व्ही शांताराम  : १९४२  - १९५७ 

११. खाचखळगे

‘जीवनयात्रा’ प्रदर्शित झाल्यानंतर महिन्याभरातच 'राजकमल'ने ‘राम जोशी’ हा चित्रपट प्रदर्शित केला. श्रृंगारिक लावण्यांबद्दल प्रसिद्ध असलेल्या लोकशाहीर राम जोशी यांच्या चरित्रावर आधारित कादंबरी ग. दि. माडगूळकरांनी लिहिली होती. त्यावर आधारित ‘राम जोशी’ या चित्रपटाची निर्मिती करण्याचे शांतारामांनी ठरवले. अमेरिकेला जायच्या आधीच त्यांनी माडगूळकर यांच्याशी चर्चा करून चित्रपट मार्गी लावला होता. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन वसंत देसाई यांचे होते. प्रमुख भूमिकेत हंसा वाडकर, जयराम शिलेदार, ग. दि. माडगूळकर, परशुराम इत्यादी नट होते. त्याचसुमारास बाबूराव पेंटर शांतारामांच्या संपर्कात आले. शांतारामांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांच्यावर सोपवले. शांताराम अमेरिकेत असताना या चित्रपटाचे चित्रण झाले. परंतु बाबूराव पेंटर यांनी चित्रपट अर्धवट सोडला. परत आल्यावर शांतारामांनी तो पूर्ण केला. ६ डिसेंबर १९४७ रोजी चित्रपट पुण्यात प्रथम प्रदर्शित झाला. चित्रपट अतिशय गाजला. 'राम जोशी' या चित्रपटाने लोकांच्या मनातील तमाशाविषयीची अढी दूर झाली. 

अपयश 

'राजकमल'ने १९४८ मध्ये चित्रपटांचा धडाका लावला. ‘अंधों की दुनिया’, ‘मतवाला शायर’, ‘बनवासी’ आणि ‘भूल’ असे चार चित्रपट या वर्षात आले. शांताराम अमेरिकेला जाताना ‘अंधों की दुनिया’ या सामाजिक हिंदी चित्रपटाची सुरुवात करून गेले होते. चित्रपटाची कथा केशवराव दाते यांनी पूर्वी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळ्यांची शाळा’ या नाटकावर आधारित होती. १० जानेवारी १९४८ रोजी चित्रपट मुंबईमध्ये प्रदर्शित करण्यात आला. परंतु 'राजकमल'ला यातून फारसे यश मिळाले नाही. २५ मार्च १९४८ रोजी 'मतवाला शायर' हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपटदेखील आर्थिकदृष्ट्या विशेष चालला नाही. १९ ऑगस्ट १९४८ रोजी 'बनवासी' हा सामाजिक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. महाराष्ट्रातील आदिवासी लोकांच्या जीवनावर लिहिलेल्या र  वा दिघे यांच्या एका कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. चंद्रशेखर आणि शांतारामांचे धाकटे भाऊ अवधूत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाची अवस्था ‘अंधों की दुनिया’ आणि ‘बनवासी’सारखी झाली. त्यापाठोपाठ 'वेल-डिगर्स डॉटर' नावाच्या फ्रेंच चित्रपटावर शांतारामांनी ‘भूल’ हा चित्रपट काढला. चित्रपट ७ ऑक्टोबर १९४८ रोजी प्रदर्शित झाला, पण हा चित्रपटदेखील साफ आपटला. 

'अंधों की दुनिया', 'बनवासी', 'भूल', 'मतवाला शायर' हे सर्व चित्रपट आर्थिकदृष्ट्या अयशस्वी ठरल्यामुळे 'राजकमल'ची आर्थिक परिस्थिती कमालीची बिघडली. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात त्याप्रमाणे 'राजकमल'वर नवी आपत्ती आली. आकाशात ढग गडगडू लागले आणि स्टुडिओवर अचानक वीज पडली. स्टुडिओमधले संपूर्ण वायरिंग जळाले. स्टुडिओ दुरुस्तीचा फार मोठा खर्च समोर उभा ठाकला. वाडिया यांच्या मालकीच्या जागेत स्टुडिओ भाड्याने घेतलेला होता. त्यावर एवढा खर्च करणे व्यवहार्य नव्हते. संकटाने घाबरून जातील तर ते शांताराम कसले! शांतारामांनी जमीन विकतच घेण्याचा प्रस्ताव  वाडिया यांच्यासमोर ठेवला. किंमत अशी कबूल केली, जी वाडिया यांना मान्य नसण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु रक्कम हप्त्याने देण्याची अट मात्र त्यांच्याकडून मान्य करून घेतली. जागेचे साठेखत झाले आणि ५ मे १९४९ रोजी मुंबईतील मध्यवर्ती भागात, परळ येथे असलेली आठ एकर जागा 'राजकमल'च्या मालकीची झाली. 


