व्ही शांताराम : १९२९ - १९४२
८. 'प्रभात'चा अश्वमेध
केशवराव धायबर यांनी 'प्रभात' सोडल्यानंतरही 'प्रभात'ची घोडदौड चालूच राहिली. १९३७ ते १९४२ या पाच वर्षांत 'प्रभात'ने नऊ चित्रपट काढले. त्यातील बहुतांश चित्रपट आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरले. याहीपेक्षा मोठे यश म्हणजे या काळात 'प्रभात'ने तत्कालीन सामाजिक विषयांवर चित्रपट काढून जनजागृतीचे फार मोठे काम केले. 'प्रभात'ची कीर्ती संपूर्ण देशात झाली. चित्रपट विश्वात 'प्रभात'चे नाव आदराने घेतले जाऊ लागले.
‘कुंकू’
'प्रभात'ने १९३७ मध्ये 'वहाँ' चित्रपट काढला. आर्य, हिंदुस्तानात जेते म्हणून आले आणि भारतातील मूळचे रहिवासी; अनार्यांना गुलामासारखे वागवू लागले. या संघर्षावर 'वहाँ'चे कथानक आधारित होते. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी के नारायण काळे यांना दिली गेली. संगीत दिग्दर्शक मास्टर कृष्णराव होते. प्रमुख भूमिकेत शांता आपटे, उल्हास, चंद्रमोहन, लीला चिटणीस इत्यादी गुणी कलाकार होते. चित्रपट खूप चालला नाही, परंतु आर्थिकदृष्ट्या खराबही नव्हता.
त्याच वर्षात 'प्रभात'ने ‘कुंकू’ हा चित्रपट प्रदर्शित केला. चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांत होता. हिंदीमध्ये चित्रपटाचे शीर्षक ‘दुनिया ना माने’ ठेवण्यात आले. चित्रपटाची कथा ना ह आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कथेवर आधारित होती. या चित्रपटाचे मुख्य कथानक 'नीरा' या पात्राभोवती फिरते. नीराचे लग्न तिचा मामा एका वयोवृद्ध म्हाताऱ्याशी लावून देतो. तिचा याविरुद्धचा लढा या चित्रपटात दर्शविण्यात आला आहे. लग्नसंस्थेच्या परंपरेविरुद्धचे बंड हा या चित्रपटाचा मुख्य विषय आहे. ना ह आपटे यांनीच या चित्रपटासाठी पटकथा व संवाद लिहिले. चित्रपटाचे दिग्दर्शन शांतारामांनी केले. कलाकारांची वेशभूषा, चित्रण इत्यादी जबाबदारी फत्तेलाल यांनी सांभाळली. प्रमुख भूमिकेत शांता आपटे, केशवराव दाते होते. सर्वसाधारण प्रेक्षकांना आवडणारी नृत्ये, प्रेमप्रसंग या चित्रपटात नव्हती. खऱ्या अर्थाने देशातला हा पहिला ‘प्रायोगिक चित्रपट’ ठरला. चित्रपटाच्या यशाबद्दल अनेकजण साशंक होते. परंतु शांतारामांचा हा धाडसी प्रयोग यशस्वी झाला.
'दुनिया ना माने' मुंबईला ‘कृष्ण सिनेमा’त प्रदर्शित केला गेला. शिवाय एक नवा प्रयोग म्हणून मुंबईच्या फोर्टमधल्या ‘एक्सलसिअर' सिनेमागृहातदेखील दाखवण्यात आला. त्या काळात फोर्ट भागातील सर्व थिएटरमध्ये फक्त इंग्रजी चित्रपट दाखवले जात. 'दुनिया ना माने' 'एक्सलसिअर'मध्ये 'हाउस फुल' गर्दीत चांगला चार आठवडे चालला. कृष्ण सिनेमातही हा चित्रपट २७ आठवडे चालला. त्यातील ‘मन सुद्ध तुझं, गोस्ट आहे प्रिथिविमोलाची तू चाल पुढं, तुला रं गड्या भीति कशाची' हे गाणे खूप गाजले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सतत इतके आठवडे चालणारा हा पहिलाच सामाजिक चित्रपट ठरला. 'दुनिया ना माने' नंतर साऱ्या भारतात प्रदर्शित झाला. चित्रपट ‘व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दाखवण्यात आला आणि तो ज्यूरी व समीक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरला. या चित्रपटास १९३८ चे 'गोहर सुवर्ण पदकही' मिळाले. चित्रपटाचे कथानक खूप गाजले. कथानकावर वर्तमानपत्रातून उलटसुलट चर्चा झाल्या. चित्रपटात दर्शवलेली पुरोगामी भूमिका काहींनी उचलून धरली, तर काहींनी त्याला विरोध केला.
