व्ही शांताराम : १९४२ - १९५७
१२. यशाच्या शिखरावर
'प्रभात'ने १९३३ मध्ये काढलेल्या ‘सैरंध्री’ चित्रपटानंतर दुसरा रंगीत चित्रपट यायला १९३७ उजाडले. अर्देशीर इराणी यांचा ‘किसान कन्या’ हा रंगीत चित्रपट १९३७ मध्ये प्रदर्शित झाला. ‘किसान कन्या’ चित्रपटात ‘सिनेकलर’ तंत्र वापरले होते. त्यानंतरचे ‘टेक्निकलर’ तंत्र वापरून १९५३ मध्ये ‘झांसी की रानी’ हा चित्रपट आला. परंतु या काळात आलेले सर्व रंगीत चित्रपट पडले. आपला नवीन चित्रपट टेक्निकलर पद्धतीने काढायचा आणि तो यशस्वी करून दाखवायचा हा ध्यास शांतारामांनी घेतला. रंगीत चित्रपटाला लागणारा खर्च खूप होता. 'राजकमल'ची आर्थिक परिस्थिती ठीक असली, तरी रंगीत चित्रपटासाठी बाहेरून निधी मिळवणे आवश्यक होते. शांताराम त्याची जुळवाजुळव करण्यात लागले. त्याचबरोबर प्रेक्षकांना आवडेल असे कथानक तयार करणेदेखील आवश्यक होते. बराच विचार केल्यानंतर नवीन चित्रपट ‘कथक’ नृत्यप्रकारावर आधारित असावा या निर्णयावर शांताराम आले. दिवाण शरार आणि केशवराव दाते यांच्याबरोबर चर्चा करून कथानक तयार करण्यात आले. चित्रपटाचे नाव ठरले, “झनक झनक पायल बाजे!”
‘झनक झनक पायल बाजे’
चित्रपटाचे कथानक तयार झाले. मंगलमहाराज नावाच्या एका वयोवृद्ध नृत्यतपस्व्याची एक महत्त्वाकांक्षा असते, की आपल्या मुलाने - गिरधरने, नटेश्वर मंदिरात होणाऱ्या नृत्यमहोत्सवात आपले नृत्यकौशल्य दाखवून आपल्यासारखीच 'महाराज' ही पदवी प्राप्त करावी. या नृत्यमहोत्सवात गिरधरला एका नर्तकीला बरोबर घेऊन युगुलनृत्यातही आपली श्रेष्ठता सिद्ध करायची असते. चित्रपटाची पटकथा दीवाण शरार व केशवराव यांच्यावर सोपवली होती. संगीत वसंत देसाई यांनी सांभाळले. प्रसिद्ध तबलावादक सामताप्रसाद, खोलवादक सुदर्शन, संतूरवादक शिवकुमार शर्मा, सतारवादक अब्दुल हलिम जाफर अशा दिग्गजांना पार्शवसंगीतासाठी पाचारण करण्यात आले. गिरीधर या नायकाच्या भूमिकेत गोपीकृष्ण या तरुणाला घेण्यात आले. त्यालाच नृत्यदिग्दर्शन देण्यात आले. नायिकेच्या भूमिकेत संध्या यांना घेण्यात आले. शांतारामांनी आर्थिक बाजूंची मांडणीदेखील पूर्ण केली. यासाठी त्यांना वैयक्तिक मालमत्ता गहाण ठेवावी लागली.
चित्रपटाच्या तालमी सुरू झाल्या. गोपीकृष्ण कथकचे धडे संध्या यांना देऊ लागले. संध्या यांनी सर्वस्व पणाला लावले. चित्रपटाला संपूर्ण न्याय देण्याचा जणू विडाच त्यांनी उचलला होता. चित्रपटावर होणारा खर्च पाहूजाता संध्या यांच्याजागी वैजयंतीमाला यांच्यासारखी प्रतिथयश अभिनेत्री घ्यावी असा काही तज्ज्ञांचा सल्ला होता. परंतु संध्या आणि गोपीकृष्ण यांच्या तालमी बघून शांतारामांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत होता. चित्रपटाचे चित्रण सुरू झाले. स्टुडिओमधील चित्रणाच्या काही प्रति लंडनला प्रक्रियेसाठी पाठवण्यात आल्या. त्या चांगल्या आल्या आहेत, असे कळल्यावर चित्रणाचा वेग वाढवला. चित्रपटाची टीम बाह्यचित्रणासाठी म्हैसूरला गेली. ‘वृंदावन गार्डन’मध्ये बाह्यचित्रण करण्यात आले.
चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यामध्ये नायिकेला दोन्ही खांद्यांवर, तळहातांवर आणि कपाळावर तेवत असलेल्या पणत्या घेऊन उलटी कमान घालून जमिनीला डोके टेकवण्याचे दृश्य होते. हे अतिशय अवघड काम संध्या करू शकत नव्हत्या. काम करताना त्या पडत होत्या किंवा त्या पणत्या तरी पडत होत्या. हे दृश्य चित्रपटातून काढून टाकावे असे शांतारामांना वाटले. परंतु संध्यादेखील हट्टाला पेटल्या. त्यांनी अविश्रांत मेहनत घेऊन ते दृश्य अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केले. परंतु हे करत असताना संध्या यांच्या मणक्याला जबरदस्त दुखापत झाली.
चित्रपटाचे संकलन पूर्ण झाले. चित्रपटाच्या फिल्म लंडनला पाठवण्यात आल्या. त्याचे प्रिंटिंग पूर्ण झाल्यावर शांताराम लंडनला जाऊन आले. चित्रपटाची गुणवत्ता त्यांनी स्वतः पाहून घेतली. चित्रपटात शांतारामांचे सर्वस्व पणाला लागले होते. चित्रपट पडला तर शांताराम कर्जात बुडून जाणार होते. त्यांनी ठिकठिकाणी वितरणाचे करार केले. चित्रपटाच्या ‘किमान यशा’ची हमी देऊन उत्पन्नाची वाटणी आपल्याला हवी तशी मिळवून घेतली. चित्रपट पडले तर मात्र शांतारामांवर आकाश कोसळणार होते. परंतु शांतारामांचा आत्मविश्वास त्यांना नेटाने पुढे जाण्याचे धैर्य देत होता.
अखेर ३ सप्टेंबर १९५५ रोजी ‘झनक झनक पायल बाजे’ मुंबईच्या ‘मेट्रो सिनेमा’त प्रदर्शित झाला. शांताराम, विमलाबाई आणि मुले त्याचबरोबर जयश्रीबाई आणि मुलेदेखील पहिल्या खेळाला हजर होते. लोकांनी चित्रपट डोक्यावर घेतला. समीक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला. त्यानंतर चित्रपट ‘ऑपेरा हाऊस’ आणि ‘लिबर्टी चित्रपटगृहात’ही दाखवण्यात आला. ‘ऑपेरा हाऊस’मध्ये ७० आठवडे चालून चित्रपटाने विक्रम केला.
चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी मुंबईकरांच्या वतीने शांतारामांचा शिवाजी पार्क येथे सत्कार करण्यात आला. आचार्य अत्रे यांनी शांतारामांना 'चित्रपती' हा किताब यावेळी बहाल केला. सरकारतर्फे त्यांना राष्ट्रपतीपदक देण्यात आले. उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, कलादिग्दर्शन, संगीत, ध्वनिलेखन, संकलन आणि कलादिग्दर्शन याबद्दल चित्रपटाला अनेक पारितोषिके मिळाली. फिल्म फेअर, फिल्म फॅन्स असोसिएशन, सरकार इत्यादींनी चित्रपटाचा गौरव केला.
'झनक झनक'च्या मुंबईतील प्रदर्शनाला ७५ आठवडे पूर्ण झाल्यावर, त्याप्रीत्यर्थ शांतारामांनी ‘लिबर्टी’मध्ये शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित केला. बिस्मिल्लाह खान, बडे गुलाम अली, बरकत अली, बालगंधर्व, बेगम अख्तर, कुमार गंधर्व, पद्मा शाळिग्राम या दिग्गज कलावंतांनी या सोहळ्यात आपली कला सादर केली. कार्यक्रम खूप गाजला.
मात्र, ‘झनक झनक पायल बाजे’च्या यशात रमून न जाता १९५६ मध्ये 'राजकमल'ने ‘तुफान और दिया’ आणि ‘धरती की झंकार’ हे दोन चित्रपट काढले. ‘तुफान और दिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतारामांचे मोठे पुत्र प्रभातकुमार यांनी केले. या चित्रपटात मास्टर विनायक यांची मुलगी नंदा हिला अभिनयाची प्रथम संधी देण्यात आली. ‘धरती की झंकार’चे दिग्दर्शन ए. भास्करराव यांनी केले. दोन्ही चित्रपट चांगले चालले. ‘तुफान और दिया’ चित्रपटाला उत्कृष्ट गीतलेखनाचे, तर ‘धरती की झंकार’ला फिल्म प्रभागातर्फे सुवर्णपदक मिळाले.