व्ही शांताराम : १९०१ - १९२९
२. जडणघडण
कोल्हापूरचे गोविंदराव टेंबे हे हार्मोनियम वादक म्हणून प्रसिद्ध होते. यांनी बालगंधर्व व गणपतराव बोडस यांच्याबरोबर 'गंधर्व नाटक मंडळी' या नावाची एक नाट्यसंस्था स्थापन केली होती. राजारामबापूंची त्यांच्याबरोबर चांगली ओळख होती. एके दिवशी राजारामबापूंनी गोविंदराव टेंबे यांच्यासमोर शांतारामला नकला करायला लावल्या. त्यांना त्या खूप आवडल्या. शांतारामला नाटक कंपनीत घालावे, असे त्यांनी सुचवले. राजारामबापूंनी त्याला नकार दिला. परंतु शांतारामला ती कल्पना खूप आवडली. त्याने नाटक कंपनीत जाण्याचा हट्टच धरला. अखेर नाइलाजाने राजारामबापू तयार झाले. शांतारामला घेऊन ते पुण्याला ‘गंधर्व नाटक मंडळी’त गेले. शांतारामला टेंबे यांच्या हवाली करून म्हणाले,
"हा शांताराम. तुमच्या सांगण्यावरून त्याला इथे आणलाय. आता तुम्हीच त्याला सांभाळा..."
‘गंधर्व नाटक मंडळी’
मोठ्या कष्टाने राजारामबापूंनी शांतारामचा निरोप घेतला आणि ते परत गेले. शांतारामच्या आयुष्यात आई-वडिलांपासून दूर राहण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. शांतारामच्या डोळ्यात पाणी तरळले. ते पाहून टेंबे यांनी त्याला जवळ घेतले आणि म्हणाले,
"अरे वेड्या रडतोस काय? इथे तुझ्या वयाची कितीतरी मुले आहेत. चल, तुला तुझी राहण्याची जागा दाखवतो."
सर्व मुलांची एकाच हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था होती. तिथेच शांतारामला एका बाजूला जागा देण्यात आली. ‘नाटक मंडळी’च्या वातावरणात मिसळण्याचा शांताराम प्रयत्न करू लागला. ‘गंधर्व नाटक मंडळी’मधली दिनचर्या तशी व्यग्र स्वरूपाची होती. सकाळी प्रातर्विधी आटोपून सर्व मुले नृत्य आणि गायनाची तालिम घेत. गायन शिकवण्यासाठी पंढरपूरकरबुवा होते. एक प्रसिद्ध गायक म्हणून त्यांचे नाव होते. शांतारामचा कल गायनाकडे फारसा नव्हता. त्याचा आवाज तयार नव्हता आणि गाणेही सुरात नसे. त्यामुळे मुले त्याची चेष्टा करत. नृत्यात मात्र शांताराम चांगली प्रगती करू लागला. ‘नाटक मंडळी’च्या दिनचर्येत शांताराम हळूहळू रुळला. इतर मुलांप्रमाणे धोतर नेसू लागला आणि केस वाढवू लागला.
सर्वांनी ‘मानापमान’ नाटक बसवण्याचे ठरवले. शांतारामला स्त्री-भूमिका देण्यात आली. चोळी-लुगडे नेसून स्टेजवर जाण्याची वेळ आली. स्त्री-पात्र करण्याची शांतारामची मानसिक तयारी नव्हती. ‘नाटक मंडळी’मध्ये येताना आपल्याला स्त्री-पात्र करावे लागेल हे त्याच्या स्वप्नातही नव्हते. त्याला रडूच कोसळले. परंतु काही इलाज नव्हता. बळेच शांताराम स्त्री-पात्राच्या भूमिकेत स्टेजवर गेला. ‘नाटक मंडळी’ने गावोगावी ‘मानापमान’चे प्रयोग केले. शांताराम प्रयोगांमध्ये काम करू लागला. परंतु त्याचे मन यात रमत नव्हते. टेंबे यांनी शांतारामला नाटक कंपनीमध्ये आणले होते. परंतु त्याला काय हवे नको याकडे त्यांचे फारसे लक्ष नव्हते. गणपतराव बोडसांचे काम मात्र शांतारामला आवडे. त्यांच्या अभिनयातून शांतारामला बरेच काही शिकायला मिळाले.
बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी ‘नाटक मंडळी’ला बडोद्याला बोलावून घेतले. ‘गंधर्व नाटक मंडळी’ला बडोद्याच्या सयाजीराव महाराजांकडून वार्षिक अनुदान मिळत असे. बडोद्याच्या ‘वाकानेर थिएटर’मध्ये खास महाराजांसाठी आणि राजघराण्यातील मंडळींसाठी मुद्दाम काही नाटकांचे प्रयोग ‘गंधर्व नाटक मंडळी’तर्फे होत असत. या मुक्कामातच महाराजांना अण्णासाहेब किर्लोस्करांचे 'शाकुंतल' नाटक बघण्याची इच्छा झाली. शाकुंतल नाटक बसवण्यात आले. त्यात दुष्यंत महाराजांचे काम गोविंदराव टेंबे यांनी केले. शांतारामला मात्र एक लहानशी भूमिका पार पाडावी लागली. बडोद्याच्या वास्तव्यात एक गोष्ट मात्र चांगली झाली. शांतारामला तोपर्यंत पगार मिळत नव्हता. ‘नाटक कंपनी’ने आता शांतारामला दरमहा तीन रुपये पगार निश्चित केला. शांतारामची ती पहिली कमाई!
याच सुमारास शांतारामचा संबंध प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांच्याबरोबर आला. गडकरी ‘गंधर्व नाटक कंपनी’साठी एक नवीन नाटक लिहिण्याकरता आले होते. गडकरींना मदतनीस म्हणून शांतारामची नेणूक झाली. गडकरींची कागदे नीट लावणे, धोब्याकडून कपडे आणणे, चहा, विड्या आणणे, पत्र नेऊन पोस्टात टाकणे अशी त्यांची लहानसहान कामे शांताराम करू लागला. परंतु गडकरी यांच्याबरोबरच्या सहवासात त्याला बरेच काही शिकता आले. थोड्याच दिवसात गडकरींच्या मनात त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली. जवळपासच्या माणसांवर मनःपूर्वक प्रेम करणे हा त्यांचा स्वभावधर्मच होता. शांतारामच्या ‘वणकुद्रे’ आडनावाबद्दल ते नेहमी सांगत,
“शांताराम, तुझे आडनाव थोडे विचित्र आहे. आपण त्याऐवजी दुसरे नाव ठेवू.”
दौरे करीत करीत कंपनीचा मुक्काम मुंबईला आला. त्या मुक्कामात ‘गंधर्व नाटक मंडळी’ची नाटके ‘एल्फिन्स्टन थिएटर’मध्ये होत होती. कंपनीने ‘संगीत सौभद्र’ सादर केले. शांतारामला रुक्मिणीच्या दासीचे काम मिळाले. काम लहानच असले तरी शांतारामला प्रेक्षकांच्या टाळ्या मिळाल्या. शांतारामचा आनंद गगनात मावेना. गावोगाव नाटके करीत कंपनी पुण्याला परत आली. शांतारामला कंपनीत येऊन एक वर्ष झाले होते. कंपनीने सर्वांना एक महिन्याची रजा दिली. सर्वजण आपापल्या गावी जाण्याची तयारी करू लागले. गडकरींचा निरोप घेऊन शांतारामदेखील कोल्हापूरला परतला.
पुन्हा कोल्हापूर
शांतारामला घरी आलेला पाहून सर्वांना आनंद झाला. शांतारामचे वाढलेले कुरळे केस आणि गोंडस रूप पाहून आईने त्याची दृष्ट काढली. पगारातून शिल्लक राहिलेले नऊ रुपये शांतारामने आईच्या हातावर ठेवले आणि तिच्या पाया पडला. मात्र, एकंदर ‘नाटक मंडळी’मध्ये आलेला अनुभव त्याला आवडला नव्हता. आपली गाण्यातली सुमार प्रगती, स्त्री-पात्र करण्याचा तिटकारा यामुळे कंपनीतला सहवास त्याला नकोसा होत होता. त्याने बापूंना सांगून आपले वाढलेले केस कापायला सांगितले आणि कंपनीत परत न जाण्याचा आपला निर्धार बोलून दाखवला. राजारामबापूंनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु शांतारामचा निर्धार पाहून त्यांनी फारसा आग्रह केला नाही.
