व्ही शांताराम : १९२९ - १९४२
६. रंगांची दुनिया
एव्हाना पुणे-मुंबईकडे वीज आली होती. कोल्हापूरमध्ये मात्र त्याचा अभाव होता. इतर फिल्म कंपन्यांच्या तुलनेत चांगले चित्रपट काढायचे असतील, तर विजेचा वापर आवश्यक होता. चित्रपटविश्वाची बाजारपेठ मुख्यत्वेकरून मुंबईत होती. त्या दृष्टीनेही कंपनीचे बस्तान मुंबईजवळ हलवणे व्यावहारिकदृष्ट्या आवश्यक होते. अखेर कंपनी पुण्याला स्थलांतरित करण्याचा निर्णय सर्वांनी एकमताने घेतला. 'प्रभात'ने पुण्यात एरंडवण्यात सरदार नातू यांच्या मालकीची आठ एकर जमीन खरेदी केली. पुढेमागे अधिक जमीन लागल्यास आसपास मुबलक जमीन उपलब्ध होती.
‘प्रभात’चा व्याप वाढत होता. घराची आर्थिक परिस्थिती सुधारली होती. परंतु या गडबडीत शांतारामांचे घराकडे दुर्लक्ष होत होते. लग्न होऊन दहा वर्षे उलटली होती. ‘घराकडे पुरेसा वेळ दिला जात नाही’ अशी पत्नी विमलाबाईंची रास्त तक्रार असे. शांतारामांनादेखील त्याची खंत होती. परंतु कामाने झपाटलेल्या शांतारामांना ‘प्रभात’शिवाय इतर कशालाच वेळ देता येत नव्हता. ‘प्रभात’ची स्थापना झाली आणि लगेच ९ ऑगस्ट १९२९ रोजी शांताराम-विमलाबाईंना मुलगा झाला. शांतारामांच्या आग्रहाखातर त्याचे नावही प्रभातकुमार ठेवण्यात आले. ११ सप्टेंबर १९३१ रोजी दांपत्याला कन्यारत्न झाले. तिचे नामकरण सरोज असे करण्यात आले. दोन्ही मुले शांतारामांना ‘बा’ अशी हाक मारत. आई-बापू पूर्वीपेक्षा बऱ्याच सुस्थितीत होते. पुण्याला गेल्यावर आई-बापूंसाठी स्वतःचे असे एक छान घर बांधण्याचा शांतारामांचा विचार होता.
‘सैरंध्री’
चित्रपट क्षेत्रात झपाट्याने बदल होत होते. पाश्चात्य देशांत रंगीत चित्रपट निर्माण होऊ लागले होते. हिंदुस्तानात मात्र अजून रंगीत चित्रपट आला नव्हता. अशात आग्फा कंपनीने रंगीत चित्रपटासाठी फिल्म देण्याचा प्रस्ताव ‘प्रभात’समोर मांडला. कंपनीने ‘बायपॅक पद्धती’ने रंगीत चित्रपट बनवण्याचे तंत्र विकसित केले होते. या तंत्रात चित्रण करताना कॅमेऱ्यामध्ये एकाचवेळी एकामागे एक अशा दोन निगेटिव्ह फिल्म्स एक्सपोज केल्या जातात. समोरची फिल्म निळ्या रंगासाठी संवेदनशील असते, तर मागील फिल्म केशरी रंगासाठी संवेदनशील असते. चित्रपट मुद्रित करताना दोन्ही निगेटिव्ह फिल्म एकाच पॉझिटिव्ह फिल्मवर मुद्रित केल्या जातात. या पद्धतीने चित्रीत केलेले एक रीळ कंपनीने 'प्रभात' मध्ये दाखवले. चाचणीच्या स्वरूपात ‘बायपॅक पद्धती’ने चित्रण करण्यात आले आणि मुद्रणासाठी जर्मनीला पाठवण्यात आले. त्यातून समाधानकारक परिणाम मिळाल्यावर या पद्धतीने रंगीत चित्रपट काढण्याचे 'प्रभात'ने ठरवले. हिंदुस्तानातील पहिला रंगीत चित्रपट काढण्याची तयारी सुरू झाली.
‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ने ‘सैरंध्री’ या चित्रपटाने सुरुवात केली होती. सर्वांना या कथानकाची चांगली ओळख होती. आपला नवीन चित्रपट ‘सैरंध्री’ याच नावाने काढण्याचे सर्वांनी ठरवले. दिग्दर्शनाची जबाबदारी अर्थात शांतारामांवर सोपवण्यात आली. चित्रणाची जबाबदारी दामले यांनी स्वीकारली. संगीत दिग्दर्शन गोविंदराव टेंबे यांनी केले. मा. विनायक यांना प्रमुख भूमिकेत घेण्यात आले. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले. सर्वांनी आपापली बाजू समर्थपणे सांभाळली. चित्रीकरण पूर्ण झाले. देशात रंगीत फिल्मच्या मुद्रणाची व्यवस्था नव्हती. चित्रण केलेल्या दोन्ही निगेटिव्ह्ज जर्मनीला पाठवणे आवश्यक होते. चित्रणाची जबाबदारी दामले यांनी घेतली होती. त्यामुळे मुद्रण करून घेण्यासाठी दामले यांनी जर्मनीला जावे हे अपेक्षित होते. परंतु या कामासाठी शांतारामांनीच जर्मनीला जावे असा त्यांनी आग्रह धरला. अखेर शांतारामांनी ते मान्य केले.
