व्ही शांताराम : १९२९ - १९४२
५. 'प्रभात'ची सुरुवात
‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’मध्ये नऊ वर्षे काम करत अनुभवांची मिळालेली शिदोरी बरोबर घेऊन शांताराम आपल्या आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करत होते. कोल्हापूर येथेच राहणारे सीताराम कुलकर्णी यांनी कंपनीला लागणारे भांडवल देण्याचे कबूल केले. विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, केशवराव धायबर, सीताराम कुलकर्णी आणि शांताराम अशा पाच भागीदारांनी एकत्र येऊन नव्या फिल्म कंपनीची स्थापना करण्याचे ठरवले. अर्थात, पाचही जणांत शांताराम सर्वांत लहान होते. सर्वानुमते कंपनीला ‘प्रभात’ असे नाव देण्याचे ठरले. कंपनीसाठी ‘बोधचिन्ह’ तयार करण्याची वेळ आली. शांताराम यांना 'प्रभात' या शब्दाला साजेशी कल्पना सुचली, ‘पहाटेच्या मंगलसमयी पूर्व दिशा तेजःपुंज होऊ लागली आहे. समोर एक नवयुवती आपल्या हातातील तुतारी फुंकून सूर्याच्या आगमनाची ललकारी देत आहे.’ फत्तेलाल यांनी त्याचे चित्र रेखाटले आणि कंपनीचा ट्रेडमार्क तयार झाला. पाचहीजणांनी चित्राची पूजा केली आणि ‘प्रभात फिल्म कंपनी’च्या शुभारंभाचा नारळ फोडण्यात आला. दिवस होता १ जून १९२९!
‘गोपालकृष्ण’
कंपनीच्या पहिल्या चित्रपटाची तयारी सुरू झाली. चित्रपट लोकप्रिय झाला पाहिजे या विचाराने श्रीकृष्णावर आधारित कथानक ठरवले गेले. चित्रपटाचे नाव ‘गोपालकृष्ण’ ठेवण्यात आले. सीताराम कुलकर्णी यांनी घातलेल्या भांडवलात कॅमेरा विकत आणण्यात आला. स्टुडिओसाठी कोल्हापूरमध्ये जागा भाड्याने घेण्यात आली. सर्वांनी श्रमदानाने शक्य तितक्या कमी खर्चात टुमदार स्टुडिओची उभारणी केली. चित्रण, कलाकारांच्या वेशभूशा, रसायनशाळा, ऑफिस यासाठी जागा तयार करण्यात आल्या. शांताराम यांचे वडील राजारामबापू यांना हिशोब लिहिण्यासाठी घेण्यात आले. शांताराम मुंबईला गेले. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पैसे देण्याच्या कबुलीवर त्यांनी आग्फा कंपनीकडून फिल्म मिळवली.
जवळच्याच एका खेड्यातील सुरेश नावाच्या मुलाची ‘बाळकृष्णा’च्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’तून आलेल्या गुलाबबाई यांची यशोदेच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. एका जोतिष्याने चित्रपटाचा मुहूर्त ४५ दिवसांनी करावा असा सल्ला दिला. पण हातावर हात ठेवून बसणे शांतारामांना शक्य नव्हते. इतर सहकाऱ्यांच्या विरोधात जाऊन लगेच काम सुरू करण्याचा आग्रह त्यांनी धरला आणि चित्रपटावर काम सुरू झाले. चित्रणाची सुरुवात 'प्रभात'च्या बोधचिन्हाने झाली. यात तुतारी वाजवणाऱ्या स्त्रीच्या भूमिकेत गुलाबबाईंना घेण्यात आले. मूळ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आणि शांताराम कामात संपूर्ण बुडाले.
