व्ही शांताराम : १९०१ - १९२९
३. चित्रपटक्षेत्रात पदार्पण
शांतारामला नोकरी नव्हती. आपला कुटुंबावर बोजा पडतो, ही खंत शांतारामला सतत होती. पडेल ते काम करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्याची धडपड होती. आई-वडिलांना हातभार नाही, तर निदान त्यांच्यावर ओझे तरी होऊ नये या निर्धाराने शांतारामने कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला. त्याने वडिलांसमोर हा विषय काढला. त्यांनी त्याचा निश्चय जाणला. हो-नाही न करता त्याला कोल्हापूरचे तिकीट काढून दिले आणि हातावर पंधरा रुपये ठेवले. ‘वडिलांकडून पैसे घेण्याची ही शेवटची वेळ’ हा निश्चय करून शांतारामने आई-वडिलांचा निरोप घेतला.
प्रसिद्ध तैलचित्रकार आणि शिल्पकार बाबूराव पेंटर यांनी १९१८ मध्ये ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली. पेंटर यांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मिस्त्री. चित्रकलेचे आणि शिल्पकलेचे प्राथमिक धडे त्यांनी कोल्हापूरमध्ये आपल्या वडिलांकडून घेतले. त्यानंतर केशवराव भोसले यांनी मुंबईमध्ये स्थापन केलेल्या ‘ललित कलादर्श नाटक मंडळी’ या संस्थेमध्ये काही वर्षे त्यांनी काम केले. नाटकांसाठी स्टेजच्या निर्मितीचे काम ही संस्था करत असे. किर्लोस्कर नाटक मंडळी, बालगंधर्व नाटक मंडळी आणि अनेक पारशी व गुजराती नाटकांच्या स्टेजच्या निर्मितीचा अनुभव बाबूरावांना यातून मिळाला. एक प्रसिद्ध तैलचित्रकार म्हणून ते या क्षेत्रात नावारूपाला आले. बाबूराव मिस्त्री आता बाबूराव पेंटर म्हणून ओळखले जाऊ लागले. या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या निर्धाराने ते कोल्हापूरला आले. कोल्हापूरमधील ‘शिवाजी थिएटर’च्या पुनर्निर्मितीचा प्रयोग काही दिवस केल्यानंतर बाबूरावांनी कोल्हापूरमध्येच ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली.
बाबूने शांतारामला ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त नेले. थिएटरच्या मागच्या बाजूला बाबूराव पेंटर यांची लहानशी खोली होती. बाबू शांतारामला त्या खोलीत घेऊन गेला. बाबूराव पेंटर एका कॅन्व्हास फ्रेमवर चित्र रंगवत होते. अंगरखा, धोतर, छातीवर रुळणारी लांब दाढी अशा रुबाबदार व्यक्तिमत्वाचे बाबूराव आपल्या कलेत मग्न होते. बाबूने ओळख करून दिली,
“हा माझा मावसभाऊ शांताराम. त्याला आपल्या कंपनीत कामाला राहायचे आहे. ”
बाबूरावांनी “हूं” म्हटले आणि मानेनेच होकार दिला. शांताराम आता ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त काम करणार होता. तो दिवस होता २० जून १९२०. वयाच्या विसाव्या वर्षी शांतारामचे चित्रपटक्षेत्रातले हे पहिले पाऊल होते. आजवर अनेक अपयश झेलत आलेल्या शांतारामला एक सुवर्णसंधी चालून आली होती. संधी मिळाल्याचा आनंद त्याच्या गगनात मावत नव्हता. मनात खोलवर दडलेला आत्मविश्वास त्याला सांगत होता, ‘या संधीचे मी सोने करणार!’
“चल, मी तुला सर्व कंपनी दाखवतो,”
बाबूच्या या वाक्याने शांताराम भानावर आला.
‘सैरंध्री’
शांताराम ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त रुजू झाला तेव्हा ‘सैरंध्री’ हा कंपनीचा पहिला चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. कंपनीचा हा चित्रपट अतिशय गाजला. स्वतः लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून या चित्रपटाची प्रशंसा केली. या चित्रपटात 'सैरंध्री'ची भूमिका गुलाबबाईंनी केली होती. स्त्री-पात्राची भूमिका स्त्रीनेच करण्याची ही पहिलीच वेळ होती. ‘सैरंध्री’च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या चित्रविश्वात नावारूपाला आली. यादरम्यान बाबूराव पेंटर यांनी अतिशय गुणी कलाकारांची फळी कंपनीमध्ये तयार केली होती.
