व्ही शांताराम  : १९५७ - १९९०   

१६. अखेरचे पर्व

वयाची ७० वर्षे पूर्ण केल्यावर सामान्य माणूस निवृत्त होऊन आपली मुलेबाळे आणि नातवंडे यांच्यात रममाण होतो. परंतु आयुष्यभर चित्रपट माध्यमाने झपाटलेल्या शांतारामांना विश्रांती माहिती नव्हती. सत्तरीनंतरही शांतारामांची चित्रपट निर्मिती अखंड चालू राहिली. ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’, ‘पिंजरा’, ‘चानी’, ‘झंजार’ नाव चेक करावे अशा अविस्मरणीय चित्रपटांची निर्मिती शांतारामांनी या काळात केली. 

अखेरचे चित्रपट

वसंत कानेटकर यांच्या एका कथेवर आधारित ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हा चित्रपट शांतारामांनी १९७१ मध्ये हातात घेतला. एका  नृत्यप्रेमी युवतीला अपघातात अपंगत्व येते. या युवतीभोवती कथानक फिरते. शांतारामांनी चित्रपटाची जुळवाजुळव करायला सुरुवात केली. संगीत दिग्दर्शनासाठी यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीला घेतले. संध्या यांच्या नृत्याचा अभ्यास पाहता नायिकेच्या भूमिकेत अर्थातच त्यांना घेण्यात आले. नायकाची भूमिका अभिजित या नव्या कलाकाराला दिली. चित्रपटात एका मुलाची भूमिका होती. ती शांतारामांचा नातू; चारुशीला हिचा मुलगा सुशांत रे याने केली. शांतारामांनी या चित्रपटातील गाणी स्टिरिओ रेकॉर्डिंग पद्धतीने रेकॉर्ड केली. 'राजकमल'च्या मंगेश देसाई या अतिशय गुणी तंत्रज्ञाने गाण्यांचे प्रभावी रेकॉर्डिंग केले. स्टिरिओ रेकॉर्डिंग केलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. मूळ कथेत अपघाती अपंगत्व आलेली नायिका मरते, असा दुःखांत होता. परंतु यातून समाजातील अपंगांमध्ये नैराश्य पसरेल या भावनेने शांतारामांनी चित्रपटाचा शेवट गोड केला.

चित्रपट मुंबईतील ‘प्लाझा’मध्ये प्रदर्शित झाला. तो २४ आठवडे चालला. परंतु बाहेरगावी त्याला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपट आर्थिकदृष्ट्या अपयशी ठरला. निर्मितीमध्ये झालेला अफाट खर्चदेखील वसूल झाला नाही. 

‘हेनरीच मान’ या जर्मन लेखकाच्या ‘प्रोफेसर गार्बेज’ या कादंबरीवर आधारित ‘ब्लू एंजल’ या चित्रपटाची कथा शांतारामांच्या वाचण्यात आली. एक चारित्र्यसंपन्न माणूस एका तरुण स्त्रीच्या मोहात पडतो आणि त्यात त्याचे अधःपतन होते या विषयावर हा चित्रपट आधारित आहे. बालगंधर्वांच्या उतार वयात ते गोहराबाईंच्या मोहात पडले आणि तिच्या संपूर्ण आहारी गेले. शांतारामांनी त्यांची ही परिस्थिती आपल्या डोळ्यांनी पहिली होती. पट्ठे बापूराव यांची कथादेखील काहीशी अशीच होती. 

शांतारामांनी १९७२ मध्ये या कथानकावर चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला आणि ‘पिंजरा’ची निर्मिती झाली. ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ या चित्रपटाचे कर्ज 'राजकमल'च्या डोक्यावर होते. अशा परिस्थितीत मोठ्या खर्चाचा हिंदी चित्रपट काढण्याऐवजी कमी खर्चात चित्रपट काढावा या विचाराने शांतारामांनी हा चित्रपट मराठीमध्ये काढण्याचा निर्णय घेतला. अर्थात मराठी चित्रपटात मिळकतदेखील कमी होणार होती. परंतु चित्रपट जर दर्जेदार असेल आणि लोकांना आवडला तर मराठी चित्रपटातूनदेखील चांगली मिळकत होण्याचा संभव होता. शांतारामांनी आव्हान स्वीकारले आणि निर्मितीला सुरुवात केली. 