स्टुडिओमधले चित्रीकरण पूर्ण झाले. नंतर बाहेरील चित्रीकरणाला सुरुवात झाली. एके दिवशी कोल्हापूर भागात खूप पाऊस पडत होता. शांतारामांनी त्याचा फायदा घेऊन गोवर्धन पर्वत उचललेल्या प्रसंगाचे चित्रीकरण त्या पावसात करून टाकले. एका प्रसंगात कृष्णाचा एक लहानगा सवंगडी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करण्याचा प्रसंग होता. त्याचे चित्रण करत असताना त्या लहान मुलाची लंगोट घसरली. त्याने सहजरित्या हाताने ती वर केली आणि पुन्हा नाचू लागला. चित्रण झाल्यावर तो प्रसंग कापावा असे सर्वांचे मत पडले. परंतु शांतारामांनी तो ठेवण्याचा आग्रह धरला. मुंबईमध्ये ‘मॅजेस्टिक गृहात’ चित्रपट प्रथम प्रदर्शित केला गेला. लोकांनी चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला. 'प्रभात'चे बोधचिन्ह, गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रसंग इत्यादी लोकांना खूप आवडले. तसेच त्या लहानग्या मुलाची लंगोट घसरण्याचा आणि मुलाचे सहज भाव पाहून प्रेक्षकांनी तो प्रसंगदेखील उचलून धरला. पहिलाच चित्रपट 'प्रभात'ला भरघोस यश घेऊन आला.
‘गोपालकृष्ण’ चित्रपटाच्या यशाने 'प्रभात'मध्ये चैतन्य पसरले. शांताराम यांचा कामाचा व्याप वाढला. त्यांनी बाबूराव पेंढारकरांना ‘प्रभात’मध्ये मॅनेजर म्हणून बोलावून घेतले. त्या काळात लोकांमध्ये स्टंट चित्रपटांचे आकर्षण वाढले होते. एखादा स्टंट चित्रपट काढावा या विचारांनी शांतारामांनी ‘खुनी खंजर’ या चित्रपटाची निर्मिती केली. १९३० मध्ये मुंबईमध्ये 'खुनी खंजर' प्रदर्शित झाला. तोही खूप चालला. या चित्रपटाच्या यशामुळे इतर निर्मात्यांच्या स्टंट चित्रपटांतील कृत्रिमता कमी होऊ लागली. 'खुनी खंजर' पुढील काळातील स्टंट चित्रपटांना मार्गदर्शक ठरला. या चित्रपटातील बलात्काराचा एक प्रसंग शांताराम यांनी अतिशय प्रतीकात्मक पद्धतीने चित्रीत केला. प्रेक्षकांनी शांताराम यांच्या दिग्दर्शनाचे तोंडभरून कौतुक केले.
त्याचवर्षी 'प्रभात'ने ‘राणीसाहेबा’ आणि ‘उदयकाल’ हे दोन चित्रपट काढले. एका लहान मुलाची प्रमुख भूमिका असलेला ‘राणीसाहेबा’ हा प्रयोगात्मक चित्रपट ठरला. शांताराम यांनी त्याचे दिग्दर्शन केले. शांताराम यांचे मावसभाऊ; भालजी पेंढारकर यांनी त्याचे कथालेखन केले. चित्रपट लोकांना खूप आवडला. त्यानंतर ‘उदयकाल’ आला. शिवाजी महाराजांवरील या चित्रपटात शांताराम यांनीच शिवाजीची प्रमुख भूमिका केली. प्रथम या चित्रपटाचे नाव ‘स्वराज्याचे तोरण’ असे ठेवण्यात आले. परंतु त्याकाळच्या इंग्रज सरकारने ‘स्वराज्य’ या शब्दावर आक्षेप घेतला. म्हणून चित्रपटाचे नाव बदलून ‘उदयकाल’ करण्यात आले. त्यातला झेंडावंदनाचा एक प्रसंगदेखील गाळावा लागला. इतके करूनदेखील लोकांना चित्रपट खूप आवडला. त्यातल्या काळ्या घोड्याचे आणि महाराजांच्या वाघ्या कुत्र्याचे काम गाजले. १९३१ मध्ये 'प्रभात'चा केशवरावांनी दिग्दर्शित केलेला ‘जुलूम’ चित्रपट मात्र आपटला. त्यानंतरचा ‘चंद्रसेना’ पुन्हा गाजला. ‘चंद्रसेना’ने 'प्रभात'च्या कीर्तीत मोलाची भर घातली.