बाबूराव पेंढारकर कंपनीचे मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांना कंपनीत मोठा मान होता. कंपनीची अंतर्गत व्यवस्था पाहणे, बाहेरील जगाशी पत्रव्यवहार करणे आणि इतर व्यवस्थापनाच्या बाबी बाबूरावांवर सोपवलेल्या होत्या. याशिवाय मूकपटात अभिनय आणि वेळोवेळी जे पडेल ते कामही ते करत. केशवराव धायबर हेदेखील पेंटर यांचे जवळचे सहकारी. केशवराव मूळचे कोल्हापूरजवळील कुरकली गावचे. अनेक सांसरिक अडचणींतून मार्ग काढत ते अखेर कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले होते. कोल्हापूरमध्ये असताना त्यांचा बाबूराव पेंटर यांच्याशी संबंध आला. महाराष्ट्र फिल्म कंपनी सुरू करताना पेंटर यांनी त्यांना कंपनीत घेतले.
विष्णुपंत दामले हे बाबूराव पेंटर यांना चित्रणात मदत करत. दामले हे मूळचे पेणचे रहिवासी. मुंबईमध्ये बाबूराव पेंटर यांच्याबरोबर स्टेजवरील रंगकामात त्यांचे सहकारी होते. दामले वयाने पेंटर यांच्या बरोबरीचेच होते. पेंटर कोल्हापुरला परत आले तेव्हा ते दामले यांना बरोबर घेऊन आले. फत्तेलालदेखील पेंटर यांना चित्रणात मदत करत. फत्तेलाल यांचे संपूर्ण नाव शेख फत्तेलाल यासिन मिस्त्री. फत्तेलाल मुळचे कोल्हापूरजवळील कागल या गावाचे. त्यांचे वडील मूर्तिकार होते. फत्तेलाल यांनी चित्रकला आणि मूर्तिकामाचे धडे आपल्या वडिलांकडूनच घेतले. पेंटर यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ स्थापन केल्यापासूनच ते त्यांच्याबरोबर जोडले गेले होते.
‘सैरंध्री’च्या चित्रणासाठी पेंटर यांनी स्वतःच एका कॅमेऱ्याची निर्मिती केली. हा कॅमेरा देशात तयार झालेला पहिला कॅमेरा ठरला. या कॅमेऱ्याच्या निर्मितीत पेंटर यांचे सहकारी दादा मिस्त्री हे होते. कॅमेऱ्याची जुळणी आणि दुरुस्ती हा त्यांचा विभाग होता. याशिवाय दत्तोबा गजबर, म्हैसकर मास्तर, नानासाहेब सरपोतदार, बाळासाहेब यादव इत्यादी सहकारी वेगवेगळ्या कलाक्षेत्रात गुंतलेले होते. केशवरावांच्या नातेवाईक तान्याबाई कागलकर यांनी पेंटर यांना कंपनी स्थापन करण्यासाठी लागणारे भांडवल पुरवले होते.
बाबूरावांनी शांतारामची सर्वांशी ओळख करून दिली. दादा मिस्त्री आणि त्यांचा कॅमेरा याबाबत शांतारामला विशेष आकर्षण वाटले. दत्तोबा गजबर, केशवराव धायबर यांच्याबाबत शांतारामला खूप आपुलकी निर्मण झाली. दामले आणि फत्तेलाल यांचे वागणे मात्र शांतारामला रुक्ष वाटले. बाबूरावांनी शांतारामला सर्व स्टुडिओ दाखवला. त्यातील विभाग आणि त्यांची कामे समजावून सांगितली आणि कंपनीत प्रगती करण्याचा एक कानमंत्र दिला,
“शांताराम, काय करू, कसे करू, कोणते काम करू, असे विचारत बसू नकोस. जे दिसेल ते, जे पडेल ते, जे काम तुला करता येण्याजोगे आहे ते काम तू करत जा.”
शांतारामला हा कानमंत्र रुचला. त्याने पडेल ते काम करायला सुरुवात केली.
‘सुरेखा हरण’
‘सैरंध्री’च्या यशानंतर कंपनीने ‘सुरेखा हरण’ हा सिनेमा काढण्याचे ठरवले. दामले, फत्तेलाल, नानासाहेब सरपोतदार, म्हैसकर मास्तर असे सारे कथानकावर चर्चा करू लागले. शांतारामदेखील या चर्चांना उपस्थित राहू लागला. त्याच्या उपस्थितीबद्दल कोणाचा आक्षेप नव्हता. तालीम सुरू झाल्यावर बाबूराव पेंटरदेखील येऊ लागले. शांतारामला ‘बालगंधर्व नाटक मंडळी’मधील तालमींचा अनुभव होता. त्यामुळे त्याला यात फारसे नावीन्य वाटत नव्हते. परंतु मूकपटाच्या तालमींत पाठांतराला फारसे महत्त्व नाही, हा एक महत्त्वाचा फरक शांतारामला जाणवला.
