व्ही शांताराम  : १९४२  - १९५७ 

१३. पडद्याच्या पलीकडले (२)

शांतारामांनी १९४२ मध्ये 'प्रभात' सोडली. परंतु मनाने 'प्रभात'पासून दूर जायला त्यांना फार कष्ट पडले. कित्येक दिवस 'प्रभात'मधला कोपरा न कोपरा, तिथे काम करणाऱ्या साध्या मजुराची आठवणसुद्धा शांतारामांना सतावत राही. चित्रसृष्टीमध्ये व्यवसाय करायचा तर मुंबईमध्ये असणे व्यावहारिकदृष्ट्या आवश्यक होते. शांताराम पुणे सोडून मुंबईमध्ये कायमच्या वास्तव्यासाठी आले. 

शांतारामांनी 'प्रभात' सोडली, तेव्हा जयश्रीबाई यांच्याबरोबर विवाह होऊन सहा महिनेच उलटले होते. जयश्रीबाईंना घेऊन ते मुंबईमध्ये राहू लागले. शांताराम आता ४२ वर्षांचे झाले होते. परंतु जयश्रीबाई त्यांच्यापेक्षा वयाने वीस-एक वर्षांनी लहान होत्या. शांताराम-जयश्रीबाई मुंबईला आले तेव्हा त्या गर्भवती होत्या. परंतु मुंबईला आल्यानंतर दुर्दैवाने त्यांचा गर्भपात झाला. 'राजकमल'च्या 'शकुंतला' या पहिल्या चित्रपटात जयश्रीबाईंनी नायिकेची भूमिका केली होती. त्याच सुमारास त्या पुन्हा गर्भवती राहिल्या. 'शकुंतला' चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच २६ जून १९४३ रोजी जयश्रीबाईंनी पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव किरणकुमार ठेवण्यात आले. त्यानंतर ८ ऑक्टोबर १९४४ आणि २० डिसेंबर १९४७ रोजी जयश्रीबाईंनी दोन मुलींना जन्म दिला. मोठी राजश्री तर लहान तेजश्री.

'राजकमल'ची सुरुवात झाली तेव्हा विमलाबाईंना तीन अपत्ये होती; प्रभातकुमार, सरोज आणि मधुरा. २९ मार्च १९४३ रोजी विमलाबाईंनी आणखी एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव चारुशीला ठेवण्यात आले. 'राजकमल'च्या स्थापनेनंतर विमलाबाई काही दिवस मुलांसह पुण्यात राहात होत्या. नंतर शांतारामांनी त्यांनाही मुंबईला बोलावून घेतले. प्रभातकुमारला शिक्षणासाठी आणि शिस्त लागावी म्हणून काही दिवस ग्वाल्हेर येथील मिलिटरी स्कूलमध्ये ठेवण्यात आले होते. 'शकुंतला' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सुमारास प्रभातकुमार विषमज्वर आणि न्यूमोनिया याने आजारी पडला. शांताराम-विमलाबाईंनी त्याला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. विमलाबाईंनी नाईलाजाने असो अथवा मनापासून असो; शांतारामांचा जयश्रीबाईंबरोबरचा विवाह मान्य केला होता. इतकेच काय तर 'शकुंतला' चित्रपटानंतर शांताराम आणि जयश्रीबाई अमेरिकेला गेले तेव्हा किरणकुमार चार वर्षांचा तर तर राजश्री अडीच वर्षांची होती. जयश्रीबाईंच्या अनुपस्थितीत विमलाबाईंनी मुलांकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारीदेखील स्वीकारली.

