व्ही शांताराम : १९४२ - १९५७
१०. राजकमल कलामंदिर
'प्रभात' सोडली आणि शांतारामांनी नव्या जगात प्रवेश केला. आजवर 'प्रभात' हेच त्यांचे विश्व होते. 'प्रभात'च्या रम्य आठवणी ते कधीच विसरू शकले नाहीत. काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये ‘प्लाझा सिनेमा’ शांतारामांनी खाजगीरित्या विकत घेतला होता. 'प्रभात'च्या भागीदाराला कोणताही इतर व्यवसाय करता येणार नाही, या अटीमुळे बाबूराव पै यांच्या मध्यस्थीने भोपटकर यांना चालवायला दिला होता. परंतु याची सारी कागदपत्रे बाबूराव पै यांच्याकडे होती. मोठ्या मुश्किलीने शांतारामांनी ‘प्लाझा सिनेमा’चा ताबा मिळवला. 'प्रभात'मधून बाहेर पडल्यावर 'प्रभात'कडून त्याचा मोबदलादेखील शांतारामांनी हक्काने मिळवला. 'प्रभात'च्या मूल्यांकनाच्या मानाने तो रास्त नव्हता. परंतु शांतारामांनी जास्त आढेवेढे न घेता तो मान्य केला. पुण्यामध्ये ‘भांडारकर इन्स्टिटयूट’शेजारी शांतारामांनी बरीच जमीन खरेदी केली होती. पुढेमागे तेथे स्टुडिओ काढण्याचा त्यांचा मानस होता.
त्याचसुमारास ‘वाडिया मुव्हिटोन’चे मालक जे बी वाडिया यांनी शांतारामांकडे एक प्रस्ताव आणला. ब्रिटिश सरकारला ‘फिल्म ऍडवायजरी बोर्डाचे’ चीफ प्रोड्युसर या पदासाठी एका अनुभवी माणसाची आवश्यकता होती. त्या पदावर शांतारामांनी जावे, असे त्यांनी सुचवले. ब्रिटिश सरकारचे काम करणे शांतारामांना फारसे रुचले नाही, परंतु त्यांनी प्रस्ताव मान्य केला. सरकारी डॉक्युमेंटरी तयार करणे हे त्यांचे प्रमुख काम होते. या पदावर असताना ‘क्रिप्स कमिशन’वर 'गॅलंट एफर्ट' हा लघुपट शांतारामांनी काढला. तो सर्वांना आवडला. १९४२ च्या ऑगस्ट महिन्यात गांधीजींनी ‘चले जाव’ चळवळ उभारली. त्याच्या विरोधात ब्रिटिशांचे थैमान पाहून शांतारामांचे मन उद्विग्न झाले. त्यांनी ९ ऑगस्ट १९४२ रोजी बोर्डाचा राजीनामा दिला.
'प्रभात'बरोबरचा करार संपला होता. शांताराम आता स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकत होते. केशवराव दाते, वसंत देसाई, शांतारामांचा धाकटा भाऊ अवधूत यांना 'प्रभात'ने नोटीसा दिल्या. ते शांतारामांकडे येण्यास तयार होते. पुण्यापेक्षा मुंबईला जास्त सोयी व आर्थिक सवलती प्राप्त होण्याची शक्यता आहे, या विचाराने शांतारामांनी बस्तान मुंबईला हलवले. शांतारामांनी ‘सिल्वर स्क्रीन एक्सचेंज’ या नावाने वितरण संस्था चालू केली. ‘हंस पिक्चर’ आणि इतर काही निर्मात्यांचे चित्रपट वितरणासाठी घेतले. परळ येथे ‘वाडिया मुव्हिटोन’ या स्टुडिओमध्ये भाड्याने जागा मिळाली. चित्रपट वितरणासाठी देण्याच्या करारावर एका वितरकाकडून चित्रपट निर्मितीसाठी लागणारी रक्कम आगाऊ घेतली. सर्व तयारी झाली. आता कंपनीला नाव देण्याची वेळ आली. आई-वडिलांची राजाराम आणि कमला ही नावे जोडून ‘राजकमल’ नाव तयार झाले. नव्या कंपनीचे नाव ठरले, ‘राजकमल कलामंदिर!’ ९ नोव्हेंबर १९४२ रोजी 'राजकमल'चा मुहूर्त साजरा झाला.
