व्ही शांताराम  : १९०१  - १९२९ 

१. बालपण

भारतीय चित्रपट उद्योगाचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे व्ही  शांताराम यांचे मूळ नाव शांताराम वणकुद्रे आहे. शांतारामांचा जन्म राजाराम बाबाजी वणकुद्रे आणि कमलाबाई यांच्या पोटी १८ नोव्हेंबर १९०१ रोजी कोल्हापूर येथे झाला. राजारामबापू, कमलाबाई आणि पाच मुले असे सात जणांचे हे कुटुंब. मुलांमध्ये सर्वांत मोठा काशिनाथ. त्याला सारे दादा म्हणत. दुसरा शांताराम. शांतारामला तीन धाकटी भावंडे; केशव, रामकृष्ण आणि अवधूत. 

राजारामबापू धर्माने जैन होते तर कमलाबाई धर्माने हिंदू. तरुण वयात दोघे संपर्कात आले. त्या काळात समाजावर धर्म आणि त्यांच्या नियमांचा फार मोठा पगडा होता.  आंतरधर्मीय  विवाह समाजाला मान्य नव्हता.  एखाद्याने जर आंतरधर्मीय विवाह केलाच, तर त्याला वाळीत टाकण्याचा प्रघात होता.  परंतु या परिणामांना न जुमानता राजारामबापूंनी कमलाबाईंशी लग्न करण्याचे ठरविले. समाजाच्या साक्षीने लग्न करणे शक्य नव्हते, म्हणून  त्या दोघांनी नरसोबाची वाडी या तीर्थक्षेत्री विवाह केला. त्या काळात या प्रकारचा ‘मिश्रविवाह’ करणे फार धाडसाचे होते. राजारामबापूंनी ते धाडस दाखवले. सुरुवातीच्या काळात दोघांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे  लागले. परंतु हळूहळू वातावरण निवळले.  राजारामबापू आणि कमलाबाईंचा संसार सुरू झाला. राजारामबापू जैन धर्माप्रमाणे सण साजरे करत, तर कमलाबाई हिंदू धर्माप्रमाणे! समाजाच्या समजुतीसाठी सुरुवातीच्या काळात राजारामबापू स्वतःचे अन्न स्वतःच शिजवत. परंतु, नंतर मात्र त्यांनी हा प्रकार बंद केला आणि कमलाबाई संपूर्ण कुटुंबाचे अन्न एकत्र शिजवू लागल्या.

कोल्हापूर 

लग्नानंतर राजारामबापू आणि कमलाबाई हुबळी येथे राहत असत.  शांताराम चार-पाच वर्षांचा असताना  राजारामबापूंच्या वडिलांनी या कुटुंबाला कोल्हापुरात राहण्यासाठी बोलावले. नातवंडे त्यांना ‘बाबा’ म्हणत असत. बाबा त्याकाळी कोल्हापूरमध्ये वकिली करत असत. राजारामबापूंनी कोल्हापूरमध्ये स्वतःचे दुकान सुरू केले. सौभाग्य लेणी, खेळाचे साहित्य अशा लहानसहान सामानांच्या विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. आपल्या संपूर्ण कुटुंबासह ते कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले. बाबांचा नातवंडांवर खूप जीव होता. नातवंडांना गोष्टी सांगण्यात आणि संध्याकाळी त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यात बाबांना अतिशय आनंद होत असे. मुलांनी आठ वाजण्यापूर्वी झोपलेच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. शांतारामांच्या आजी कडक स्वभावाच्या होत्या. सर्व नातवंडांना आजीचा धाक होता. 

कमलाबाईंच्या नातेवाईकांपैकी त्यांची एक बहीण संपर्कात होती. तिचे नाव राधाबाई. राधाबाईंचे लग्न कोल्हापूरमध्येच डॉ गोपाळराव पेंढारकर यांच्याशी झाले होते. राधाबाई वयाने कमलाबाईंपेक्षा मोठ्या होत्या. त्यांना सगळे ‘आक्का’ म्हणून हाक मारत. राधाबाईंना दोन मुले होती. मोठा बाबूराव आणि धाकटा भालजी. शांतारामची बाबूराव आणि भालजी यांच्याशी चांगली गट्टी होती. शांताराम त्यांना ‘बाबू’ आणि ‘भालू’ अशी हाक मारत असे. बाबू शांतारामपेक्षा पाच-सहा वर्षांनी मोठा होता. 

