व्ही शांताराम : १९२९ - १९४२
७. स्पर्धेतून चैतन्य
'अमृतमंथन', 'धर्मात्मा' या चित्रपटांच्या प्रचंड यशामुळे शांतारामांच्या नावाचा गाजावाजा होत होता. 'प्रभात'च्या व्यवसायाची बाजूही शांतारामच पाहत असत. त्यामुळे कंपनीत येणारे सर्व कलावंत, लेखक आणि सर्व महत्त्वाच्या व्यक्ती शांतारामांकडेच जात असत. ‘सर्व बाबतीत शांताराम स्वतःलाच महत्त्व घेत आहेत. चित्रणाच्या वेळीही शांताराम आपल्या तंत्रानेच सर्व कामे करतात’ अशी काहीशी भावना दामले-फत्तेलाल आणि केशवराव यांच्यामध्ये बळावू लागली. प्रत्यक्षात बाहेरील व्यक्तींशी बोलताना शांताराम त्यांचा आदराने उल्लेख करत आणि त्यांचा अपमान होईल असे कोणतेही विधान शांताराम आपल्या संभाषणात करत नसत. त्यांच्यामध्ये निर्माण होणारी ही कटुतेची भावना शांतारामांच्या लक्षात आली आणि त्यांनी सर्वांसमोर हा विषय काढला,
"मी आपण होऊन कधीच स्वतःची प्रसिद्धी करत नाही. व्यवसायाचा पत्रव्यवहार मी पाहात असल्याने लोक माझ्याकडे येतात. कित्येकवेळा तुम्हीच त्यांना माझ्याकडे पाठवता. तुमच्यापैकी कोणीही हे काम सांभाळायला तयार असेल तर माझी त्याला तयारी आहे."
बरीच चर्चा झाली आणि अखेर सर्वानुमते निर्णय झाला. प्रत्येकाने स्वतंत्र चित्रपट हातात घ्यायचा आणि तो पूर्ण करायचा. इतरांनी त्यात त्यांना सर्वतोपरी मदत करायची. केशवराव धायबर 'राजपूत रमणी' या चित्रपटावर काम करतच होते. शांतारामांनी 'अमरज्योती' या चित्रपटाचे काम हाती घेतले. दामले-फत्तेलाल यांनी 'संत तुकाराम' या चित्रपटाचे काम करण्याची इच्छा दर्शवली. सारे कामाला लागले.
'राजपूत रमणी'
केशवरावांनी 'राजपूत रमणी' या ऐतिहासिक चित्रपटावर काम सुरू केले. संगीत दिग्दर्शक म्हणून केशवराव भोळे यांना घेतले. नारायण आपटे आणि नरोत्तम व्यास यांनी कथानक लिहिले. प्रमुख भूमिकेत नलिनी तर्खड, शांता आपटे, नानासाहेब फाटक यांना घेतले. ‘शांतारामांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनात लक्ष घालू नये, त्यामुळे मला कामात अवघडल्यासारखे होते,’ असे मत केशवरावांनी व्यक्त्त केले. शांतारामांना याचे खूप वाईट वाटले. परंतु त्यांनी इतर कामात केशवरावांना शक्यतो मदत करण्याचा प्रयत्न केला. चित्रपट मुंबईमध्ये प्रदर्शित झाला. परंतु हा चित्रपट चालला नाही. केशवरावांच्या मनाला ते फार लागले.
'अमरज्योती'
शांतारामांनी 'अमरज्योती' या चित्रपटावर काम सुरू केले. चित्रपट सामाजिक विषयावर असला तरी चित्रपटाची मांडणी अतिशय सुरेख पद्धतीने करण्यात आली. संगीताची बाजू मास्टर कृष्णराव यांच्यावर सोपवण्यात आली. सौदामिनी या नायिकेच्या भूमिकेत दुर्गा खोटे काम करत होत्या. शांता आपटे आणि वासंती यांना सौदामिनीच्या अनुयायांच्या भूमिका देण्यात आल्या. चित्रपटाचे दिग्दर्शक होते शांताराम. फत्तेलालदेखील चित्रपटात खूप रस घेत होते. कलाकारांच्या वेशभूषा, इत्यादीमध्ये जातीने लक्ष घालत होते.
'अमरज्योती' पूर्ण झाला. तो मुंबईला प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या सुरुवातीला दिव्याच्या ज्योतीतून प्रकट होणारी चित्रपटाची श्रेय-नामावली पाहून प्रेक्षक भारावून जात व दिग्दर्शक म्हणून शांतारामांचे नाव दिसले, की आनंदाने टाळ्यांचा कडकडाट करीत. या चित्रपटातील मास्टर कृष्णराव यांचे संगीत अतिशय लोकप्रिय झाले. त्यातील 'सुनो सुनो ए बनके प्रानी' या शांता आपटे यांनी गायिलेल्या गाण्याच्या ऐंशी हजार ध्वनिमुद्रिका विकल्या गेल्या. या गाण्याने ग्रामोफोन रेकॉर्ड-विक्रीचा एक नवा उच्चांक स्थापन केला. चंद्रमोहनचे चित्रपटातील कामही गाजले. समीक्षकांनी दुर्गा खोटे यांच्या सफाईदार आणि उत्कृष्ट अभिनयाचा गुणगौरव केला. 'अमरज्योती' पाहिल्यानंतर प्रेक्षक भारावून जात. 'अमरज्योती'चा डंका साऱ्या हिंदुस्थानात वाजला!