‘शकुंतला’
'राजकमल'चा पहिलाच चित्रपट ‘बॉक्स ऑफिस’ला गाजणे आवश्यक होते. व्यवसायाला स्थिरता आणणे हा उद्देश तर होताच; परंतु 'प्रभात'मधून बाहेर पडल्यानंतरदेखील शांतारामांचा चित्रपट यशस्वी होऊ शकतो हे सिद्ध होणे गरजेचे होते. 'राजकमल'चा पहिला चित्रपट ठरला ‘शकुंतला’! यापूर्वी काही निर्मात्यांनी या कथानकावर चित्रपट काढले होते आणि ते पडले होते. परंतु आपला चित्रपट नक्की चालेल याबद्दल शांतारामांना आत्मविश्वास होता.
शांतारामांनी ‘शाकुंतल’ प्रथम संपूर्ण वाचून काढले. त्यातले बारकावे हेरले. चित्रपटाच्या दृष्टीने कथानकात काही फेरफार करून कथेचा आराखडा तयार केला. 'फिल्म इंडिया'चे संपादक बाबूराव पटेल यांना शांतारामांनी ‘शकुंतला’चे संवाद लिहिण्यास बोलावले. शकुंतलेच्या भूमिकेत जयश्रीबाईंना, तर दुष्यंताच्या भूमिकेत चंद्रमोहन यांना घेतले. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी वसंत देसाई यांच्यावर सोपवली. थोड्याच दिवसात जयश्रीबाईंना दिवस गेले. शांतारामांनी चित्रणाची गती वाढवली. शकुंतलेच्या गर्भवती अवस्थेतील चित्रण शेवटी केले. त्यावेळी जयश्रीबाई सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. ते दृश्य अतिशय नैसर्गिक वाटले. जयश्रीबाईंनीदेखील आपल्या नाजूक परिस्थितीचा विचार न करता चित्रपटाला न्याय दिला. नेहमीप्रमाणे शांतारामांनी दिग्दर्शनात आपले सर्वस्व ओतले. 'शकुंतला'चे चित्रण संपले. संकलनही पूर्ण झाले.
‘शंकुतला’ प्रदर्शित करण्याची वेळ आली, तेव्हा मात्र अनेक अडचणी आल्या. पूर्वीच्या 'प्रभात'च्या प्रदर्शकांनी चित्रपट दाखवण्यास साफ नकार दिला. बाबूराव पै यांनी शांतारामांचा चित्रपट दाखवायचा नाही, अशी अट त्यांना घातल्याचे समजले. अखेर ‘स्वस्तिक’ चित्रपटगृहाच्या मालकाने तयारी दर्शवली. चित्रपटाचा पहिला प्रयोग १० सप्टेंबर १९४३ रोजी स्वस्तिक चित्रपटगृहात झाला. शांतारामांना अजून एक धक्का बसला. चित्रपटगृहाच्या बाहेर ब्लॅक मार्केट करणारी मुले तिकिटे अर्ध्या किमतीत विकत होती. प्रयोगानंतर काही वृत्तपत्र आणि समीक्षकांनी चित्रपट अजिबात चांगला नसल्याचे सांगितले. चित्रपटाचे वितरण घेतलेल्या वितरकांनी ऐनवेळी पैसे परत मागितले आणि आपला हात काढून घेतला. शांतारामांनी थोडी चौकशी केली तेव्हा कळले, या सर्व प्रकरणामागे 'प्रभात'चे बाबूराव पै होते.
प्रत्यक्षात 'शकुंतला' तुफान चालला. मुंबईच्या 'स्वस्तिक' सिनेमात चित्रपटाने १०४ आठवडे पूर्ण केले. जयश्रीबाईंनी गायलेल्या 'जीवन की नाव ना डोले' या गाण्याच्या सव्वा लाख रेकॉर्ड्स विकल्या गेल्या आणि ग्रामोफोन रेकॉर्ड्सच्या विक्रीचा नवा विक्रम झाला. 'फोरम' या इंग्रजी पाक्षिकातर्फे चित्रपटाच्या निर्मितीसाठी शांतारामांचा सत्कार करण्यात आला. मा. विनायक यांनीदेखील त्यांचा वैयक्तिक सत्कार केला. अमेरिकेत व्यापारीदृष्ट्या प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. आर्थिकदृष्ट्या 'राजकमल'ला 'शकुंतला' चित्रपट प्रचंड पैसे देऊन गेला.