चित्रपटाची संगीताची बाजू राम कदम यांच्यावर सोपवली. गीते जगदीश खेबूडकर यांनी लिहिली. प्रमुख भूमिकेत संध्या, श्रीराम लागू, निळू फुले यांना घेतले. चित्रपट मुंबईमध्ये ‘प्लाझा सिनेमागृहा’त प्रदर्शित झाला. 'पिंजरा' सर्व प्रेक्षकांनी इतका डोक्यावर घेतला, की त्याने मराठी चित्रपटसृष्टीत उत्पन्नाचे नवे उच्चांक स्थापन केले. 'पिंजरा'च्या उत्पन्नामधून 'राजकमल'   कर्जमुक्त झाले. मराठी 'पिंजरा'च्या अफाट यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीला नवजीवन मिळाले. संध्या यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीला श्रीराम लागू यांच्यासारखा गुणी कलाकार मिळाला. 

शांतारामांनी १९७३ मध्ये ‘पिंजरा’ चित्रपटाचे हिंदीमध्ये रूपांतर प्रेक्षकांसमोर आणले. परंतु ते फारसे चालले नाही. याच काळात शांतारामांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी शांतारामांना संपूर्ण विश्रांती सांगितली. विश्रांतीनंतर शांताराम पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. 

'राजकमल'ने १९७५ आणि १९७६ मध्ये ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ आणि ‘झुंज’ हे दोन चित्रपट आणले. ‘चंदनाची चोळी’चे दिग्दर्शन शांतारामांचा पुतण्या व्ही. रवींद्र यानी केले. रवींद्र बऱ्याच वर्षांपासून शांतारामांचा ‘सहाय्यक दिग्दर्शक’ म्हणून 'राजकमल' मध्ये काम करत होता. कथा तमाशाच्या फडातील मुलीच्या जीवनावर आधारित होती. चित्रपटात संध्या आणि अरुण सरनाईक यांनी अभिनय केला. या चित्रपटात राहुल आणि दुर्गा या शांतारामांच्या नातवंडांनीदेखील काम केले. ‘झुंज’ चित्रपटाचे दिग्दर्शन किरण शांताराम यांनी केले. हा चित्रपट ‘अस्पृश्यता’ या विषयावर आधारित होता. या चित्रपटात रंजना आणि रवींद्र महाजनी यांनी अभिनय केला. चित्रपटाला उत्कृष्ट संकलनाबद्दल पारितोषिक मिळाले. शाहूमहाराजांनी तेथे केलेल्या कार्याने कोल्हापूरमध्ये हा चित्रपट विशेष चालला. ‘चंदनाची चोळी’ आणि ‘झुंज’ हे दोन्ही चित्रपट आर्थिकदृष्ट्या समाधानकारक ठरले. 

शांतारामांचा ‘चानी’ हा मराठी चित्रपट १९७७ मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत होते. चित्रपटाची कथा चिं त्र्यं खानोलकर यांच्या कादंबरीवर आधारित होती. कोकणात राहणाऱ्या एका अनाथ मुलीला गावातला नावाडी वाढवतो. कोकणात खारीला ‘चानी’ म्हणतात. ही मुलगी अतिशय चपळ आणि चंचल असते म्हणून तीदेखील गावात ‘चानी’ या नावाने ओळखली जात असते. चित्रपटाचे कथानक या मुलीभवती फिरते. चित्रपटाला वास्तवाचे रूप देण्यासाठी शांताराम कोकणात फिरून आले. चित्रपटाचे चित्रणदेखील कोकणात केले. चित्रपटाच्या नायिकेची भूमिका रंजना हिने निभावली. शांतारामांचा नातू सुशांत रे याने चित्रपटातील मुलाचे काम केले. चित्रपट मुंबई आणि इतर गावांतून प्रदर्शित झाला. परंतु चित्रपट हवा तेवढा चालला नाही.