‘अयोध्येचा राजा’
‘इंपिरिअल फिल्म कंपनी’चा अर्देशीर इराणी यांनी दिग्दर्शित केलेला ‘आलम आरा’ चित्रपट १४ मार्च १९३१ रोजी मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमामध्ये प्रदर्शित झाला. पृथ्वीराज कपूर, झुबेदा, मा. विठ्ठल यांनी या चित्रपटात काम केले होते. देशातील हा पहिला बोलपट ठरला. लोकांनी चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला. पाठोपाठ जे. जे. मदन यांनी दिग्दर्शित केलेला ‘लैला मजनू’ हा बोलपट प्रदर्शित झाला आणि तोदेखील प्रचंड गाजला. बोलपटांची निर्मिती होत आहे याची बातमी शांतारामना होती. बोलपट फार चालणार नाहीत, असे शांताराम यांचे मत होते. परंतु त्यांचा अंदाज पूर्ण खोटा ठरला होता. देशात साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. मूकपटातील संवादाच्या पाट्या प्रेक्षकांना वाचता येत नव्हत्या. त्यामुळे प्रेक्षकांना संपूर्ण चित्रपट कळणे अवघड होत असे. बोलपटाने ती त्रुटी भरून काढली. दुसरे, संगीत हे भारतीय संस्कृतीचा एक भाग होते. बोलपटातील संगीताने प्रेक्षक मुग्ध होत असत. शांतारामांनी आपली चूक मान्य केली आणि 'प्रभात'ने बोलपटाकडे मोर्चा वळवला.
एखादा निर्णय घेतल्यानंतर वेळ घालवण्याचा शांतारामांचा स्वभाव नव्हता. 'प्रभात'चा पहिला बोलपट काढण्याच्या दृष्टीने शांतारामांनी पाऊले उचलायला सुरुवात केली. त्याकाळी ‘ऑडिओ कॅमेक्स’ नावाच्या तंत्रज्ञानाचा विकास झाला होता. या आधीच्या बोलपटात चित्रण आणि ध्वनिमुद्रण एकाच फितीवर रेकॉर्ड केले जात असे. परंतु ऑडिओ कॅमेक्स पद्धतीत चित्रण आणि ध्वनी यांचे वेगळे रेकॉर्डिंग करून अंतिम स्वरूपात ‘इंटरलॉक मोटर’द्वारे एकत्र प्रदर्शित होत असे. यामुळे संकलन सोपे आणि प्रभावी होत असे. ध्वनिमुद्रणामध्ये स्वतंत्र फेरफार करणे सहज शक्य होत असे. परंतु या तंत्रात चित्रण आणि ध्वनी यांचा मेळ बसणार नाही अशी भीती काही तंत्रज्ञ बोलून दाखवत होते. शांतारामांनी ऑडिओ कॅमेक्सचा प्रयोग करण्याचे ठरवले. त्याला लागणारी सामग्री अमेरिकेतून मागवली. बोलपटाचे चित्रण करण्यासाठी शांत वातावरणाची आवश्यकता होती. त्यासाठी 'प्रभात'ने कोल्हापूर शहराबाहेर एक प्रशस्त जागा भाड्याने घेतली. अद्ययावत चित्रीकरण स्टुडिओ, वेशभूषा, रंगभूषा, रसायनशाळा, कार्यालय यांसाठी स्वतंत्र खोल्या निर्माण केल्या.
'प्रभात'चा पहिला बोलपट ‘राजा हरिश्चंद्रा’च्या कथानकावर काढण्याचे सर्वानुमते ठरले. चित्रपटाचे नाव ‘अयोध्येचा राजा’ असे ठेवण्यात आले. बोलपट यशस्वी करण्यात चित्रपटात संगीताचा मोठ्या प्रमाणावर अंतर्भाव करणे आवश्यक होते. त्यासाठी गोविंदराव टेंबे यांना कंपनीमध्ये घेण्यात आले. एकेकाळी शांताराम हे गोविंदराव टेंबे यांच्याकडे ‘बालगंधर्व नाटक मंडळी’त काम करत होते. आज टेंबे ‘प्रभात’मध्ये कामाला आले होते. परंतु शांताराम त्यांच्याशी पाहिल्याइतकेच आदराने वागत असत. टेंबे गातदेखील असत. संगीत दिग्दर्शनाशिवाय त्यांना हरिश्चंद्राच्या भूमिकेतही घेण्यात आले. त्याच सुमारास दुर्गा खोटे या अतिशय गुणी कलाकार म्हणून उदयाला येत होत्या. राणीच्या भूमिकेसाठी त्यांची निवड करण्यात आली. बाबूराव पेंढारकर यांचा भाऊ विनायक याला शांतारामांनी दिग्दर्शनात मदतनीस म्हणून घेतले. ना. वि. कुलकर्णी यांना कथालेखन आणि संवाद लिहिण्यासाठी नक्की करण्यात आले. बोलपटातील गाणी टेंबे यांनीच लिहिली.
