व्ही शांताराम  : १९०१  - १९२९ 

४. अनुभवांच्या वाटेवर

आगीच्या धक्क्यातून सावरून कंपनी नव्या जोमाने काम करू लागली. कंपनीने ‘सिंहगड’ हा चित्रपट करायला घेतला. सरदार नेसरीकर आणि इतर काही धनिकांकडून गुंतवणूक मिळाली. कंपनीने अमेरिकन कंपनीचा अद्ययावत कॅमेरा घेतला. कॅमेरा एकाच ठिकाणी ठेवून जवळचे आणि लांबचे दृश्य घेण्याची सोय या कॅमेऱ्यात होती. स्वतः बाबूराव पेंटर शिवाजी झाले. शांतारामला शेलारमामाची भूमिका मिळाली. बाह्य चित्रीकरणाच्या वेळी बाबूराव पेंटर यांना दिग्दर्शनात मदत करण्याची संधीही त्याला मिळाली. ‘सिंहगड’मधील रात्रीचे दृश्य चंद्रज्योतीच्या उजेडात चित्रीत करण्यात आले. संकलनाची बरीचशी जबाबदारी पेंटर यांनी शांतारामला दिली. ‘सिंहगड’ मुंबईमध्ये प्रदर्शित झाला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. 

कंपनीने १९२३ ते १९२७ या काळात ‘श्रीकृष्णावतार’, ‘सती पद्मिनी’, ‘शहाला शह’, ‘सावकारी पाश’, ‘राणा हमीर’, ‘मायाबाजार’, ‘गजगौरी’, ‘भक्त प्रल्हाद’, ‘मुरलीवाला’, ‘सती सावित्री’ असे दहा    चित्रपट काढले. सर्व चित्रपटांत शांतारामने कोणती-ना-कोणती भूमिका निभावली. ‘पद्मिनी’मध्ये शांतारामने पद्मिनीच्या नवऱ्याची भूमिका केली. ‘शहाला शह’मध्ये शांताराम आदिलशहा झाला. ‘सावकारी पाश’ मध्ये त्याने नायकाची भूमिका बजावली. ‘भक्त प्रल्हाद’ मध्ये एक  लहान भूमिका केली; तर  'गजगौरी'मध्ये त्याने अर्जुनाची भूमिका केली. ‘मुरलीवाला’मध्ये राधेच्या असंतुष्ट पतीची भूमिका केली. याशिवाय सर्व चित्रपटांत संकलन आणि इतर आवश्यक विभागांतदेखील शांतारामने सर्वतोपरी योगदान दिले. 

संसाराची घडी 

शांताराम कंपनीमध्ये रुजू झाला तेव्हा त्याला पगार नव्हता. परंतु राहणे आणि जेवण कंपनी देत आहे, असा शांतारामचा समज होता. परंतु एके दिवशी त्याचा भ्रमनिरास झाला. शांतारामच्या जेवणाचे पैसे बाबूराव पेंढारकर यांच्या पगारातून कापले जात असल्याचे त्याला कळले. शांतारामला अतिशय दुःख झाले. ‘आपल्या जेवणाचा बोजा बाबूरावांवर का?’ त्याने बाबूरावांकडे हा विषय काढला. ‘तुला पगार मिळाल्यावर पाहू’ असे उत्तर देऊन त्यांनी तो विषय उडवून लावला. वडिलांकडे पैसे मागावेत असा विचार शांतारामच्या मनात आला. परंतु वडिलांची परिस्थिती काही फार चांगली नव्हती आणि वडिलांकडून पैसे घेणार नाही असा निश्चय त्याने आधीच केला होता. शांतारामला काय करावे कळेना. परंतु दैवाने त्याला साथ दिली. कंपनीने शांतारामला महिना नऊ रुपये पगार सुरू केला. शांतारामचा जेवणाचा आणि वरचा खर्च त्यातून भागू लागला.

‘सिंहगड’च्या यशानंतर कंपनीने शांतारामचा पगार नऊ वरून पंधरा रुपये केला. वडिलांचे हॉटेल बंद झाले होते. शांतारामने सर्वांना कोल्हापूरला येण्याचा आग्रह केला. आई-वडील आणि तीन धाकटे भाऊ हुबळी सोडून कोल्हापूरला राहायला आले. मोठा काशिनाथ मात्र मुंबईला नोकरीला होता. त्याचे लग्नही करून देण्यात आले आणि त्याचा संसार मुंबईत सुरू झाला होता. कंपनीने शांतारामच्या वडिलांना हिशोबनीस या हुद्द्यावर नोकरी दिली. त्यांना पंचवीस रुपये पगार मिळू लागला. शांतारामचा पगारही वाढवून पन्नास रुपये करण्यात आला. बऱ्याच वर्षांनंतर शांताराम आणि त्याच्या कुटुंबाला स्थैर्य लाभले.  शांताराम बावीस वर्षांचा झाला होता. त्या सुमारास शांतारामसाठी फलटणच्या मुगलखोड यांच्या मुलीचे स्थळ सांगून आले. शांताराम प्रथमतः लग्नाला तयार नव्हता. परंतु अखेर आई-वडिलांच्या आग्रहाखातर मुलगी बघण्यासाठी सारे फलटणला गेले. मुलीला नकार देण्याचे कारण नव्हते. शांतारामने लग्नाला होकार दिला. ९ जून १९२२ रोजी अगदी साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला आणि बारा वर्षांची अंबू मुगळखोड, ‘सौ. विमल व्ही शांताराम’ झाली.