शांतारामांची जर्मनीला जाण्याची सर्व तयारी झाली. ‘लॉइड ट्रिस्टिनो’ नावाच्या जहाजाचे तिकीट काढण्यात आले. मुंबईच्या बंदरावर विमलाबाई, मुले आणि आप्त मंडळी शांतारामांना निरोप द्यायला आली होती. 'सैरंध्री'च्या निगेटिव्ह्ज घेऊन शांतारामांनी जर्मनीला प्रयाण केले. तीन आठवड्यांनी शांताराम बर्लिनला पोहोचले. आग्फा कंपनीने शांतारामांची राहण्याची व्यवस्था केली होती. त्यांची प्रयोगशाळेत बसण्याची व्यवस्था केली होती. कार्यालयातील दैनंदिन कामासाठी ‘जेनी’ नावाची एक युवती मदतनीस देऊ केली होती. जेनीच्या मदतीने शांतारामांनी आणलेल्या बायोपॅक निगेटिव्ह्जच्या संकलनाचे काम सुरू झाले. जर्मनीमध्येदेखील बायोपॅक तंत्रज्ञान नवीन होते. त्यामुळे कामाला बराच वेळ लागत होता. जोडलेल्या निगेटिव्ह्ज शांताराम मुद्रणासाठी देत होते. काही दिवसांनी प्रयोशाळेचे तंत्रज्ञ पीटरसन यांनी धक्कादायक बातमी दिली,
“निगेटिव्ह्ज बरोबर एक्स्पोज झालेल्या नाहीत. त्यामुळे रंगीत प्रिंट चांगल्या येत नाहीत. परंतु दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.”
शांतारामांवर जणू आकाश कोसळले. शांतारामांनीदेखील त्या प्रिंट्स पहिल्या. खूपच खराब होत्या. पीटरसन `यांनी आग्फा कंपनीतल्या तंत्रज्ञांबरोबर बरीच चर्चा आणि अभ्यास केला. काही सुधारणा करून त्यांनी काही समाधानकारक प्रिंट तयार केल्या. शांतारामांनी नव्या प्रिंट्स पाहिल्या. या प्रिंट्स रंगाच्या दृष्टीने अगदी शंभर टक्के नव्हे, पण बऱ्याच समाधानकारक दिसत होत्या. शांतारामांच्या मनावरचे ओझे बरेच उतरले होते. उरलेल्या निगेटिव्ह्जचे संकलन करून प्रिंटिंगला देण्याच्या तयारीला ते लागले. अखेर 'सैरंध्री'चे पूर्ण प्रिंट तयार झाले. प्रिंट निघणारच नव्हते, त्यापेक्षा थोडेतरी समाधानकारक प्रिंट निघाले होते यातच शांतारामांना समाधान होते. शांतारामांनी चित्रपट पूर्णपणे पाहिला. तो त्यांच्या इतर चित्रपटांइतका परिणामकारक त्यांना वाटला नाही. रंग तितकेसे चांगले नसल्यामुळे तसे वाटत होते. प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया असेल याची शांतारामांना काळजी होती. प्रिंट तयार झाल्यावर ती त्यांनी विमानाने मुंबईला पाठवून दिली. दुर्दैवाने शांतारामांचा अंदाज खरा ठरला. 'सैरंध्री'ला देशातला पहिला रंगीत चित्रपट म्हणून बहुमान मिळाला असला, तरी प्रेक्षकांना चित्रपट आवडला नाही.
प्रिंट काढण्याचे काम चालू असताना सिमेन्स कंपनीशी बोलून शांतारामांनी 'सैरंध्री' चित्रपटांच्या गाण्यांच्या फिल्मवरून परस्पर रेकॉर्ड्स तयार करून घेतल्या. त्याकाळी ग्रामोफोन कंपन्या रेकॉर्ड तयार करण्यासाठी कलाकारांकडून पुन्हा वेगळे गाणे गाऊन घेत असत. चित्रपटाचे प्रिंटिंग झाले त्या प्रयोगशाळेतील व्यवस्था, उपकरणे यांचादेखील शांताराम यांना अभ्यास करता आला. आधुनिकीकरणाने चित्रपटाची गुणवत्तादेखील सुधारते, माणसांची आणि कामाच्या वेळेची बचत कशी करता येते याची जाणीव त्यांना झाली. याशिवाय सिमेन्स कंपनीमधील इंटरकॉमनेदेखील शांतारामांना आकर्षित केले. 'प्रभात'च्या पुण्याच्या कार्यालयासाठी त्यांनी इंटरकॉम विकत घेतला. जर्मनीतील वास्तव्य संपवून शांताराम बर्लिनहून परत निघाले. जेनी त्यांना निरोप द्यायला स्टेशनवर आली होती. भारताला जाणाऱ्या जहाजाने ते मुंबई बंदरात पोचले. विमलाबाई आणि मुले त्यांच्या स्वागतासाठी बंदरावर आले होते.
