व्ही शांताराम : १९५७ - १९९०
१५ पडद्याच्या पलीकडले (३)
शांतारामांचा संध्या यांच्याशी १९५६ मध्ये विवाह झाला आणि दोघांचा संसार सुरू झाला.
त्यांना १९५७ च्या अखेरीस अचानक डोळ्यांचा त्रास सुरू झाला. समोरचे दृश्य वेडेवाकडे दिसू लागले. डोळ्यांची तपासणी केली. डोळ्याचा रेटिना खालच्या बाजूला फाटला होता. त्यावर वेळीच उपचार केले नाहीत, तर संपूर्ण अंधत्व येण्याची शक्यता होती. डोळ्याला आराम मिळावा म्हणून सर्वप्रथम त्यांच्या डोळ्यावर पूर्णवेळ पट्टी बांधण्यात आली. हॉलंडमध्ये यावर उपाय निघाला होता. डोळ्याचा फाटलेला रेटिना सांधण्याचे तंत्र तेथे विकसित झाले होते. मुंबईतील प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉ. बानाजी यांचे चिरंजीव नुकतेच हॉलंडला जाऊन नेत्रशस्त्रक्रियेविषयीचे प्रशिक्षण घेऊन आले होते. डॉ. बानाजींनी शांतारामांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतरदेखील बरेच दिवस जखम भरेपर्यंत डोळ्यांवर पट्टी होती. डोळ्यावरची पट्टी काढण्याचा दिवस आला तेव्हा विमलाबाई आणि सर्व मुले आली होती. संध्या यांनी फुले आणि रंगांनी सर्व घर सुशोभित केले होते. शांतारामांच्या डोळ्यावरची पट्टी काढली. त्यांना सर्व काही नेहमीसारखे दिसू लागले. घरात एखादे मंगलकार्य असावे असे आनंदाचे वातावरण होते. डोळ्यांवर फार ताण पडू नये म्हणून डॉक्टरांनी शक्यतो काळा चष्मा वापरण्याचा सल्ला शांतारामांना दिला.
शांताराम-विमलाबाई यांचा संसार सुखासमाधानात होता. विमलाबाई हस्तकला, भरतकाम इत्यादी कलांमध्ये पारंगत होत्या. या कलांचे त्यांनी शास्त्रोक्त शिक्षणदेखील घेतले होते. १९५९ मध्ये मुंबईच्या ‘विल्सन कॉलेज’मध्ये त्यांच्या कारागिरीचे भव्य प्रदर्शन मांडण्यात आले. यशवंतराव चव्हाणांनी या प्रदर्शनाचे उदघाटन केले. मोठा मुलगा प्रभातकुमार आणि मुलगी सरोज यांचा आपापला संसार सुरळीत चालू होता. १९ मार्च १९६२ रोजी तिसरी मुलगी मधुरा हिचा विवाह प्रसिद्ध गायक आणि शास्त्रीय संगीतकार पंडित जसराज यांच्याशी झाला. पंडित जसराज हे मूळचे हरियाणाचे. त्यांच्या घरातच संगीत होते. वडील आणि मोठे बंधू राजगायक होते. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांचे संगीताचे शिक्षण मोठ्या भावाने केले. संगीत शिक्षणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी राहून अखेर कलकत्ता येथे ते स्थायिक झाले. विवाहानंतर दांपत्य मुंबईमध्येच राहू लागले. सर्वांत लहान मुलगी चारुशीला हिचा विवाह १० मार्च १९६४ रोजी सुब्रत रे या बंगाली गृहस्थांशी झाला.
वयाच्या ९८ व्या वर्षी - ३१ डिसेंबर १९६२ रोजी शांतारामांचे वडील राजारामबापू यांचे निधन झाले. कुटुंब चालवण्यात आणि मुलांना मोठे करण्यात राजारामबापूंनी फार कष्ट घेतले होते. परंतु आपला मुलगा शांताराम याचे यश त्यांना उतार वयात पाहायला मिळाले. राजारामबापूंच्या मृत्यूनंतर शांतारामांच्या आई कमलाबाईंनी अंथरूण धरले. राजारामबापू गेल्यानंतर नऊ महिन्यातच, ५ सप्टेंबर १९६३ मध्ये कमलाबाईंचे निधन झाले. शांताराम पोरके झाले!
शांताराम-जयश्रीबाई यांची मुलेदेखील मार्गी लागली. मोठा किरणकुमार याने १९५९ मध्ये ‘नवरंग’ चित्रपटात शांतारामांबरोबर सहाय्यक म्हणून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. ३१ डिसेंबर १९६६ रोजी किरणकुमार याचा विवाह ज्योती भट हिच्याशी झाला. जयश्रीबाईंची सर्वांत लहान मुलगी तेजश्री हिचा विवाह १४ मे १९६७ रोजी शशांक दोषी यांच्याशी झाला तर राजश्री हिचा विवाह २७ नोव्हेंबर १९६७ रोजी ग्रेगरी चॅपमन या अमेरिकन गृहस्थाशी झाला. राजश्रीने १९५४ मध्ये शांतारामांच्या ‘सुबह का तारा’ या चित्रपटात काम करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ‘स्त्री’ आणि ‘गीत गया पत्थरोंनें’ या 'राजकमल'च्या आणि इतर निर्मात्यांच्या अशा १७ चित्रपटांत तिने काम केले. ‘अराऊंड द वर्ल्ड’ या चित्रपटाच्या अमेरिकेतील शूटिंगच्या दरम्यान तिची भेट ग्रेगरी चॅपमन यांच्याशी झाली. विवाहानंतर राजश्री अमेरिकेत स्थायिक झाली.