'राजकमल'ने १९४४ या वर्षात दोन चित्रपट आणले. एक ‘भक्तीचा मेळा’ आणि दुसरा ‘परबतपे अपना डेरा’. १ एप्रिल १९४४ रोजी ‘भक्तीचा मेळा’ प्रदर्शित झाला. त्याचे हिंदी रूपांतर ‘माली’ या नावाने प्रसिद्ध केले. याचे दिग्दर्शक केशवराव दाते होते, तर संगीत दिग्दर्शक मास्टर कृष्णराव होते. यात प्रमुख भूमिका मास्टर कृष्णराव, विद्यादेवी यांनी निभावल्या. मुंबईच्या 'नॉव्हेल्टी' सिनेमात हा चित्रपट २६ आठवडे चालला. २७ सप्टेंबर १९४४ रोजी 'परबत पे अपना डेरा' हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. स्वतः शांतारामांनी दिग्दर्शन केले होते. संगीत वसंत देसाई यांचे होते. पटकथा दीवाण शरार यांनी लिहिली. प्रमुख भूमिका उल्हास आणि वनमाला यांच्या होत्या. 'नॉव्हेल्टी' सिनेमात हा चित्रपट २७ आठवडे चालला.
'डॉक्टर कोटनीस की अमर कहानी'
दुसऱ्या महायुद्धात जपान आणि चीन यांच्यामध्ये युद्ध भडकले. भारताने पाच भारतीय डॉक्टरांचे एक सदिच्छा पथक चीनला पाठवले. या पाचपैकी चार डॉक्टर परत आले. परंतु पाचवे डॉक्टर - द्वारकानाथ कोटणीस चिनी सैनिकांची सेवा करताना तेथेच मरण पावले. या विषयावर ख्वाजा अहमद अब्बास या लेखकाने ‘वन हू डिड नॉट कम बॅक’ ही इंग्रजी कादंबरी लिहिली. या कादंबरीवर चित्रपट काढावा असा विचार शांतारामांच्या मनात आला. चित्रपटाचे नाव ‘डॉक्टर कोटनीस की अमर कहानी’ असे ठेवण्यात आले. त्या काळात दुसऱ्या महायुद्धाच्या झळा सिनेजगतालाही बसल्या होत्या. अमेरिकेतून येणाऱ्या फिल्मचे ‘रेशनिंग’ चालू होते. शांतारामांनी ‘कोटणीस’ या चित्रपटासाठी ‘महायुद्धाचा प्रचार चित्रपट’ या मथळ्याखाली फिल्मच्या परवान्यासाठी अर्ज केला. त्यांची युक्ती कामी आली. फिल्म परवाना मिळाला. प्रत्यक्षात हा चित्रपट मानवतेचा महान संदेश देणारा, भारतीयांची प्रतिमा उज्ज्वल करणारा चित्रपट होता.
कामाला सुरुवात झाली. कथानक, डॉक्टरांचे आणि इतर फोटो इत्यादी माहिती गोळा करण्यात आली. कोटणीस यांची भूमिका आपणच करावी असे शांतारामांनी ठरवले. चित्रपटाला सरकारकडून प्रोत्साहन मिळावे म्हणून गांधी-नेहरू यांना पत्रे पाठवली. परंतु त्यातून फारसे निष्पन्न झाले नाही. चित्रपटाचे संगीत वसंत देसाई, तर पटकथेची जबाबदारी अब्बास आणि वसंत साठे यांनी सांभाळली. प्रमुख भूमिका शांताराम, जयश्री, केशवराव दाते, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांना देण्यात आल्या. चित्रपटाचे चित्रण उत्साहात पार पडले. शांतारामांनी चित्रपटाच्या संकलनाचे काम पूर्ण केले आणि चित्रपट ६ मार्च १९४६ रोजी मुंबईमध्ये ‘स्वस्तिक चित्रपटगृहात’ प्रदर्शित झाला.
चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. शांतारामांना बऱ्याच वर्षांनंतर पडद्यावर पाहून प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आले. चित्रपटाशी संपूर्ण समरस होऊन प्रेक्षक चित्रपट पाहत होते. चित्रपटाच्या शेवटी डॉ. कोटणीस यांचा मृत्यू होतो. मायदेशी परत जाण्याची त्यांची इच्छा अपुरी राहते. परंतु त्यांची चिनी पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन भारतात येते. कोटणीसांची आई त्यांचे स्वागत करते. तान्ह्या मुलाच्या रूपात तिला कोटणीसांची प्रतिमा दिसते. चित्रपटाचे हे शेवटचे दृश्य पाहून चित्रपटगृहातील एकाही माणसाचे डोळे कोरडे राहत नसत.
‘कोटणीस’ साऱ्या भारतात प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाची खूप वाहवा झाली. पत्रकार व समीक्षक यांनी या चित्रपटाचे गुणगान गायले. लाहोरमध्ये ‘कोटणीस’ पाहण्यासाठी आलेल्या गर्दीने उच्चांक गाठला. 'डॉक्टर कोटनीस की अमर कहानी'ला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पटकथेसाठी पारितोषिक मिळाले.
स्वातंत्र्याची पहाट
'कोटनीस' च्या वितरणाचे हक्क एका इंग्लिश वितरकाने विकत घेतले. अमेरिकेतही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची शक्यता आजमावण्याकरता तेथे जाण्याचे शांतारामांनी ठरवले. जयश्रीबाईंनादेखील बरोबर नेण्याचे ठरले. परदेशात असताना 'राजकमल'चे काम चालू राहणे आवश्यक होते. दरम्यानच्या काळात मास्टर विनायक यांनी 'राजकमल'साठी एक चित्रपट काढावा, असे त्यांनी सांगितले. मास्टर विनायक 'राजकमल'च्या स्टुडिओमध्येच ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ या नावाने चित्रपट निर्मिती करत होते. चित्रपटाला ‘जीवनयात्रा’ नाव देण्यात आले. शांताराम अमेरिकेत असताना मास्टर विनायक यांनी ‘जीवनयात्रा’ चित्रपट पूर्ण केला. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक वसंत देसाई होते. यात प्रमुख भूमिका नयनतारा, प्रतिमादेवी, लता मंगेशकर, याकूब, बाबूराव पेंढारकर, दामूअण्णा यांच्या होत्या. शांताराम अमेरिकेहून परत आल्यावर ७ नोव्हेंबर १९४७ रोजी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. परंतु चित्रपट फारसा चालला नाही. शांताराम आणि जयश्रीबाई अमेरिकेला गेले. अमेरिकेत वितरणाची व्यवस्था लावून दोघे इंग्लंडला आले. तेथे काही दिवस काढून भारतात परत आले. शांताराम अमेरिकेतून परतल्यानंतर काही दिवसांनी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला 'शकुंतला' प्रदर्शित झाला. अमेरिकेत व्यापारी पद्धतीने प्रदर्शित होण्याचा मान भारतीय चित्रपटसृष्टीत 'शकुंतला'ला मिळाला.
संपूर्ण देशात स्वातंत्र्याचे वारे वाहात होते. ब्रिटिशांच्या दडपशाहीला न जुमानता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जनता स्वातंत्र्याची लढाई लढत होती. अखेर ब्रिटाशांना परिस्थितीपुढे हार मानावी लागली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. परंतु जाताना ब्रिटिशांनी क्रूर खेळ खेळाला. भारत, पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान अशी देशाची शकले केली. फाळणीच्या दुःखाला हृदयात ठेवून भारतीय जनतेने नव्या युगात प्रवेश केला. १५ ऑगस्टला मध्यरात्री युनियन जॅक खाली उतरवला गेला आणि त्या जागी भारताचा ‘अशोक चक्र’धारी तिरंगी झेंडा आकाशात झळकू लागला. शांतारामांनी स्टुडिओंवर आणि दोन्ही घरांच्या गच्चीवर, सर्व मोटारींवर जिथे जागा सापडेल तिथे तिरंगा झेंडे फडकवत ठेवले.