शांतारामचा इंग्रजी हायस्कूलमध्ये पुन्हा दाखला घेण्यात आला आणि त्याचे शालेय शिक्षण पूर्ववत सुरू झाले. शांतारामला खेळांची आवड होती. सर्व मुले गावाबाहेरील माळावर संध्याकाळी खेळायला जात असत. अभ्यासाव्यतिरिक्त क्रिकेट, हॉकी, फुटबॉल अशा खेळांत शांताराम रमू लागला. शांतारामला पोहण्याचा खूप नाद लागला. कोल्हापूरला एक मोठा रंकाळा तलाव आहे. शांताराम संपूर्ण तलावाला एका दमात फेऱ्या मारू लागला. राजारामबापूंचे दुकान फार चालत नव्हते. घरात पैशाची कायम ओढाताण असे. अशा परिस्थितीत आपणही काहीतरी करून घर-प्रपंचाला हातभार लावावा असे वाटल्याने शांतारामने 'श्री व्यंकटेश्वर प्रेस' मध्ये ‘कंपोझिटर’ म्हणून काम सुरू केले. त्यातून येणाऱ्या पैशातून शांतारामच्या वह्या-पुस्तकांचा थोडाफार खर्च निघत असे.
याच काळात शांतारामला अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली. ‘इसापनीती’, ‘पंचतंत्र’, ‘ठकसेन’, ‘अरेबियन नाइट्स’सारखी लहान मुलांची पुस्तके त्यांनी वाचलीच; परंतु कोल्हापूरच्या 'नेटिव्ह लायब्ररी'चे सदस्यत्वदेखील घेतले आणि अनेक पूस्तके वाचून काढली. ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘भागवत’ अशी धार्मिक पूस्तके, विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे निबंध, टिळकांचे 'गीतारहस्य', हरी नारायण आपटे यांच्या स्फूर्तिदायक ऐतिहासिक कादंबऱ्या हे सारे साहित्य शांतारामने वाचून काढले. अच्युत बळवंत कोल्हटकरांचा 'संदेश' आणि लोकमान्य टिळकांचा 'केसरी' ही वर्तमानपत्रेदेखील तो नेमाने वाचत असे.
आनंदराव पेंटर आणि बाबूराव पेंटर यांनी कोल्हापूरमधील ‘शिवाजी थिएटर’चा कायापालट करून नावीन्यपूर्ण सिनेमागृहाची निर्मिती केली. त्याला ‘डेक्कन सिनेमा’ असे नाव देण्यात आले होते. येथे बरेच चित्रपट शांतारामने पाहिले. चित्रपट बघणे खरे तर राजारामबापूंना परवडण्यासारखे नव्हते. परंतु तरीही त्यांनी मुलांचे शक्य तितके लाड पुरवले. कोल्हापुरात ‘देवल क्लब’मध्ये संगीताचे कार्यक्रम होत असत. उस्ताद अल्लादिया खाँसाहेब, रहिमत खाँ, भास्करबुवा बखले, अब्दुल करीम खाँ, सवाई गंधर्व यांचे आणि इतर अनेकांचे गाण्याचे कार्यक्रम शांतारामने ऐकले आणि त्याच्या कानावर अभिजात संगीताचे संस्कार होऊ लागले. गोविंदराव टेंबे यांच्या हार्मोनियम वादनात आणि इतर काही कार्यक्रमांत स्टेजवर बसून तंबोऱ्यावर साथ देण्याचा योगदेखील शांतारामला आला. ‘देवल क्लब’मध्ये होणाऱ्या नाटकांमध्येदेखील लोक शांतारामला घेऊ लागले.
हुबळी येथे स्थलांतर
राजारामबापूंचे किराणामालाचे दुकान डबघाईला आले होते. गॅसबत्त्यांचा व्यवसायदेखील फारशी मिळकत देत नव्हता. काहीतरी दुसरे काम करणे आवश्यक होते. ‘डेक्कन सिनेमा’चे मालक वाशीकर यांनी राजारामबापूंना हुबळी येथील ‘डेक्कन सिनेमा’मध्ये हिशोब लिहिण्याच्या कामाला येता का, असे विचारले. राजारामबापू कायम स्वतःचा व्यवसाय करत आले होते. नोकरी करणे त्यांना अवघड होते. परंतु दुसरा उपाय दिसत नव्हता. त्यांनी नोकरी कबूल केली. किराणामालाचे दुकान विकले. आलेल्या पैशातून लोकांची थोडीफार देणी चुकती करून ते हुबळीला नोकरीसाठी गेले. मोठा भाऊ काशिनाथनेदेखील ‘डेक्कन सिनेमा’मध्ये नोकरी स्वीकारली. राजारामबापू आणि काशिनाथ या दोघांच्या पगारावर कुटुंबाचा खर्च भागू लागला. शांतारामची आईदेखील काबाडकष्ट करत होती. इतक्या अवघड परिस्थितीतही शांताराम आणि इतर भावंडांचे शिक्षण चालू होते.