शांतारामांच्या सर्व मुलींचे विवाह परप्रांतीयांशीच झाले. सरोजचा पारशी गृहस्थाशी, मधुराचा हरियाणाच्या हिंदी भाषिकाशी, चारुशीलाचा बंगाली घरात तर तेजश्रीचा गुजराथी युवकाबरोबर! राजश्रीने तर अमेरिकन तरुणाशी लग्न केले. शांतारामांनी आपल्या चित्रपटात भारताच्या राष्ट्रीय एकीकरणावर अनेकवेळा भर दिला होता. ते तत्त्व त्यांनी प्रत्यक्ष जीवनात अमलात आणल्याचे जणू हे प्रतीक होते!
बाबूराव पेंढारकर यांचे ९ नोव्हेंबर १९६७ रोजी देहावसान झाले. शांतारामांना त्याचे अतोनात दुःख झाले. बाबूराव हे शांतारामांचे केवळ मावसभाऊच नव्हते, तर शांतारामांना चित्रपटसृष्टीत आणण्यासाठी तेच जबाबदार होते. सुरुवातीच्या काळात या नव्या जगात त्यांचे मार्गदर्शक होते. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त शांतारामांना पगार नव्हता, तेव्हा त्यांचा खाण्याचा खर्च तेच करत होते. शांताराम वणकुद्रे हे ‘व्ही शांताराम’ बाबूराव पेंढारकरांच्या कल्पनेनेच झाले. इतकेच नाही, तर 'प्रभात कंपनी'चे नावदेखील बाबूराव पेंढारकरांनीच सुचवले होते. शांतारामांच्या सांगण्यावरून ते 'प्रभात कंपनी'त व्यवस्थापक आणि अभिनेते म्हणून आले. 'प्रभात'च्या अनेक चित्रपटांत त्यांनी अभिनय केला. इतकेच नव्हे, तर ‘प्रभात’च्या तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील त्यांनी केले. 'प्रभात' कोल्हापूरहून पुण्याला गेल्यावर मात्र त्यांनी 'प्रभात' सोडली. परंतु ते कायम शांतारामांच्या संपर्कात राहिले. शांतारामांनी 'राजकमल'ची स्थापना केल्यानंतर त्यांच्या चित्रपटात कामही केले. बाबूराव पेंढारकरांनी आपल्या आयुष्यात ८६ चित्रपटांत अभिनय केला. अखेरच्या काळात ‘रंगमंदिर नाट्यसंस्था’ आणि ‘दुर्वांची जुडी’ या नाट्यसंस्थांची स्थापना करून दर्जेदार नाटके प्रेक्षकांसमोर आणली.
लग्नानंतर संध्या शांतारामांच्या कुटुंबात समरस झाल्या. शांताराम यांच्या डोळ्याच्या आजारात त्यांनी शांतारामांची निरपेक्ष शुश्रूषा केली. चित्रपटसृष्टीमध्ये त्या शांतारामांना आपले गुरू मानत. 'दो आँखे बारह हाथ', 'नवरंग', 'स्त्री', 'पलातक', 'सेहरा', 'इये मराठीचिये नगरी' अशा शांतारामांच्या अनेक चित्रपटांतून संध्या यांनी काम केले. संध्या यांनी अभिनय केलेले बहुतांश चित्रपट यशस्वी ठरले. शांताराम याला संध्या यांचा पायगुण मानत. 'राजकमल'च्या चित्रपटांमधील त्यांचे काम पाहून त्यांना इतर निर्मात्यांनी आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी विचारले. परंतु 'राजकमल'शिवाय कोणत्याही कंपनीबरोबर काम करण्यास त्यांनी साफ नकार दिला.
शांतारामांचा ७० वा वाढदिवस कुटुंबाने मोठ्या आनंदाने साजरा केला. कुटुंबातील सर्वजण हजर होते. चित्रपट क्षेत्रातील बरेच शुभचिंतकदेखील हजर होते. 'राजकमल'चे पटांगण सुशोभित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विमलाबाईंनी रंगमंचावर येऊन छोटेसे भाषण केले आणि मंडळींचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित जसराज यांनी सरस्वतीची आराधना केली. त्यानंतर शांतारामांच्या नातवंडांनी नाटक सादर केले. त्यानंतर शांतारामांची आरती करण्यात आली. केशवराव दाते यांनी आभाराचे भाषण केले. शांतारामांना खूपच अवघडल्यासारखे झाले. परंतु सर्वांच्या प्रेमाने सद्गदित झाले.