नेताजी पालकर 

देशात एव्हाना अनेक फिल्म कंपन्या उभ्या राहिल्या होत्या. चित्रपटांच्या निर्मितीत चढाओढही सुरू झाली होती. इतरांच्या मानाने कंपनीचे चित्रपट कमी होऊ लागले होते. बाबूराव पेंटर यांचे कामातील लक्ष थोडे कमी झाले होते. चित्रपटातून होणारी मिळकत कमी झाली. परिणामी सर्वांचे पगार तुंबले. कंपनीच्या वातावरणात असंतोष पसरू लागला. शांतारामच्या मनात मात्र बाबूराव पेंटर यांच्याबद्दल आदर कायम होता. सरदार नेसरीकरांनी कंपनीत गुंतवणूक केलेली होती. परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले. नवीन सहकाऱ्यांना जास्त जबाबदारी देऊन कंपनीच्या कामात सुधारणा करता येतील, असे त्यांनी बाबूराव पेंटर यांना सुचवले. एक प्रयोग म्हणून शांताराम आणि केशवराव धायबर यांना दिग्दर्शनाची स्वतंत्र जबाबदारी द्यावी असेही त्यांनी सुचवले. बाबूराव पेंटर यांना कल्पना फारशी रुचली नसावी, परंतु नेसरीकरांची सूचना मानण्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. नेसरीकर आणि बाबूराव पेंटर यांनी खोलीत बोलावून शांतारामला त्यांचा निर्णय सांगितला. शांतारामचा आनंद गगनात मावेना. एक फार मोठी संधी त्याच्याकडे चालून आली होती.

शांताराम आणि केशवराव चित्रपटाच्या कथानकावर विचार करू लागले. लोकांची आवड लक्षात घेऊन ऐतिहासिक चित्रपट काढावा यावर दोघांची सहमती झाली. नेताजी पालकरांच्या शौर्यगाथेवर चित्रपट काढण्याचे ठरले. दोघांनी बाबूराव पेंटर यांना कथानकाची कल्पना दिली. परंतु त्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही. नाउमेद न होता दोघेही कामाला लागले. दामले आणि फत्तेलालही मदत करू लागले. नेताजी पालकर यांच्या भूमिकेसाठी बाळासाहेब यादव यांची निवड करण्यात आली. छायाचित्रीकरणाची जबाबदारी फत्तेलाल यांच्यावर सोपवण्यात आली. स्टुडिओमधील चित्रीकरण झाल्यानंतर बाह्यचित्रीकरणासाठी कोल्हापूरपासून जवळच असलेल्या शिंगणापूरची निवड करण्यात आली. रात्रीच्या युद्धाचे चित्रण शांतारामने तोफांच्या गोळाबारीत होणाऱ्या उजेडात केले. अंधार आणि उजाडाचे संमिश्र वातावरण खूपच परिणामकारक झाले. चित्रण अतिशय उत्साहात आणि वेगाने झाले. परंतु कोल्हापूरहून पेंटरांनी निरोप धाडला,

“शूटिंग खूप लांबत चालले आहे. खर्च वाढत चालला आहे. लवकर आटपा. नाहीतर जेवणाऐवजी चुरमुरे पाठवू तुम्हा सर्वांना खायला!"

निरोपाने सर्वजण हिरमुसले. चित्रणावर सोपस्कार झाल्यावर चित्रपट मुंबईला प्रदर्शनासाठी पाठवण्यात आला. १९२७ मध्येच चित्रपट प्रदर्शित झाला.  चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला. चित्रपटाला अनेक पारितोषिके मिळाली. पारितोषिक घेण्यासाठी बाबूराव पेंटर एकटेच गेले. बातम्यांमध्ये दोघांचा उल्लेख कोठेही नव्हता. शांतारामला हा अनुभव दुःख देऊन गेला. ‘नेताजी पालकर’ हा चित्रपट शांतारामने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ठरला. 

‘नेताजी पालकर’चा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नेसरीकरांनी दामले, फत्तेलाल आणि बाळासाहेब यादव यांना आणखी एका चित्रपटाची निर्मिती करण्यास सांगितले. या चित्रपटासाठी ‘महारथी कर्ण’ या कथेची निवड करण्यात आली. शांतारामला या चित्रपटात द्रोणाचार्यांची भूमिका देण्यात आली. याशिवाय दामले-फत्तेलाल यांना दिग्दर्शनातदेखील शांताराम मदत करू लागला. चित्रीकरण झाल्यानंतर संकलनाची जबाबदारी मात्र संपूर्णपणे शांतारामवर टाकण्यात आली. १९२८ मध्ये चित्रपटाचे प्रदर्शन मुंबईमध्ये करण्यात आले. दामले, फत्तेलाल आणि शांताराम प्रदर्शनाला उपास्थित राहिले. हा चित्रपटदेखील खूप चालला. 