शांताराम मॅट्रिकच्या वर्गात गेला. चाचणी परीक्षेत नापास झाल्याचे निमित्त होऊन शाळेने शांतारामला बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारली. शांतारामचे विद्यालयीन शिक्षण इथेच संपले. राजारामबापूंनी इतर कुटुंबालादेखील हुबळीला बोलावून घेतले. हुबळीमध्ये एका लहानशा घरात संपूर्ण कुटुंब राहू लागले. कुटुंब पुन्हा एकत्र आल्याचा सर्वांना आनंद झाला. शांतारामला रेल्वे वोर्कशॉपमध्ये फिटरची नोकरी चालून आली. घरची परिस्थिती ओळखून त्याने ती लगेच पत्करली. त्याला दररोज आठ आणे पगार मिळू लागला. सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत काम करावे लागे. दुपारी जेवणाची काय ती सुटी मिळे. शांतारामने मनापासून काम सुरू केले. कंपनीने त्याला पगारवाढ देऊ केली. परंतु त्याच्या नशिबात ही नोकरी फार काळ नव्हती. काम करत असताना शांतारामला अपघात झाला. त्याची शुद्ध हरपली. त्यातून तो ठीक झाला पण हाताची दोन बोटे कायमची वाकडी झाली.
‘डेक्कन सिनेमा’मध्ये राजारामबापू आणि काशिनाथ काम करत होते. शांतारामला ‘डोअर किपर’ म्हणून काम मिळाले. शांतारामला पगार मिळत नव्हता. परंतु चित्रपटगृहात लागलेले चित्रपट त्याला फुकट बघायला मिळत होते. शांतारामने ते काम आवडीने स्वीकारले. येथे शांतारामने ‘एडी पोलो’ वगैरे नटांचे स्टंट मूकचित्रपट पहिले. दादासाहेब फाळके यांचे 'लंकादहन', 'भस्मासुर-मोहिनी', 'कृष्णजन्म' हे चित्रपटसुद्धा पाहिले. 'हरिश्चंद्र' हा मूकपटही मोठ्या आवडीने पाहिला. या मूक चित्रपटांनी शांतारामला सिनेमा क्षेत्राकडे आकर्षित केले. याच वेळी ‘डेक्कन सिनेमा’समोर एका गृहस्थाने फोटोग्राफीचा स्टुडिओ आणि साइनबोर्ड पेंटिंगचे दुकान टाकले. शांतारामने त्यांच्याकडे फोटोग्राफी आणि दुकानाचे बोर्ड रंगवण्याचे काम सुरू केले. यात शांतारामचा छायाचित्रण या गोष्टीशी संबंध आला. फोटो काढणे, प्रिंट काढणे या सर्व गोष्टी तो हळूहळू शिकला.
दुर्दैवाने वाशीकर आणि राजारामबापू यांच्यामध्ये मतभेद झाले. राजारामबापू आणि काशिनाथ या दोघांनी ‘डेक्कन सिनेमा’ची नोकरी सोडली. एका आचाऱ्याच्या भागीदारीत त्यांनी हॉटेल चालू केले. परंतु तो आचारी फार काळ टिकला नाही. तो सोडून गेल्यानंतर शांतारामच्या आईनेच स्वयंपाकाचा ताबा घेतला. अतिशय कष्ट करून तिने हॉटेल चालू ठेवले. आईचे काबाडकष्ट पाहून शांताराम दुःखी होत असे. आपण घरात कोणतीही आर्थिक मदत करू शकत नाही याची त्याला खंत होती.
त्याच सुमारास शांतारामचा मावस भाऊ बाबूराव पेंढारकर हुबळीला आला. कोल्हापूरमध्ये बाबूराव पेंटर यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ चालू केली होती. तिथे तो ‘मॅनेजर’ म्हणून काम करत होता. ‘डेक्कन सिनेमा’मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीचा ‘सैरंध्री’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निमित्ताने तो हुबळीला आला होता. चित्रपट पाहून शांतारामच्या मनाने उचल खाल्ली. आपणही असे काही करावे, असे त्याला वाटू लागले. त्याने बाबूला विचारले,
“बाबू, मला तुझ्या फिल्म कंपनीत काही काम मिळेल का? फक्त एक वेळचे जेवण मिळाले तरी चालेल. मी कसलेही काम करीन.”
बाबूने तयारी दर्शवली,
“महाराष्ट्र फिल्म कंपनीत ये, मी तुझी बाबूराव पेंटर यांच्याशी गाठ घालून देतो.”
शांतारामने कोल्हापूरला जाण्याचा निश्चय केला. शांतारामचे संपूर्ण आयुष्य या संधीने बदलणार होते, हे त्याच्या स्वप्नातही नव्हते.