पुन्हा भरारी 

दरम्यान शांतारामांनी ‘अपना देश’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट तमिळ भाषेतही काढण्यात आला. तमिळ भाषेत चित्रपटाचे शीर्षक ‘नमनाडू’ असे ठेवण्यात आले. फाळणीच्या परिणामांना बळी  पडलेल्या एका पंजाबी तरुणीच्या जीवनावर आधारित कथानकावर हा चित्रपट तयार केला गेला. नायिकेच्या भूमिकेत पुष्पा राजहंस यांची निवड करण्यात आली. संगीताची बाजू पुरषोत्तम यांनी सांभाळली. ३० मार्च १९४९ रोजी 'अपना देश' मुंबईच्या 'वेस्टएंड सिनेमा'त प्रथम प्रदर्शित झाला. चित्रपट समाधानकारकरित्या २५ आठवडे चालला. परंतु या चित्रपटाबाबत अनेक उलटसुलट चर्चा वर्तमानपत्रात छापून आल्या. काहींनी चित्रपटातील वास्तव दर्शनाची स्तुती केली, तर काहींनी हा चित्रपट देशाची प्रतिमा डागाळत आहे आणि त्यावर बंदी आणावी असा सूर मांडला. देशाची ‘भाषावार प्रांतरचना’ देशाच्या एकात्मतेस हानिकारक आहे, असे शांताराम यांचे मत होते. भाषावार प्रांतरचनेच्या विरोधात मतप्रणाली निर्माण करण्याचा प्रयत्न शांताराम यांनी या चित्रपटात केला होता. 

‘अपना देश’ प्रदर्शित झाल्यानंतर लगेच शांतारामांनी ‘दहेज’ या चित्रपटावर काम सुरू केले. त्याकाळी प्रचलित असलेल्या हुंडा पद्धतीच्या विरोधात या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. हुंडा न दिल्याने सासूच्या जाचाला चित्रपटाची नायिका बळी पडते आणि अंततः तिचा मृत्यू होतो. नायिकेच्या भूमिकेत जयश्रीबाई होत्या. नायिकेच्या वडिलांची भूमिका पृथ्वीराज कपूर यांनी केली होती, तर तिच्या सासूची भूमिका ललिता पवार यांनी निभावली होती. संगीत वसंत देसाई यांचे होते. त्याकाळी पृथ्वीराज कपूर प्रसिद्धीच्या झोतात होते. चित्रपटात काम करण्यासाठी ते खूप मानधन घेत. परंतु शांताराम देतील तो मोबदला त्यांनी मान्य केला. शांतारामांच्या चित्रपटात काम करणे त्यांना महत्त्वाचे वाटले. ललिता पवार यांनीदेखील खलनायिकेची भूमिका अतिशय प्रभावीपणे निभावली. १९ मे १९५० रोजी मुंबईमधील ‘ऑपेरा हाऊस’मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला. तो तब्बल ३७ आठवडे चालला. त्याचसुमारास लोकसभेत हुंडाविरोधी कायदा मांडला गेला. त्याच सुमारास प्रदर्शित झालेल्या ‘दहेज’ चित्रपटाचा कदाचित हा परिणाम असेल, कायदा बहुमताने संमत झाला. चित्रपट माध्यम किती प्रभावी आहे याची यावरून कल्पना येते. शांतारामांच्या मते, 

“निव्वळ गल्ला भरण्यासाठी समाजाला घातक अशा गोष्टी चित्रपटांत दाखवणे अनैतिक आहे. जसा एखाद्या चांगल्या चित्रपटाचा चांगला परिणाम होऊ शकतो, तसा चित्रपटातील वाईट गोष्टींचाही अनिष्ट परिणाम होतो.”

‘दहेज’च्या यशानंतर 'राजकमल'ची आर्थिक परिस्थिती काहीशी सुधारली. परंतु अनेक खर्च अजूनही आ वासून उभे होते. ‘लोककवी होनाजी बाळा’ या विश्राम बेडेकर यांच्या कथानकावर चित्रपट काढण्याचे शांतारामांनी ठरवले. चित्रपटाचे नाव होते ‘अमर भूपाळी.’ या पेशवेकालीन कथानकात होनाजी बाळा हा व्यवसायाने गवळी असतो. परंतु काव्य रचून गाण्याचा त्याचा छंद असतो. चित्रपटाच्या यशासाठी संगीत उच्च प्रतीचे असणे महत्त्वाचे होते. संगीताची बाजू वसंत देसाई यांनी सांभाळली. 