'प्रभात'ने १९३८ मध्ये ‘गोपालकृष्ण’ हा चित्रपट मराठी आणि हिंदीतून काढला. 'प्रभात'ने याच कथानकावर एक मूकचित्रपट काढला होता. तेच कथानक बोलपटाच्या स्वरूपात लोकांसमोर आणले. शिवराम वाशीकरांनी संवाद लिहिले. गांधीजींच्या इंग्रजांविरुद्धच्या लढ्याचे प्रतीकात्मक स्वरूप कथानकाला देण्यात आले. दामले-फत्तेलाल या दोघांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. राजा नेने यांनी या दोघांना सहाय्यक म्हणून काम केले. शांतारामदेखील वेळोवेळी आपले योगदान देत होते. संगीत दिग्दर्शनाची बाजू मास्टर कृष्णराव यांनी सांभाळली. या चित्रपटात प्रमुख भूमिका राम मराठे, शांता आपटे यांनी निभावल्या. चित्रपट यशस्वी ठरला. या संगीतप्रधान चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना अतिशय आवडली. त्यातील मनोरंजक प्रसंग लोकांनी डोक्यावर घेतले.
'माणूस'
शांतारामांचा ‘'माणूस'’ हा चित्रपट १९३९ मध्ये प्रदर्शित झाला. हिंदी चित्रपट ‘आदमी’ या नावाने प्रेक्षकांसमोर आला. 'माणूस' चित्रपटाच्या निर्मितीत शांतारामांनी आपले सर्वस्व पणाला लावले. एका जुगाराच्या अड्ड्यावर छापा घालताना ‘माणूस’च्या नायकाची एका वेश्येशी गाठ पडते. तिच्याबद्दल नायकाच्या मनात दयेची भावना उत्पन्न होते. तो तिच्यावर प्रेम करू लागतो. त्या दोघांच्या आयुष्यात घडणाऱ्या पुढील घडामोडींवर चित्रपटाची कथा आधारलेली होती. चित्रपट वास्तविक वाटावा यासाठी शांतारामांनी पोलिसांचे जीवन समजावून घेतले. त्यानंतर ते स्वतः वेश्यावस्तीत हिंडले आणि वेश्यांचे खडतर जीवन समजावून घेतले. शांतारामांनी भास्करराव अर्मेबल यांना कथेची रूपरेखा सांगून त्या आधारे संपूर्ण कथा लिहून घेतली. अनंत काणेकरांनी 'माणूस'च्या मराठी आवृत्तीचे संवाद लिहिले. हिंदी आवृत्तीचे संवाद मुन्शी अजीज यांनी लिहिले. संगीताची जबाबदारी मास्टर कृष्णराव यांच्यावर सोपवली. शाहू मोडक, शांता हुबळीकर, राम मराठे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘आता कशाला उद्याची बात’ हे त्यातील गाणे खूपच गाजले.
चित्रीकरण सुरू झाले आणि सर्वांना निर्मितीचा नशा चढला. शांताराम कामात इतके रंगून जात, की दिवस मावळला तरी हे चित्रीकरण कधी थांबूच नये असे त्यांना वाटे. चित्रण पूर्ण झाले आणि संकलनाची वेळ आली. प्रसंगातील भावना आणि चित्रपटाचा वेग याचा मेळ साधत शांताराम चित्रपटात हरवून गेले. त्यातच बातमी आली, की मुंबईतल्या ‘सेंट्रल सिनेमा’मध्ये एका आठवड्याच्या आत नवीन सिनेमा आणला नाही, तर ‘सेंट्रल’बरोबरचे कॉन्ट्रॅक्ट हातातून जाईल. थिएटर परत हातात यायला अनेक महिने लागतील. शांतारामांना कॉन्ट्रॅक्ट हातून जाऊ द्यायचे नव्हते. शांतारामांनी ईर्षेला पेटून सांगितले,
"थिएटर हातचे जाऊ देऊ नका. तुम्ही म्हणाल त्या तारखेला तुम्हाला चित्रपट तयार करून मिळेल."