शांताराम पाच वर्षांचा झाला आणि त्याचा कोल्हापूरमधील हरिहर विद्यालयात ‘बिगरी’मध्ये दाखला करण्यात आला. शाळेत जायचे नाही म्हणून शांतारामने आईजवळ खूप हट्ट केला. पण वडिलांचा धाक होता. त्यामुळे त्यांनी दटावले तेव्हा शांताराम निमूट शाळेत जाऊ लागला. शाळेत तो हुशार विद्यार्थ्यांत गणला जात नव्हता. परंतु त्याची चित्रकला आणि ‘भाषा’ या विषयांत मात्र चांगली प्रगती होती. वर्गात पुस्तकातले धडे  मोठ्याने वाचण्यात शांताराम कायम पुढे असे. शिक्षक यासाठी त्याला शाबासकी देत. शांताराम हळूहळू शाळेत रुळला आणि चौथी पास झाला. ही शाळा चौथीपर्यंतच होती. चौथी पास झाल्यावर राजारामबापूंनी दुसऱ्या शाळेमध्ये त्याचा इंग्रजी पहिलीत प्रवेश घेतला. शांतारामचा मोठा भाऊ काशिनाथ, तसेच बाबू आणि भालू  ही मावस भावंडेदेखील त्याच शाळेत शिकत होती. 

शांतारामच्या वडिलांनी सौभाग्य लेण्याचे लहान दुकान बंद करून किराणा मालाचे पहिल्यापेक्षा मोठे दुकान सुरू केले. नव्या दुकानात धान्य आणि किराणा मालाचे जिन्नस मिळत. राजारामबापूंची मिळकत सर्वसाधारणच होती. दुकानातून मिळणारी मिळकत कुटुंब चालवण्यासाठी जेमतेम पुरत असे. घरात सर्वांना दोन वेळेस जेवण मिळत असे. परंतु इतर बाबतीत कुटुंबात काटकसर केली जात असे. काशिनाथने वापरून झालेले कपडे त्याला तोकडे होऊ लागले, की ते शांतारामला वापरायला दिले जात.  शांतारामने हट्ट केलाच तर सणासुदीला एखादा नवा कपडा मिळत असे. शाळेमध्ये काशिनाथ वरच्या वर्गात गेला, की त्याची जुनी पुस्तके शांतारामकडे  येत. अर्थात, घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नसल्याने शांतारामला आपल्या घरच्या गरिबीची जाणीव झाली नव्हती. नवीन शाळेत फी द्यायची वेळ आली तेव्हा शांतारामच्या लक्षात आले, की त्याची फी इतर मुलांपेक्षा निम्मी होती. यावर चौकशी करता त्याला कळले, की आपल्या वडिलांच्या कमी मिळकतीमुळे त्याला शाळेमध्ये ‘हाफ-फ्री’ गटामध्ये टाकले आहे आणि त्याची फी इतरांपेक्षा निम्मी आहे. ‘गरीब’ या शब्दाची जाणीव शांतारामला आयुष्यात प्रथमच झाली. एकदा त्याने हा विषय आईसमोर काढला,

“आई, माझ्या वर्गातले माझे मित्र पूर्ण फी देतात. मी मात्र अर्धीच फी देतो. मला याची लाज वाटते”

यावर आई म्हणाली, 

"अरे, कुटुंबाचा खर्च भागत नाही म्हणून तुझ्या वडिलांनी पैसे उसने घेतले आहेत. तुला लाज वाटते ना, मग तू चांगला शिकून खूप मोठ्ठा हो, म्हणजे तुला तुझ्या मुलांना अर्ध्या फीमध्ये शाळेत घालावे लागणार नाही."