‘होनाजी बाळा’च्या भूमिकेत पंडितराव नगरकरांना घेण्यात आले. पंडितरावांचा आवाज अतिशय सुरेल होता. अभिनयाचे कौशल्यदेखील त्यांच्यात होते. जयश्रीबाई त्यासुमारास आजारी होत्या. चित्रपटाच्या नायिकेसाठी शांताराम एखाद्या नव्या नटीच्या शोधात होते. त्यावेळी ‘विजया देशमुख’ या १८ वर्षांच्या युवतीचे नाव पुढे आले. उंच, सडपातळ, गोरीपान, डौलदार शरीर असलेली विजया नायिकेच्या भूमिकेत शांतारामांना योग्य वाटली. विजया गायन आणि नृत्य या कलांमध्येदेखील निपुण होती. विजयाचे नाव नायिकेच्या भूमिकेसाठी नक्की झाले. त्याकाळी ‘विजया’ नावाची एक नटी होती. त्यामुळे विजया देशमुख हिला नवीन नाव देणे आवश्यक होते. शांतारामांनी तिचे नाव ‘संध्या’ ठेवले.

मुंबईच्या 'मॅजेस्टिक सिनेमा’त ८ सप्टेंबर १९५१ रोजी ‘अमर भूपाळी’ प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना चित्रपट खूप आवडला. चित्रपट वीस आठवडे चालला. ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ध्वनिलेखनासाठी 'ग्रँड प्री' पारितोषिक मिळाले. 'फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन'तर्फे हिंदी व इतर भारतीय भाषांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली. चित्रपट बंगाली भाषेतही 'डब' करण्यात आला. चित्रपटातली गाणी अतिशय गाजली. ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला...’ ही भूपाळी तर अजरामर झाली. 

‘अमर भूपाळी’ या चित्रपटाआधी शांतारामांनी ‘परछाई’ या चित्रपटाचे काम हातात घेतेले होते. शम्स लखनवी यांच्या एका कथेवर हा चित्रपट आधारित होता.  प्रेमाचा त्रिकोण असलेली ती कथा होती. नायिकेच्या भूमिकेत जयश्रीबाई होत्या. परंतु त्याकाळात जयश्रीबाईंची प्रकृती ठीक नसे. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण स्थगित करण्यात आले. जयश्रीबाईंची प्रकृती सुधारल्यानंतर चित्रपट निर्मितीला पुन्हा सुरुवात झाली. वसंत देसाई यांनी 'राजकमल'बाहेरील चित्रपटासाठी काम घेतलेले असल्याने संगीत दिग्दर्शनाचे काम सी. रामचंद्र यांना देण्यात आले. सी. रामचंद्र यांच्या सांगण्यावरून लता मंगेशकर यांना पार्श्वगायिका म्हणून घेण्यात आले. नायकाच्या भूमिकेत एक तरुण नट होता. परंतु त्याचा अभिनय शांतारामांना आवडेना. ऐनवेळी अखेर त्यांनी स्वतःच नायकाची भूमिका केली. २७ जून १९५२ रोजी ‘प्लाझा’मध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट लोकांना आवडला. पाकिस्तानात चित्रपटाला खूप गर्दी होत असे. 

कामात भर म्हणून सरकारने स्थापन केलेल्या ‘चलच्चित्र उद्योग चौकशी समिती’मध्ये येण्यासाठी शांतारामांना निमंत्रण आले. शांताराम ही जबाबदारी नाकारणार होते. परंतु स्वतः वल्लभभाई पटेल यांनी त्यांना बोलावून ही जबाबदारी घेण्यास सांगितले. तेव्हा ‘नाही’ म्हणणे अर्थात शांतारामांना योग्य वाटले नाही. देशात होत असलेल्या भाषावार प्रांतरचनेच्या विरोधात शांतारामांनी 'तीन बत्ती चार रास्ता' हा सामाजिक हिंदी चित्रपट काढला. २७ फेब्रुवारी १९५३ मध्ये तो प्रदर्शित झाला. त्याचबरोबर ‘सुबह का तारा’ हा चित्रपट ६ ऑगस्ट १९५३  रोजी प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट विधवांच्या पुनर्विवाहाबाबत होता. दुर्दैवाने दोन्ही चित्रपट फारसे चालले नाहीत. 

शांतारामांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांच्या यशापशयाच्या चढउताराने ‘शांताराम यांची कारकीर्द संपली काय?’ असे प्रश्न काही टीकाकार विचारू लागले.