अखेर चित्रीकरणाच्या दृष्टीने तयारी सुरू झाली. देखावे तयार करण्याचे काम सुरू झाले. बाबूराव पेंटर चित्र काढत आणि त्याप्रमाणे देखावे तयार करण्याचे काम दामले व फत्तेलाल करत. शांताराम त्यांना मदत करू लागला. बाबूराव पेंटरांचा गडी सुटीवर गेला होता, त्याचे कामदेखील शांतारामने आनंदाने केले. चित्रपटाची पात्रयोजना निश्चित झाली. चित्रपटात शांतारामला प्रथम विष्णूची भूमिका मिळाली. नंतर कृष्णाच्या प्रमुख पात्रासाठीही शांतारामला घेण्यात आले. शांतारामचा आनंद गगनात मावेना. ‘सुरेखा हरण’ हा शांतारामच्या आयुष्यातील अभिनयासाठीचा पहिला चित्रपट ठरला. अर्थात, शांताराम तेवढ्याने समाधानी नव्हता. इतर कलाकारांच्या मेकअपमध्येदेखील त्याने मदत करायला सुरुवात केली. बाहेरील चित्रीकरणाची वेळ आली, तर जड कॅमेरा उचलून चित्रीकरणाच्या स्थळी नेण्याचे कामदेखील शांतारामने केले.
चित्रण पूर्ण झाल्यावर फिल्म धुण्याची वेळ आली. कंपनीत हे काम जाधव करत असत. शांताराम त्यांना मदत करू लागला. हे फार कष्टाचे काम होते. तरीदेखील शांताराम कुतूहलापोटी ते सारे आवडीने करत होता. एक साधा मजूर, रंगभूषा करणारा कारागीर, अभिनय करणारा कलाकार, रसायनशाळेतला मदतनीस अशा अनेक भूमिका शांताराम उत्साहाने पार पडत होता. चित्रपटाच्या संकलनाची वेळ होती. बाबूराव पेंटर स्वतः संकलन करू लागले. शांताराम संकलनाच्या वेळी जातीने हजर असे. पेंटर यांची संकलनाची पद्धत शांतारामच्या लक्षात येऊ लागली. शांताराम दृश्ये क्रमवार लावून ठेवू लागला. त्यामुळे बाबूराव पेंटर यांना संकलन करणे सोपे जाऊ लागले. लागणारा वेळ कमी झाला. बाबूराव पेंटर शांतारामवर खुश झाले. नंतर काही भाग संकलनासाठी त्यांनी शांतारामलाच देऊन टाकला.
‘सुरेखा हरण’च्या प्रदर्शनासाठी बाबूराव पेंटर आणि बाबूराव पेंढारकर दोघेही मुंबईला गेले. मुंबईला जाताना आपल्या पत्रव्यवहाराची जबाबदारी पेंढारकरांनी शांतारामला दिली. व्यवस्थापनाचा अनुभवदेखील शांतारामला मिळाला. यावेळी एक महत्त्वाची घटना घडली. पत्रव्यवहारावर सही करण्याचा विषय निघाला, तेव्हा बाबूराव पेंढारकर यांनी शांतारामला सुचवले,
“शांताराम, पत्रव्यवहारावर तूच सही कर. पण सर्वांना तुझ्या अडनावाचा नीट उच्चर करता येणार नाही. तेव्हा तू ‘व्ही शांताराम’ असेच नाव का लावत नाहीस?”
बाबूरावांचे म्हणणे शांतारामला पटले. शांतारामचे नाव बदलले. ‘शांताराम वणकुद्रे’ आता ‘व्ही शांताराम’ झाला.
‘सुरेखा हरण’ प्रदर्शित झाला आणि लोकांनी तो डोक्यावर घेतला. अनेक वर्तमानपत्रांनी चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले. ‘सुरेखा हरण’च्या अभूतपूर्व यशामुळे ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’चा सगळीकडे बोलबाला झाला. त्यानंतर कंपनीने ‘भक्त दामाजी’ हा चित्रपट काढला. शांतारामला यात मोठी भूमिका नव्हती. परंतु इतर विभागांचा त्याला पुरेसा अनुभव मिळाला. त्याच सुमारास कंपनीमध्ये आग लागली. त्यात कंपनीचे फार मोठे नुकसान झाले. कॅमेरा आणि इतर काही महत्त्वाची साधने मात्र वाचली. स्टुडिओ नव्याने उभारणे आवश्यक होते. कोल्हापूरचे श्रीमंत सरदार नेसरीकर यांनी कंपनीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ते भांडवल पुरवले आणि कंपनीचे काम पुन्हा रुळावर आले.