डन बेअर'च्या बर्लिन येथील ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये चित्रपटाला पारितोषिक जाहीर झाले. ‘कॅथॉलिक फिल्म ब्यूरो’ (ब्रसेल्स) तर्फे ‘फॉरिन क्रिटिक्स अवॉर्ड’ मिळाले. त्याचबरोबर ‘सॅम्युअल गोल्डविन अवॉर्ड’, ‘हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन अवॉर्ड’ इत्यादी अवॉर्ड्स मिळाली. अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी असलेले १९५८ चे पारितोषिक 'दो आँखे बारह हाथ' ला मिळाले. हे पारितोषिक घ्यायला शांताराम स्वतः अमेरिकेला जाऊन आले. संध्यादेखील त्यांच्याबरोबर होत्या. स्टेजवरून त्यांनी संध्या यांची ओळख प्रेक्षकांना करून दिली. ‘बॉस्टन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये 'दो आँखे बारह हाथ'ला उत्कृष्ट पटकथा, अभिनय, संगीत, ध्वनिलेखन आणि बाह्यचित्रीकरण याबद्दल पारितोषिक मिळाले.
प्रभातकुमार यांनी १९५८ मध्ये दिग्दर्शित केलेला ‘मौंसी’ हा हिंदी चित्रपट 'राजकमल'ने लोकांसमोर आणला. याला वसंत देसाई यांनी संगीत दिले होते. यात सुमती गुप्ते, वंदना, रमेश देव, केशवराव दाते यांच्या प्रमुख भूमिका होत्या. परंतु हा चित्रपट लोकांना फारसा आवडला नाही.
‘नवरंग’
शांतारामांना १९५७ मध्ये डोळ्याचा आजार झाला. आजारातून बाहेर पडल्यावर शांतारामांनी ‘नवरंग’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढली तेव्हा संध्या यांनी घर अनेक रंगांनी सजवले होते. पट्टी काढल्यावर दिसलेले ते रंग पाहून शांतारामांना नवरंग या चित्रपटाची कल्पना सुचली. चित्रपटात संगीत आणि नृत्य याला अतिशय महत्त्व होते. चित्रपटातील गीते भरत व्यास यांनी लिहिली, तर संगीत सी. रामचंद्र यांनी दिले. चित्रपटात प्रमुख भूमिका महिपाल आणि संध्या यांनी केल्या. याशिवाय केशवराव दाते, बाबूराव पेंढारकर यांनीदेखील चित्रपटात अभिनय केला. चित्रपट ९ ऑक्टोबर १९५९ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट अतिशय गाजला. आर्थिकदृष्ट्यादेखील चित्रपट यशस्वी ठरला. अहमदाबादमध्ये चित्रपट ५४ आठवडे चालला. “आधा है चंद्रमा, रात आधी”, “अरे जा रे हट नटखट” ही गाणी तुफान चालली. भरत व्यास आणि सी. रामचंद्र यांची जोडी प्रसिद्ध झाली. 'नवरंग'ला मिळालेल्या अनेक पारितोषिकांपैकी ‘फिल्म फेअर अवॉर्ड्स’ची उत्कृष्ट संकलन आणि ध्वनिलेखनाची पारितोषिके होती.
‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटाच्यावेळी संध्या यांनी नृत्याचा खूप अभ्यास केला होता. नृत्य ही त्यांची अतिशय आवडती कला होती. नवरंगचे नृत्यदिग्दर्शन त्यांनी स्वतःच केले. चित्रपट पूर्ण झाल्यावर नामनिर्देशन करण्याची वेळ आली तेव्हा नृत्य दिग्दर्शक म्हणून आपले नाव देऊ नये असे त्यांनी सुचवले. बराच आग्रह केल्यानंतर ‘शाम’ हे टोपण नाव द्यावे असे त्यांनी सुचवले. हे नाव का दिले यावर संध्या यांचे उत्तर ऐकून शांताराम भारावून गेले,
“हे माझ्या गुरुचे नाव आहे. शांताराम हे माझे गुरु आहेत. त्यांच्या नावातले पहिले आणि शेवटचे अक्षर घेऊन ‘शाम’ झाले.”