'राजकमल'ने १९७७ मध्ये ‘असला नवरा नको गं बाई’, १९७९ मध्ये ‘राजा रानीको चाहिए पसीना’ आणि १९८३ मध्ये ‘झंजार’ या चित्रपटांची निर्मिती केली. ‘असला नवरा नको गं बाई’ हा चित्रपट अनंत माने यांनी दिग्दर्शित केला. ‘राजा रानीको चाहिए पसीना’ सुलभा देशपांडे यांनी दिग्दर्शित केला. ‘झंजार’ स्वतः शांतारामांनी दिग्दर्शित केला. ‘झंजार’मध्ये पद्मिनी कोल्हापुरे आणि सुशांत रे यांनी अभिनय केला. 

व्ही शांताराम प्रतिष्ठान 

चित्रपट, कला व तंत्र यांच्या उत्कर्षासाठी एक सार्वजनिक विश्वस्त संस्था निर्माण करावी आणि त्या संस्थेला आपली सर्व स्थावर जंगम मिळकत द्यावी, या उद्देशाने शांतारामांनी 'व्ही. शांताराम चलच्चित्र, शास्त्रीय अनुसंधान व सांस्कृतिक प्रतिष्ठान' या नावाने संस्था काढली.

संस्थेच्या मुद्दलावर येणाऱ्या व्याजाच्या रकमेतून चित्रपट व्यवसायास उपयुक्त अशी यंत्रसामग्री तयार करणे, समाजाभिमुख चित्रपट, नावीन्यपूर्ण चित्रपट आणि चांगले बालचित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे असे संस्थेचे कार्य ठरवण्यात आले. संस्थेचा कारभार पाहण्यासाठी एक विश्वस्त मंडळ तयार करण्यात आले. १८ नोव्हेंबर १९७७ रोजी शांतारामांच्या शहात्तराव्या जन्मदिनी सर्व विश्वस्तांनी विश्वस्त-पत्रकावर सह्या केल्या. शांतारामांच्या या कृत्याचे चित्रपट जगतात खूप कौतुक झाले.

मानसन्मान 

अखंड आशावाद, अदम्य आत्मविश्वास आणि अलौकिक अस्मिता यांनी परिपूर्ण असे शांतारामांचे व्यक्तिमत्व होते. चित्रपट निर्मितीत लागणारे नेतृत्वगुण त्यांच्यामध्ये होते. चित्रपट निर्मितीचे कार्य एकट्या निर्मात्याच्या किंवा दिग्दर्शकाच्या बुद्धीवर आणि कर्तृत्वावर अवलंबून नसते तर निर्मितीत लागणाऱ्या इतर सहकाऱ्यांचा त्यात तेवढाच सहभाग असतो, हे ते जाणत होते. सर्वसामान्य जनतेला चित्रपटाद्वारे काय दिले पाहिजे आणि ते कसे दिले पाहिजे याचे गणित त्यांना चांगले कळले होते. चित्रपट निर्मितीकडे कलेबरोबरच व्यवसाय म्हणून पाहण्याचे कौशल्य त्यांना अवगत होते. सर्वांकडून सल्ला घेऊन अखेर आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून योग्य तो निर्णय घेण्याची कला त्यांना अवगत होती. एकदा घेतलेला निर्णय तडीस नेण्याची धडाडी त्यांच्यात होती. हे त्यांचे गुणविशेष त्यांच्या यशाला कारणीभूत होते.

शांतारामांनी प्रेक्षकांना अजरामर चित्रपट दिलेच; परंतु केशवराव दाते, शाहू मोडक, राम मराठे, मास्टर छोटू, चंद्रकांत, नलिनी तर्खड, शांता  आपटे, वासंती, शांता हुबळीकर, जयश्री, संध्या यांच्यासारखे अभिनय क्षेत्रातील उत्तम कलाकार घडवले. वसंत देसाई यांच्यासारखे आघाडीचे संगीत दिग्दर्शक आणि मंगेश देसाई यांच्यासारखे निष्णात ध्वनि-तंत्रज्ञ शांतारामांकडे तयार झाले. 