मास्टर विनायक यांचा १९ ऑगस्ट १९४७ रोजी वयाच्या ४१ व्या वर्षी मृत्यू झाला. मास्टर विनायक हे शांतारामांचे मावस भाऊ. त्यांच्या मृत्यूचे शांतारामांना अतोनात दुःख झाले. मास्टर विनायक त्यांचे केवळ मावस भाऊ नव्हते, तर त्यांनी अनेक चित्रपट एकत्र काढले होते. 'प्रभात' कंपनी कोल्हापूरहून पुण्याला आली, तेव्हा मास्टर विनायक 'प्रभात' सोडून गेले. परंतु नंतर 'राजकमल'च्या काळात ते पुन्हा शांतारामांबरोबर काम करू लागले होते. 'राजकमल' स्टुडिओमध्येच मास्टर विनायक 'राजकमल'च्या स्टुडिओमध्येच ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ या नावाने चित्रपट निर्मिती करत होते. शांताराम अमेरिकेला गेले तेव्हा मास्टर विनायक यांनी 'राजकमल'साठी ‘जीवनयात्रा’ चित्रपटाचे काम पाहिले होते. मास्टर विनायक यांनी ३१ चित्रपटांत अभिनय केला, तर २५ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. अभिनेत्री नंदा ही मास्टर विनायक यांची मुलगी होय.

शांताराम-विमलाबाई यांच्या घरात १९५३ मध्ये दोन शुभकार्ये झाली. मुलगी सरोज हिचा विवाह २३ फेब्रुवारी १९५३ रोजी सोराब इंजिनिअर  यांच्याशी झाला. सोराब हे मूळचे मराठी. त्यांना एका पारशी कुटुंबाने दत्तक घेतले होते. शांतारामांचा सर्वांत मोठा मुलगा प्रभातकुमार याचा विवाह १४ जुलै १९५३ रोजी उषा पाटोळे हिच्याशी करण्यात आला. शांतारामांनी प्रभातकुमार याला आपला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपट क्षेत्रात आणले. ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटाच्या प्रिंटिंगसाठी १९५५ मध्ये त्याला लंडनला पाठवण्यात आले. शांतारामांनी १९५६ मध्ये प्रभातकुमार यांना वयाच्या २७ व्या वर्षी ‘तुफान और दिया’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी दिली. चित्रपट चांगला चालला याचा शांतारामांना अतिशय आनंद झाला आणि आपल्या मुलाचा अभिमान वाटला. मास्टर विनायक यांच्यावरील प्रेमाचे द्योतक म्हणून त्यांनी मास्टर विनायक यांची कन्या नंदा हिला या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. 

'प्रभात'चे दिवाळे 

शांतारामांनी १९४२ मध्ये 'प्रभात' सोडली. शांतारामांशिवायही 'प्रभात' चांगले चित्रपट काढू शकते हे सिद्ध करण्यासाठी दामले-फत्तेलाल यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु 'प्रभात'मधील मतभेदातून राजा नेने, केशवराव भोळे, शांताराम आठवले इत्यादी जुने कलाकार 'प्रभात' सोडून गेले. त्यानंतर दामले आजारी पडले आणि १९४५ मध्ये कालवश झाले. त्यांच्या जागी त्यांचा मुलगा अनंत 'प्रभात'चे काम पाहू लागला. बाबूराव पै, अनंत दामले आणि फत्तेलाल या तिघांचे सीतारामपंत कुलकर्णी यांच्याशी जमत नव्हते. सीतारामपंतांनी 'प्रभात' सोडावी यासाठी फत्तेलाल यांनी शांतारामांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. शांतारामांच्या सल्ल्याने सीतारामपंत 'प्रभात'मधून बाहेर पडले. परंतु नंतर फत्तेलाल आणि बाबूराव पै यांच्यातही खटके उडत राहिले. अखेर  केळकर नामक व्यावसायिकाला 'प्रभात कंपनी' विकण्यात आली. स्टुडिओ भाड्याने देण्याच्या दृष्टीने त्यांनी 'प्रभात' विकत घेतली होती. 'प्रभात'च्या जुन्या चित्रपटाच्या फिल्म्स त्यांनी चेन्नईमधील एका व्यापाऱ्याला विकल्या. परंतु अनंत दामले यांनी कर्ज काढून त्या परत मिळवल्या. अखेर 'प्रभात कंपनी' दिवाळखोरीत निघाली आणि १३ ऑक्टोबर १९५३ रोजी बंद झाली. 'प्रभात'च्या स्टुडिओमध्ये फिल्म आणि टेलिव्हिजन यांचे तांत्रिक शिक्षण देण्याचे विद्यापीठ स्थापन झाले. 