शांताराम नवीन शाळेत रुळला. घरची परिस्थिती लक्षात आल्यावर शांतारामने घरातल्या लहानसहान कामात आईला मदत करायला सुरुवात केली. घरातील वस्तू भावंडांत वाटून घेण्याची सवय त्याने स्वतःला लावली. कोल्हापूरमधील मंगल आणि कलात्मक वातावरणात शांताराम मोठा होऊ लागला. महालक्ष्मीच्या मंदिरातील घंटानाद आणि काकड आरती यांनी कोल्हापूरमधील दिवस सुरू होत असे. प्रत्येक घरासमोर गृहिणी सडासंमार्जन करून रांगोळ्या घालत. घरोघरी गायले जाणारे शास्त्रीय संगीत, ओव्या आणि भूपाळ्या शांतारामच्या कानावर पडत. कोल्हापूरमध्ये आखाडे आणि कुस्ती याला फार मोठा मान होता.  तरुण मुले आखाड्यात जाऊन कुस्ती खेळून आणि व्यायाम करून  आपल्या दिवसाची सुरुवात करत. संध्याकाळी देवळात नियमितपणे कथा-कीर्तन आणि आरत्या होत. शांताराम देवळातल्या आरत्यांना नियमितपणे हजर असे. त्याकाळी कोल्हापूर ही  शाहू महाराजांच्या संस्थानाची राजधानी होती. भगवा फेटा, मलमलचा सदरा, लुंगी व जाडजूड कोल्हापुरी वहाणा, असे त्यांचे भव्य व्यक्तिमत्व होते. शाहू महाराजांचा जनमानसावर फार मोठा पगडा होता. सर्व जनता त्यांच्याकडे आदराने बघत असे. कोल्हापुरातील सर्व व्यवहार शाहू महाराजांच्या मर्जीने होत असत. महाराजांचे धोरण कायम लोकहिताचे असे. अशा बहुढंगी, बहुरंगी वातावरणात शांतारामचे मन आणि शरीर आकार घेत होते.

राजारामबापूंचे किराणामालाचे दुकान कसेबसे चालले होते. पुढे परिस्थिती अधिक खालावल्यामुळे राहते घर सोडून सारे एका लहानशा घरात राहू लागले. किराणामालाच्या दुकानाला जोडधंदा म्हणून राजारामबापूंनी लग्नसमारंभांसाठी आणि नाटकांच्या प्रयोगासाठी लागणाऱ्या गॅसच्या बत्त्या भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला. कोल्हापूरमध्ये अनेक प्रसिद्ध नाटक मंडळी नाटके करण्यासाठी येत. राजारामबापूंची उठबस त्यांच्याबरोबर होती. बत्त्या जेव्हा भाड्याने जात, तेव्हा शांताराम त्यांना मदत करण्यासाठी जात असे. दिवे पेटवणे, त्यातली हवा कमीजास्त करणे अशी कामे तो करत असे. या गॅसच्या बत्त्यांच्या व्यवसायामुळे त्याने अनेक नाटके पाहिली. ‘संगीत नाटक’, ‘प्रोज नाटक’ अशा अनेक प्रकारच्या नाटकांशी शांतारामची ओळख झाली. ‘प्रेमसंन्यास’, ‘राणा भीमदेव’, ‘पन्नाधाय’, ‘हॅम्लेट’ अशी अनेक नाटके त्याने पहिली. त्याकाळी स्त्रिया नाटकांत काम करत नसत. स्त्रियांची भूमिका पुरुषच करत असत. शांतारामला ते विचित्र वाटे.

शांतारामच्या शाळेत दरवर्षी स्नेहसंमेलन असे. सर्व मुले या दिवसाची वाट पाहात. स्नेहसंमेलनात एखादे चांगले लोकप्रिय नाटक शाळेतले विद्यार्थी सादर करत. एके वर्षी मुलांनी न चिं केळकर यांचे ‘तोतयाचे बंड’ हे नाटक बसवले. त्यात बाबूला प्रमुख भूमिका मिळाली. काशिनाथ, शांताराम आणि भालू यांनाही या नाटकात लहानसहान भूमिका मिळाल्या. शांतारामला खूप आनंद झाला. नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. शांतारामला फारसे काम नसल्याने तो इतरांच्या भूमिका बारकाईने पाहात असे. 

तालमीच्या दिवसांत कोणाच्या तरी नकला करून मित्रांना हसवण्याचा छंद शांतारामला लागला. ही बातमी मास्तरांपर्यंत पोचली. मास्तरांनी शांतारामला बोलावून घेतले. आता आपल्याला चांगलाच मार पडणार, असे त्याला वाटले. मात्र झाले उलटेच. मास्तरांनी शांतारामला एखादी नक्कल करून दाखवायला सांगितले. त्याने बाबूचीच नक्कल करून दाखवली. ती बघून मास्तरदेखील हसू लागले आणि शांतारामची भीड चेपली. मग तो वेळोवेळी नकला करून मित्रांचे मनोरंजन करू लागला. त्याने मित्रांबरोबर ‘फूल्स हेड’ हा मूकपट पहिला. त्यातील प्रसंगांवरदेखील तो नकला करून दाखवू लागला. राजारामबापूंच्या मित्रांनाही शांताराम नकला करून  दाखवू लागला. हळूहळू त्याच्या नकलांची ख्याती मित्र-परिवार आणि नातेवाईक मंडळींत पसरली.