शांताराम देशातील चित्रसृष्टीतील अनेक संस्थांचे संस्थापक सदस्य होते:

(१) सिनेमॅटोग्राफर्स असोसिएशन, (२) सिने एक्झिबिशन पिक्चर्स डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन, (३) इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशन, (४) सिने एक्झिबिटर्स असोसिएशन, (५) इंडियन मोशन पिक्चर्स डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन, (६) इंडियन फिल्म डायरेक्टर्स असोसिएशन, (७) फिल्म एडिटर्स असोसिएशन, (८) सिने आर्टिस्ट्स असोसिएशन इत्यादी. 

१९६६ ते ६८ दरम्यान शांताराम फिल्म ‘प्रोड्युसर्स गिल्ड’चे अध्यक्ष होते. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद त्यांनी १९६६ ते १९६८ आणि १९७५ ते १९८० या काळात भूषवले. चित्रसृष्टीतील शांतारामांच्या अखंड कार्याचे कौतुक म्हणून देशभर शांतारामांचे सत्कार होत होते. 

९ ऑगस्ट १९७१ रोजी ‘फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (मद्रास)’ तर्फे पन्नास वर्षांच्या चित्रपटसेवेसाठी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

१९७२ मध्ये ‘फिल्म प्रोड्युसर्स कौन्सिल’ची स्थापना करण्यात आली. त्यानिमित्ताने मद्रासच्या जनतेकडून गौरव करण्यात आला. 

१६ डिसेंबर १९७२ रोजी ‘बृहन्मुंबई महानगरपालिके’तर्फे सत्कार करण्यात आला. 

१९७६ मध्ये मुंबई येथील ‘फिल्मोत्सवा’चे उद्घाटन शांतारामांच्या हस्ते करण्यात आले. 

८ जून १९७८ रोजी ‘पुणे महानगरपालिके’तर्फे सत्कार झाला. 

७ जून १९८० रोजी ‘नागपूर विद्यापीठा’तर्फे शांतारामांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली. 

मार्च १९८२ मध्ये कोल्हापूर येथे मराठी बोलपटांच्या सुवर्णजयंती-समारंभाच्या अध्यक्षपदी शांताराम होते.

१९८२ च्या ‘राष्ट्रीय फिल्म महोत्सवा’च्या पारितोषिक समितीचे अध्यक्षपददेखील शांतारामांनी भूषवले. 

१३ जून १९८६ रोजी चित्रपटसृष्टीतील सक्रिय योगदानाबद्दल शांतारामांना भारत सरकारतर्फे ‘दादासाहेब फाळके अवॉर्ड’ देऊन सन्मानित केले गेले. ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा बहुमान मानला जातो. 

(शांतारामांच्या मृत्यूनंतर १९९२ मध्ये त्यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. ‘पद्मविभूषण’ हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.)

१० एप्रिल १९८६ रोजी 'शांतारामा' हे आत्मचरित्र त्यांनी प्रकाशित केले. 

अखेरचे दिवस 

शांतारामांची प्रकृती १९८९ मध्ये बिघडली. १९९० च्या मे महिन्यात शांताराम घरातच पडले आणि त्यांच्या हिपबोनला इजा झाली. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आपला शेवट जवळ येत आहे याची जणू त्यांना जाणीव झाली. आपल्या पश्चात आपला पुत्र किरण याला त्यांनी कुटुंबाची आणि राजकमलची जबाबदारी घेण्याचे साकडे घातले आणि जयश्रीबाईंना भेटण्याची इच्छादेखील त्याच्याकडे व्यक्त केली. शांताराम-जयश्रीबाई यांची भावपूर्ण भेट झाली. कुटुंबाने शेवटची दिवाळी साजरी केली आणि अखेर २८ ऑक्टोबर १९९० रोजी शांतारामांचे निधन झाले.