‘अमृतमंथन’
व्यावहारिकदृष्ट्या 'सैरंध्री' चित्रपट 'प्रभात'ला लाभदायक ठरला नाही. नोव्हेंबर १९३३ मध्ये 'प्रभात'ने पुण्याला स्तलांतर केले. बरेच कलाकार, तंत्रज्ञ कोल्हापूर सोडून पुण्याला यायला तयार नव्हते. त्यांनी 'प्रभात' सोडून दिली. त्यात गोविंदराव टेंबे, बाबूराव पेंढारकर, लीलाबाई, विनायक यांच्यासारख्यांचा समावेश होता. हे सर्व शाहू महाराजांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या ‘कोल्हापूर सिनेटोन’ या कंपनीत गेले. कलाकार आणि तंत्रज्ञांची नवी फळी तयार करण्याची वेळ 'प्रभात'वर आली होती. अशा परिस्थितीत एखादा यश देणारा चित्रपट काढणे आवश्यक होते. शांतारामांनी 'अमृतमंथन' हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत काढायचे ठरवले. सुप्रसिद्ध कादंबरीकार ना ह आपटे 'मधुकर' नावाचे मासिक प्रकाशित करीत असत. त्यांचा छापखाना पुण्याजवळ कोरेगाव येथे होता. शांतारामांनी ना ह आपटे यांना लेखनाची जबाबदारी दिली, तर त्यांचे सहाय्यक शांताराम आठवले यांच्याकडे काव्याची जबाबदारी सोपवली. मराठी चित्रपटातील प्रमुख भूमिका केशवराव दाते यांनी निभावली तर हिंदीमध्ये चंद्रमोहन या नवीन कलाकाराला संधी देण्यात आली. नायिकेच्या भूमिकेत शांता आपटे यांना घेण्यात आले. १९३४ मध्ये 'अमृतमंथन' मुंबईला प्रथम हिंदीत प्रदर्शित झाला. प्रेक्षकांची तिकिटाच्या खिडकीवर तोबा गर्दी उडाली. तिन्ही खेळांच्या वेळेला थिएटरच्या आत व बाहेर अफाट गर्दी होत असे. हजारो लोक निराश होऊन परत जात असत. साऱ्या देशात 'अमृतमंथन' भरपूर चालला. मुंबईमध्ये चित्रपटाने रौप्यमहोत्सव पार करून तीस आठवड्यापर्यंत मजल मारली. तीस आठवडे चालणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. 'अमृतमंथन'ने 'प्रभात'चे नाव पुन्हा एकदा उंच शिखरावर पोचवले.
'अमृतमंथन' चित्रपटाच्या पाठोपाठ 'प्रभात'ने पूर्वी काढलेल्या ‘चंद्रसेना’ या मूकपटावर आता बोलपट काढण्याचे ठरवले. शांतारामांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, संगीत केशवराव भोळे यांचे होते. १९३५ मध्ये मुंबईतील मिनर्व्हामध्ये चित्रपट प्रदर्शित केला गेला. मूळ मूकपटाची आठवण ताजी असल्यामुळे कथेच्या दृष्टीने प्रेक्षकांना त्यात नावीन्य वाटले नाही. चित्रपट साफ कोसळला. त्यानंतर शांतारामांनी वॉल्ट डिस्नेच्या धर्तीवर ‘जंबूकाका’ नावाचा ऍनिमेशन लघुपट काढला. भारतातील पहिला व्यंगचित्रपट काढण्याचे श्रेय 'प्रभात'ला मिळाले, परंतु तोही चालला नाही. अर्थात 'अमृतमंथन'च्या आर्थिक यशात ही दोन्ही अपयशे 'प्रभात'ने पचवली.
बालगंधर्वांनी आपली नाटक कंपनी बंद केली होती. ते कर्जबाजारी झाले होते. शांतारामांना त्यांच्याबद्दल खूप आदर होता. त्यांना मदतीचा हात म्हणून त्यांना घेऊन एक चित्रपट काढण्याचे शांतारामांनी ठरवले. एकनाथ महाराजांच्या कथेवर आधारित ‘महात्मा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. या चित्रपटात संगीत दिग्दर्शकाचे काम महत्त्वाचे होते. त्यासाठी शांतारामांनी मास्टर कृष्णराव यांना निवडले. मुंबई प्रांतामध्ये 'महात्मा' चित्रपटाला सेन्सॉरने बंदी घातली. महात्मा गांधी यांच्या नावाचा प्रसिद्धीसाठी वापर केला जात आहे, असा आक्षेप घेतला गेला. अखेर मुंबई प्रांतात चित्रपट ‘धर्मात्मा’ या शीर्षकाखाली दाखवला गेला. देशाच्या इतर भागात मात्र तो 'महात्मा' या शीर्षकाखालीच दाखवला गेला. चित्रपट देशभर चालला. बालगंधर्वांना मदतीचा हात देण्याचे शांतारामांचे स्वप्न पूर्ण झाले.