शांताराम कामाला लागले. त्यानंतर कित्येक दिवस सूर्य उगवत होता, रात्र होत होती, पण शांतारामांना त्याचे भान नव्हते. जिद्दीला पेटलेल्या शांतारामांनी ‘माणूस’ चित्रपट ठरलेल्या दिवशी प्रदर्शित केला. इतकेच नाही, तर चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. चित्रपटाचा दुःखद शेवट पाहून प्रेक्षकांचे मन हेलावत होते. त्यातच चित्रपटाचे यश दिसून येत होते. आर्थिक यशाच्या दृष्टीने ‘माणूस’ चित्रपट कमी चालला तरी शांतारामांनी निर्माण केलेल्या काही अजरामर कलाकृतींपैकी एक ठरला! ‘सेंट्रल सिनेमा’मध्ये बारा आठवड्यांनंतर चित्रपट काढण्यात आला. 'माणूस' चित्रपटाच्या निर्मितीचा शांतारामांच्या प्रकृतीवर एवढा परिणाम झाला, की डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला.
‘संत ज्ञानेश्वर’
'प्रभात'ने १९३९ मध्येच ‘संत ज्ञानेश्वर’ हा चित्रपटदेखील काढला. चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांत होता. दामले-फत्तेलाल यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली. पटकथा लेखनासाठी शिवराम वाशीकर यांना निवडण्यात आले. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी केशवराव भोळे यांच्यावर सोपवण्यात आली. यशवंत, शाहू मोडक, दत्ता धर्माधिकारी, सुमती गुप्ते अशा दिग्गज कलाकारांना अभिनयाची जबाबदारी देण्यात आली. चित्रपटाचे संकलन अर्थात शांतारामांनी केले. चित्रपट ३६ आठवडे चालला. अमेरिकेतही हा चित्रपट दाखवण्यात आला. ‘संत ज्ञानेश्वर’ हा अमेरिकेत झळकणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. वसंत देसाई हा तरुण 'प्रभात'मध्ये प्रथम नट म्हणून आला. परंतु त्याचे संगीतातील कौशल्य पाहून त्याला संगीत विभागात केशवराव भोळे यांच्या हाताखाली ठेवण्यात आले. वसंत देसाई यांच्यामधील चमक शांतारामांनी हेरली आणि त्याला वेळोवेळी कामाची संधी दिली. त्याचबरोबर दामले-फत्तेलाल यांच्या चित्रपटांसाठी राजा नेने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. ‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपटात ज्ञानेश्वरांच्या एका लहानपणीच्या मैत्रिणीचे दृश्य शांतारामांनी आग्रहाने घातले. त्या मैत्रिणीने व्यक्त केलेल्या मूक भावना प्रेक्षकांना खूप आवडल्या.
'प्रभात'मध्ये चित्रपट वितरणाचे कामदेखील शांताराम पाहात असत. 'प्रभात'ची स्वतःची एक वितरण कंपनी असावी आणि तिचे देशभर जाळे असावे, असे त्यांना वाटू लागले. कामाच्या व्यापात शांताराम या कामाला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. तेव्हा कोण्या जबाबदार व्यक्तीने हे काम करावे असे त्यांना वाटू लागले. बाबूराव पै 'प्रभात'चे मुंबईमधील वितरक होते. चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचे मोठे नाव होते. त्यांना 'प्रभात'मध्ये पाचवे भागीदार म्हणून घ्यावे असे शांतारामांना वाटले. दामले-फत्तेलाल यांना आपला विचार त्यांनी पटवून दिला आणि बाबूराव पै यांना 'प्रभात'चे पाचवे भागीदार करून घेण्यात आले.
दक्षिण भारतात 'प्रभात'चे चित्रपट खूप चालत. दक्षिण भारतात शांतारामांचे अनेक चाहते होते. मद्रासच्या एका वितरकाने ‘प्रभात’ या नावाचे एक चित्रपटगृह सुरू केले. या चित्रपटगृहाचे उदघाटन करण्यासाठी त्याने शांतारामांना निमंत्रण दिले. शांताराम आणि विमलाबाई उदघाटनासाठी मद्रासला गेले. लोकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. शांतारामांना पाहायला लोकांची झुंबड उडाली. शांताराम एव्हाना प्रसिद्धीच्या झोतात आले होते. परंतु त्यांनाही मद्रासमधील अनुभव सुखद धक्का देऊन गेला.