गमतीचा भाग म्हणजे ‘फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन’ने १९५९ चे उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचे पारितोषिक नवरंगच्या ‘शाम’ला दिले. पारितोषिक घेण्यासाठी संध्या यांनी ‘शाम’तर्फे शांतारामांच्या सेक्रेटरीला समारंभाला पाठवले.
दशकाची वाटचाल
शांतारामांनी १९६१ ते १९७० या दशकात सात चित्रपट काढले. एखाद-दोन चित्रपट सोडले तर सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली.
त्यांनी १९६१ मध्ये ‘स्त्री’ हा शकुंतला आणि दुष्यंत यांच्या कथेवर आधारित चित्रपट काढला. संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र होते, तर प्रमुख भूमिका शांताराम आणि संध्या यांनी केल्या. चित्रपटाचे बाह्यचित्रण काश्मीरमध्ये केले. २४ डिसेंबर १९६१ ला चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट गाजला. मुंबईमध्ये २५ आठवडे चालला. चित्रपटात शकुंतलेचे सिंहांबरोबर दृश्य होते. दृश्यासाठी एका सर्कसमधून सिंह आणण्यात आला होता. संध्या यांनी न घाबरता सिंहाच्या शेजारी बसून चित्रण केले. चित्रण पूर्ण झाले. परंतु काही दिवसांनी बातमी आली, त्याच सिंहाने नंतर हल्ला करून एका स्त्रीला मारले. ‘सिंहाने संध्या यांना इजा केली असती तर?’, शांतारामांच्या छातीचा एक ठोका चुकला!
'राजकमल'ने १९६३ मध्ये ‘पलातक’ हा बंगाली चित्रपट आणि हिंदी ‘सेहरा’ हे चित्रपट काढले. ‘पलातक’चे दिग्दर्शन तरुण मुजुमदार यांनी केले. ‘पलातक’ कलकत्त्यामध्ये (आताचे कोलकाता) चांगला चालला, परंतु ‘सेहरा’ला सामान्य यश आले.
शांतारामांनी १९६५ मध्ये 'गीत गाया पत्थरोंनें' हा हिंदी सामाजिक चित्रपट प्रदर्शित केला. चित्रपटाचे संगीत रामलाल यांनी दिले. शांतारामांनी प्रमुख भूमिकेत नवोदित जितेंद्र आणि आपली मुलगी राजश्री यांना घेतले. चित्रपट चांगला चालला. चित्रपटाला सरकारी पारितोषिकदेखील मिळाले. परंतु त्याच वर्षी 'इये मराठीचिये नगरी' आणि त्याचे हिंदी रूपांतर ‘लडकी सह्याद्री की' हे चित्रपट काढले, पण ते आपटले. यात संध्या आणि प्रभाकर पणशीकर यांनी काम केले होते. महाराष्ट्र शासनाने मात्र 'जनजागृती करणारा चित्रपट' म्हणून या चित्रपटाला बक्षीस दिले.
शांतारामांनी १९६८ मध्ये ‘बूंद जो बन गई मोती’ हा चित्रपट आणला. या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत जितेंद्र होता. नायिकेसाठी प्रथम राजश्रीला घेण्यात आले. परंतु चित्रणाच्या तारखा आड येत होत्या म्हणून त्या जागी मुमताजची निवड करण्यात आली. 'बूंद जो बन गई मोती' रॉयल ऑपेरा हाउसमध्ये प्रदर्शित झाला आणि तो लोकांना आवडला. त्याचसुमारास मुंबईमधील चित्रपटगृहाच्या भाडेवाढीविरुद्ध सर्व निर्मात्यांनी मोर्चा काढला आणि जागोजागी जाऊन चित्रपट बंद केले. मोर्चा ‘रॉयल ऑपेरा हाऊस’पाशी गेला तेव्हा शांताराम स्वतः पुढे झाले आणि त्यांनी चित्रपट बंद करवला. चित्रपट लोकांना आवडला असला, तरी या कारणाने फार दिवस चालला नाही.
वयाच्या विसाव्या वर्षी; १९२० मध्ये शांतारामांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये प्रवेश केला. शांताराम आता ७० वर्षांचे झाले होते. चित्रपटसृष्टीत येऊन त्यांना ५० वर्षे पूर्ण झाली होती.