विजया देशमुख उर्फ संध्या 

शांतारामांनी १९५१ मध्ये ‘अमरभूपाळी’ चित्रपट काढला. या चित्रपटासाठी संध्या यांना प्रमुख भूमिकेत घेण्यात आले. चित्रपट गाजला. त्यानंतर संध्या यांना इतर निर्मात्यांकडून अभिनयासाठी मागण्या येऊ लागल्या. संध्या यांनी त्या स्वीकाराव्या याबद्दल शांतारामांची कोणतीही हरकत नव्हती. परंतु 'राजकमल'बरोबर एकनिष्ठ राहून इतर कोणत्याही निर्मात्याबरोबर काम न करण्याचा निर्णय संध्या यांनी घेतला. त्यांची एकात्मता, कामातली सचोटी आणि 'राजकमल' बाबतची आपुलकी पाहून शांतारामांना संध्या यांचे मोठे कौतुक वाटले. त्यानंतर शांताराम यांच्या ‘परछाई’ आणि ‘तीन बत्ती और चार रास्ता’ या चित्रपटांत संध्या यांनी काम केले. एक कलाकार म्हणून संध्या यांचा शांताराम आदर करू लागले. संध्या यांना दागिन्यांचा हव्यास नव्हता. इतकेच नव्हे तर त्या नेहमी पांढरी सुती  साडी नेसत. संध्या यांच्या साधेपणाचेदेखील शांतारामांना कौतुक होते. 

‘झनक झनक पायल बाजे’ १९५५ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात संध्या यांनी नायिकेची भूमिका केली. या चित्रपटात संध्या यांनी नृत्याच्या केलेल्या तालमी, त्यांची जिद्द आणि कलेप्रतीची निष्ठा पाहून शांताराम थक्क झाले. चित्रपटाच्या शेवटच्या दृश्याच्या चित्रीकरणात संध्या यांच्या मणक्याला दुखापत झाली. पाठीच्या मणक्यांतील दोन चकत्या बाजूला सरकल्या. अनेक दिवस संध्या प्लास्टरमध्ये अंथरुणात होत्या. अखेर त्या चकत्या जागेवर आणण्यासाठी त्यांच्यावर अतिशय नाजूक अशी शस्त्रक्रिया करण्यात आली. संध्या यातून यशस्वीरीत्या बाहेर आल्या आणि चालू-फिरू लागल्या. परंतु त्यांना डॉक्टरांनी नृत्य न करण्याचा सल्ला दिला. संध्या यांच्या या परिस्थितीला काही अंशी 'राजकमल' जबाबदार आहे याची खंत शांतारामांना होती. त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शांतारामांनी तर केलाच, परंतु त्या हॉस्पिटलमध्ये असताना त्यांची विचारपूस करण्यासाठी ते सातत्याने जात असत.

संध्या यांच्याबरोबर शांतारामांची निर्माण झालेली जवळीक जयश्रीबाईंना मान्य नव्हती. ‘परछाई’ चित्रपटाच्यावेळीच संध्या यांना 'राजकमल'मधून काढून टाकावे, असा आग्रह त्यांनी शांतारामांकडे धरला होता. शांताराम यांच्या मते त्यांचे संध्या यांच्याशी केवळ व्यावसायिक संबंध होते आणि जयश्रीबाई इतर कोणाच्या सांगण्यावरून आपला ग्रह करत आहेत असे त्यांचे मत होते. अर्थातच व्यवसायात इतर कोणाची ढवळाढवळ त्यांना मान्य नव्हती. शांताराम आणि जयश्रीबाई यांच्यातला दुरावा दिवसेंदिवस वाढत गेला. जयश्रीबाईंनी सोडचिठ्ठीची मागणी केली. सर्व उपाय थकले आणि अखेर १३ नोव्हेंबर १९५६ रोजी शांताराम आणि जयश्रीबाईंचा घटस्फोट झाला. 

इकडे संध्या आजारातून पूर्ण उठू शकल्या नाहीत तर त्यांना आधार देणे ही आपली जबाबदारी आहे, अशी शांतारामांची धारणा होऊ लागली. जयश्रीबाई यांच्याबरोबरच्या घटस्फोटाने आलेली पोकळी संध्या यांनी भरून काढली. शांतारामांनी संध्या यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. २२ डिसेंबर १९५६ रोजी शांताराम आणि संध्या यांचा विवाह संपन्न झाला.