व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय फिल्मोत्सवासाठी हा चित्रपट पाठवण्यात आला. आंतरराष्ट्रीय चित्रपट-प्रदर्शनात भाग घेण्यासाठी पाठवलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. तिथे त्याला चांगली मान्यता मिळाली. प्रशस्तिपत्रही मिळाले. भारतातही 'अमरज्योती'ला अनेक मान्यवर संस्थांमार्फत सुवर्णपदके मिळाली.
'संत तुकाराम'
'प्रभात'मध्ये शांताराम दिग्दर्शित 'अमरज्योती' चित्रपट तयार होत होता, त्याचवेळी 'संत तुकाराम' या चित्रपटाचे कामदेखील सुरू झाले. शिवराम वाशीकर यांना पटकथा लेखनाचे काम देण्यात आले. या चित्रपटाचे संगीत महत्त्वाचे होते. ते काम केशवराव भोळे यांच्यावर सोपवण्यात आले. दिग्दर्शनाची जबाबदारी दामले-फत्तेलाल यांनी हातात घेतली. शांताराम चित्रपटाचे दिग्दर्शक नसले, तरी त्यांचा चित्रपटात संपूर्ण सहभाग होता. तुकारामांच्या प्रमुख भूमिकेत विष्णुपंत पागनीस यांना घेण्यात आले. पागनीस पूर्वी नाटकांतून स्त्री-भूमिका करत. भजनी मंडळातूनदेखील ते गात असत. त्यांचा अतिशय सुरेख आणि रसाळ आवाज होता. परंतु चित्रपटात काम करण्याचा त्यांचा पहिलाच प्रसंग होता. त्यांच्याकडून चित्रपटास अनुरूप काम करून घेताना फत्तेलाल थकून जात. अशावेळी शांताराम मध्यस्थी करत आणि प्रसंग निभावून नेत. पागनीस यांनादेखील शांतारामांचा आधार वाटे.
चित्रण पूर्ण झाल्यावर संकलनाचे काम शांतारामांनी केले. 'प्रभात'चे वितरक बाबूराव पै 'संत तुकाराम' या चित्रपटाच्या यशाबाबत साशंक होते. पौराणिक कथांचा लोकांना कंटाळा आला आहे, असे त्यांचे मत होते. शांतारामांना मात्र चित्रपट चालेल यात कोणतीही शंका वाटत नव्हती. त्यांनी त्वेषाने पैज लावली,
"हा चित्रपट चालणार, लोकांना आवडणार याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. तो जर चालला नाही, तर मग यापुढे मी दिग्दर्शन करायचे सोडून देईन."
शांतारामांच्या डोक्यात विचारांचे चक्र चालू झाले. लोक एकदा चित्रपट पाहायला आले की त्यांना चित्रपट आवडेल. पण पौराणिक चित्रपट म्हणून ते आलेच नाहीत तर? त्यांना चित्रपटगृहापर्यंत आणायचे कसे? त्यावर शांतारामांनी एक युक्ती लढवली. दुसऱ्या दिवशी पेपरात सनसनाटी मथळ्याची जाहिरात दिली,
'तुकाराम व जिजाऊ यांचा वडाच्या झाडाखालील लव्ह-सीन!'
शांतारामांना अपेक्षित परिणाम झाला. चित्रपट पाहायला लोकांची झुंबड उडाली. एकदा चित्रपटगृहात पोचल्यावर चित्रपटात प्रेक्षक मुग्ध होऊन चित्रपट पाहू लागले. 'संत तुकाराम' चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला. मुंबईला सेंट्रल सिनेमात 'संत तुकाराम' चित्रपटाने आजवर प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांमध्ये विक्रम प्रस्थापित केला. सेंट्रल सिनेमात तो सतत ५७ आठवडे चालला. व्हेनिस चित्रपट महोत्सवात चित्रपटाला 'ऑनरेबल मेन्शन' असा सन्मान प्राप्त झाला.
'संत तुकाराम'च्या या अभूतपूर्व यशाने दामले आणि फत्तेलाल यांच्याइतकाच शांतारामांना आनंद झाला. परंतु त्याचवेळी 'प्रभात'ला एक धक्का बसला. नैराश्याने असेल अथवा इतर काही कारणाने असेल, केशवराव धायबर यांनी 'प्रभात' सोडण्याचा निर्णय घेतला. केशवराव शांतारामांचे अतिशय जवळचे सहकारी होते. त्यांच्या 'प्रभात' सोडण्याने शांतारामांना फार दुःख झाले.