चित्रणाला सुरुवात झाली. ऑडिओ कॅमेक्सची चाचणी करण्यात आली. थोड्या अडचणींनंतर तंत्रावर जम बसला. दामले यांनी चित्रणाची जबाबदारी स्वीकारली. खेळीमेळीत चित्रण सुरू झाले. नाट्यकंपनीमध्ये लांब चालणारी गाणी तीन-चार मिनिटांत संपवणे गोविंदराव टेंबेंना अवघड जात होते. परंतु नवीन तंत्रात गाणी बसवण्यासाठी त्यांनी संपूर्ण सहकार्य केले. चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत चित्रीत करण्यात आला. मराठीत ‘अयोध्येचा राजा’ आणि हिंदीत ‘अयोध्या का राजा’ असे नामकरण करण्यात आले. ६ मार्च १९३२ रोजी चित्रपट मुंबईमध्ये आणि नंतर देशभर प्रदर्शित करण्यात आला. मराठी चित्रपटाने सर्व उच्चांक गाठले. 'प्रभात'ला आर्थिकदृष्ट्या प्रचंड यश मिळवून दिले. हिंदी चित्रपट फारसा चालला नाही. परंतु, मराठी चित्रपटाच्या यशाने 'प्रभात'वर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ‘अयोध्येचा राजा’ हा मराठीतला पहिला बोलपट ठरला. तसेच ‘ऑडिओ कॅमेक्स’ पद्धतीने चित्रण आणि ध्वनी यांचे वेगळे रेकॉर्डिंग केलेला देशातील पहिला चित्रपट ठरला.
‘माया मच्छिंद्र’
‘अयोध्येचा राजा’च्या यशानंतर १९३२ मध्येच शांतारामांनी ‘अग्निकंकण’ आणि त्याची हिंदी आवृत्ती ‘जलती निशानी’ हे चित्रपट काढले. गोविंदराव टेंबे यांनी त्याला संगीत दिले. प्रेक्षकांना चित्रपट आवडले. गोविंदराव टेंबे यांचे ‘सिद्धसंचार’ नावाचे संगीत नाटक होते त्यावर शांतारामांनी ‘माया मच्छिंद्र’ हा चित्रपट काढला. गोविंदराव टेंबे आणि दुर्गाबाई खोटे यांची जोडी या चित्रपटातदेखील झळकली. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी शांताराम आजारी पडले. केशवरावांनी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. 'प्रभात'च्या सर्व सहकाऱ्यांनी चित्रपटाचा प्रयोग मुंबईमध्ये ‘कृष्ण थिएटर’ मध्ये पाहिला. त्यांना तो प्रभावी वाटला नाही. चित्रपटात बदल करण्याचा सर्वांचा सूर होता. परंतु शांतारामांनी तोच चित्रपट ‘मॅजेस्टिक थिएटर’मध्ये पुन्हा पाहण्याचा आग्रह धरला. ‘मॅजेस्टिक’मध्ये चित्रपट उठून दिसला. ‘कृष्ण थिएटर’मधली ध्वनी यंत्रणा चांगली नव्हती हे साऱ्यांच्या लक्षात आले. चित्रपट प्रदर्शित झाला आणि सर्वत्र प्रेक्षकांनी उचलून धरला.
‘प्रभात’ने १९३३ मध्ये 'सीताकल्याणम्' हा तमिळ चित्रपट निर्माण केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन बाबूराव पेंढारकर यांनी केले. हा चित्रपट मद्रास प्रांतात (आताचे चेन्नई) खूप चालला. त्याचवर्षी ‘सिंहगड’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. शांतारामांनी त्याचे दिग्दर्शन केले, तर प्रमुख भूमिका शंकरराव भोसले, मा. विनायक, लीला, बाबूराव पेंढारकर, बुवासाहेब, केशवराव यांनी केल्या. त्याचसुमारास कोल्हापूरमध्ये साहित्य संमेलन झाले होते. त्यावेळी शांतारामांनी अनेक प्रसिद्ध कवींच्या काव्यवाचनाचे ध्वनिमुद्रण केले. यावर आधारित ‘काव्यसृष्टी’ हा लघुपट शांतारामांनी काढला. हा लघुपट ‘सिंहगड’ चित्रपटाच्या आधी दाखवला जात असे.