‘शेजारी’
महात्मा गांधींच्या ब्रिटिशांविरोधातील अहिंसावादी लढ्याने १९४० मध्ये जोर धरला होता. हिंदुस्तानातील स्वराज्याची चळवळ दडपण्यासाठी ब्रिटिशांनी ‘फोडा आणि झोडा’ तंत्राचा अवलंब केला. देशातील हिंदू आणि मुसलमान यांच्यात फूट पाडण्याचे पद्धतशीर प्रयत्न ते करू लागले. यातून देशात अनेक हिंदू-मुसलमान दंगे उसळले. या संबंधी आपण एक चित्रपट काढावा असा विचार शांतारामांच्या मनात आला. अर्थात सेन्सॉरमधून वाट काढून प्रभावी चित्रपट लोकांसमोर ठेवणे, ही शांतारामांसाठी तारेवरची कसरत होती.
प्रभावी लेखक विश्राम बेडेकर यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. त्यांची ‘रणांगण’ ही कादंबरी वाचकांनी उचलून धरली होती. शांतारामांनी विश्राम बेडेकरांकडे कथालेखनाची जबाबदारी सोपवली. केशवराव दाते आणि गजानन जहागीरदार यांना प्रमुख भूमिका देण्यात आल्या. 'प्रभात'मधील शांता आपटे यांनी 'प्रभात'बरोबरचा करार संपवून इतर चित्रपट कंपन्यांची वाट धरली होती. शांतारामांना नवीन चित्रपटासाठी एका चांगल्या नटीची आवश्यकता होती. त्याच सुमारास ‘जयश्री कामुलकर’ शांतारामांना भेटायला आल्या. पाणीदार डोळे आणि आकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या जयश्रीबाई गायनातही चांगल्या होत्या. शांतारामांनी नवीन चित्रपटासाठी जयश्रीबाईंची निवड केली. चित्रपटाचे कथानक हे एकमेकांशेजारी राहाणाऱ्या दोन वृद्ध मित्रांभोवती होते. त्यातील एक हिंदू व दुसरा मुसलमान असतो. त्या दोघांमधील प्रेम, गैरसमज आणि त्यातून घडणाऱ्या घटना यावर चित्रपट आपली वाटचाल करतो. या चित्रपटाने हिंदू किंवा मुसलमान यापैकी कोणीही दुखावले जाऊ नये याची काळजी घेत शांतारामांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. चित्रण सुरू झाले आणि शांतारामांनी स्वतःला चित्रपट निर्मितीत संपूर्ण झोकून दिले. चित्रपटाचा शेवट दुःखांताने होतो. चित्रपटाचा क्लायमॅक्स शांतारामांनी आपल्या ठेवणीतल्या शैलीने दिग्दर्शित केला.
चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पत्रकारांनी चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले. त्याच सुमारास बिहारमध्ये हिंदू-मुसलमान दंगा उसळला. तेथे ‘पडोसी’ चित्रपट लागला आणि दंगे आटोक्यात आले. मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या भाषणाने जे साध्य होणार नाही, ते 'शेजारी' आणि 'पडोसी' चित्रपटांमुळे होऊ शकले!
‘शेजारी’ या चित्रपटानंतर 'प्रभात'ने ‘संत सखू’ आणि ‘रामशास्त्री’ हे दोन चित्रपट करण्यासाठी घेतले. ‘संत सखू’ या चित्रपटाची पटकथा शिवराम वाशीकर यांनी लिहिली. संगीत केशवराव भोळे यांनी दिले. हंसा वाडकर यांनी प्रमुख भूमिका केली. ‘रामशास्त्री’ चित्रपटाची कथा सुखटणकर यांनी लिहिली. पेशवेकालीन निःस्पृह न्यायाधीश रामशास्त्री यांच्या जीवनावर आधारलेले हे कथानक होते. दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन दामले-फत्तेलाल यांनी केले.
चित्रपटांचे कथानक निवडताना आणि चित्रपटांची प्राथमिक जुळवणी करताना शांताराम या चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी होते. परंतु चित्रणाची सुरुवात झाली तेव्हा दामले-फत्तेलाल यांनी शांतारामांना या चित्रपटात सहभागी केले नाही. यापूर्वीही दामले-फत्तेलाल यांनी स्वतंत्र दिग्दर्शन केले होते, परंतु त्यात शांतारामांचा सहयोग सर्वतोपरी असे. यावेळी मात्र चित्रपटांची सर्व निर्मिती शांतारामांच्या अपरोक्ष झाली.
‘संत सखू’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि सपशेल आपटला. ‘रामशास्त्री’ प्रेक्षकांसमोर येईपर्यंत शांतारामांनी 'प्रभात' सोडली होती.