भावनिक दुरावा 

‘नेताजी पालकर’ आणि ‘महारथी कर्ण’च्या यशानंतर कंपनी आपल्यावर खुश होईल याबद्दल सर्वांना विश्वास होता. परंतु लवकरच त्यांचा भ्रमनिरास झाला. कंपनीने मोती गिडवानी आणि गुणे अशा दोन व्यक्तींना कंपनीमध्ये घेतले. गिडवानी लंडनला चित्रपटाचे तंत्र शिकून आले होते. ते बाबूराव पेंटर यांचे मित्र आणि चित्रण तंत्रज्ञ होते. त्यावेळी शांताराम संकलन सांभाळत होता, तर दामले आणि फत्तेलाल तांत्रिक कामे सांभाळत होते. त्यामुळे नवीन लोकांना आणण्याची कंपनीला काय आवश्यकता होती, हे कोणाला समजले नाही. एवढेच नव्हे, तर गिडवानी यांना सर्वांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी दिली गेली. त्यांचा पगार शांतारामपेक्षा तीन ते चार पट जास्त होता. आजवर शांतारामने पगाराचा कधीच विचार केला नव्हता. परंतु या घटनेने त्याचे मन अस्वस्थ झाले. हीच भावना कंपनीमधील इतरांचीदेखील होती. मन राखण्यासाठी कंपनीने सर्वांचा पगार वाढवला, परंतु तो पगार कंपनीत नवीन आलेल्या गिडवानी आणि गुणे यांच्यापेक्षा खूप कमी होता.

बाबूराव पेंढारकर आणि बाबूराव पेंटर यांच्यातही मतभेद झाले. आर्थिक अफरातफरीचा आरोप पेंटर यांनी केला. पेंढारकरांनी हा आरोप खोटा आहे हे पुराव्यानिशी सिद्ध केले. परंतु या घटनेने त्यांची कंपनीत राहण्याची इच्छा संपली. ते तडकाफडकी कंपनी सोडून निघून गेले. 

त्याच सुमारास बाबूराव पेंटर ‘बाजीप्रभू देशपांडे’ या चित्रपटावर काम करत होते. पण त्यांचे चित्रपट निर्मितीकडे फारसे लक्ष नसे. शांताराम आणि इतर सहकारी त्यांना मदत करत होते. शांताराम दिग्दर्शनाची बाजू सांभाळत होता. पेंटर चित्रणाच्या वेळी अनेकदा सेटवर हजरदेखील नसत. एक दिवस शांताराम चित्रण करण्यात गर्क होता. पेंटर आणि गिडवानी मागे येऊन उभे राहिले. पेंटर यांचा आवाज शांतारामच्या कानावर पडला, 

"क्या करना? मुझे अकेलेको ही सब करना पडता है... काम के लिए कोई अच्छे लोग नहीं मिलते..."

ते शब्द शांतारामच्या जिव्हारी लागले. संपूर्ण आत्मीयतेने काम करत असताना बाबूराव पेंटर असे बोलू कसे शकतात? या परिस्थितीतही शांतारामने संयम राखला आणि हातातले ‘बाजीप्रभू देशपांडे’ या चित्रपटाचे काम पूर्ण केले. 'मिडनाइट गर्ल' या चित्रपटाचेही काम चालू होते. काम संपत आले होते. यात सिंड्रेलाला भविष्य सांगणाऱ्या म्हाताऱ्या ज्योतिष्याची भूमिका शांताराम करत होता. तीदेखील त्याने आत्मीयतेने पूर्ण केली.

दामले आणि फत्तेलाल आपला स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार आधीपासूनच करत होते. आता शांतारामदेखील त्या दृष्टीने विचार करू लागला. केशवराव धायबर यांच्याबरोबर शांतारामचे चांगले संबंध होते. त्यांना बरोबर घेऊन नवा व्यवसाय सुरू करावा असा विचार त्याच्या मनात आला. त्याने केशवरावांबरोबर चर्चा केली. त्यांनादेखील ते पटले. आश्चर्य म्हणजे फत्तेलाल यांनी एक दिवस शांतारामकडे विषय काढला. नव्या कंपनीत दामले-फत्तेलाल यांच्याबरोबर शांतारामनेदेखील यावे असे त्यांनी सुचवले. तसे पाहता शांतारामचे दामले-फत्तेलाल यांच्याबरोबर मैत्रीचे संबंध नव्हते. परंतु सर्वांचे ध्येय एकच आहे, याचा विचार करून शांतारामने प्रस्तावाला तयारी दर्शवली. परंतु नवीन कंपनीत केशवरावदेखील सारखे भागीदार असतील अशी अट त्याने घातली. फत्तेलाल यांनी ते मान्य केले. 

मग ३० एप्रिल १९२९ रोजी चौघांनी आपले राजीनामे दिले. एका नव्या चित्रपट कंपनीचा पाया रचला जात होता!