व्ही शांताराम  : १९२९  - १९४२ 

९. पडद्याच्या पलीकडले (१)

'प्रभात'ची कीर्ती दिवसेंदिवस वाढत होती. 'प्रभात'च्या स्वप्नपूर्तीत १९४१ साल उजाडले. 'प्रभात'चे बस्तान कोल्हापूरमधून पुण्याला येऊन आठ वर्षे झाली होती. पुण्यात 'प्रभात'च्या परिसरात कोल्हापूरहून आलेल्या कामगारांसाठी एक चाळ बांधण्यात आली. 'प्रभात'चे बोधहीन्ह असलेल्या पाट्या पुण्याच्या लकडी पुलापासून स्टुडिओपर्यंत लावण्यात आल्या होत्या. कुठून कुठून लोक स्टुडिओ पाहायला येत. त्यांच्यासाठी आठवड्यातून एक दिवस स्टुडिओ बघण्यासाठी खुला करून दिला जात असे. 'प्रभात' स्टुडिओसमोरील मोकळ्या जागेवर पाच भागीदारांसाठी पाच स्वतंत्र बंगले बांधले. शांताराम आणि विमलाबाई मुलांसह नवीन बंगल्यात राहू लागले. शांतारामांनी डेक्कन जिमखान्यावर आई-बापूंसाठी एक छोटासा बंगला बांधला. ज्या दिवशी आई-बापू त्या बंगल्यात राहायला गेले, त्या वेळचा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून शांतारामांना कृतकृत्य झाले. लहान भाऊ रामकृष्ण आणि सर्वांत धाकटा अवधूत या दोघांनाही शांतारामांनी प्रभातमध्ये घेतले. रामकृष्णला रसायनशाळेत घेतले आणि अवधूतला कॅमेऱ्याचे प्रशिक्षण दिले. 

घराकडे आणि विमलाबाईंकडे मात्र शांतारामांचे दुर्लक्ष होत होते. इतकेच नव्हे तर मुलांनादेखील ते पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. प्रभातकुमार १२ वर्षांचा तर सरोज १० वर्षांची झाली होती. पुण्यात आल्यानंतर ६ ऑगस्ट १९३७ रोजी दांपत्याला तिसरे अपत्य झाले. तिचे नाव मधुरा ठेवण्यात आले. मधुरादेखील ४ वर्षांची झाली होती. घर आणि मुलांना वाढवणे याची जबाबदारी  प्रामुख्याने विमलाबाईंनी घेतली होती. ‘माणूस’ चित्रपट निर्मितीत झालेल्या दगदगीनंतर डॉक्टरांनी शांतारामांना विश्रांतीचा सल्ला दिला. तेव्हा शांताराम कुटुंबाला घेऊन गिरसप्पाचा धबधबा पाहण्यासाठी गेले. कुटुंबाबरोबर काही काळ शांत वेळ घालवायला मिळाला. 'प्रभात'च्या जवळच पोहोण्याचा तलाव होता. शांताराम मुलांना घेऊन क्वचित पोहायला जात असत. १९४० मध्ये 'प्रभात' थिएटरच्या उदघाटनाला शांताराम विमलाबाईंना बरोबर घेऊन मद्रासला (आताचे चेन्नई) जाऊन आले.

शांतारामांचा लहान भाऊ रामकृष्ण 'प्रभात'च्या रसायनशाळेत काम करत होता. 'प्रभात' पुण्याला आल्यावर तो विभागप्रमुख झाला. कामाच्याबाबतीत रामकृष्ण अतिशय चोख होता. अतिशय शांत, कोणाच्या अध्यात ना मध्यात असा त्याचा स्वभाव होता. १९३९ मध्ये रामकृष्ण विषमज्वराने आजारी पडला. अनेक उपचार करूनदेखील तो आजारातून उठू शकला नाही. १५ जानेवारी १९३९ रोजी वयाच्या बत्तिसाव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. शांतारामांना या घटनेने अतिशय दुःख झाले. नियतीने कुटुंबावर अजून एक आघात केला. रामकृष्णच्या मृत्यूनंतर विमलाबाईंचा लहान भाऊ रामचंद्रदेखील आजारी पडला. विमलाबाईंचे लग्न झाले तेव्हा रामचंद्रदेखील शांतारामांच्या बरोबर राहू लागला होता. आला तेव्हा रामचंद्र जेमतेम ९ वर्षांचा होता. शांतारामांनी त्याला शिकवले आणि 'प्रभात'मध्येच नोकरीला ठेवले. त्याला क्षय झाल्याचे निदान करण्यात आले. उपचारासाठी त्याला मिरज येथे ठेवण्यात आले. विमलाबाई अधूनमधून मिरजला जात असत. रामचंद्रच्या आजारात उतार  पडला नाही. त्यातच त्याचा अंत झाला. शांताराम-विमलाबाई यांच्यासाठी तो फार मोठा आघात होता. 

भारतीय चित्रपट जगाचे भीष्म पितामह दादासाहेब फाळके यांच्याबद्दलची एक आठवण शांतारामांना कायम राहिली. एकदा शांतारामांना दादासाहेबांकडून, भेटून जाण्यासाठी निरोप आला. शांताराम तत्परतेने त्यांना भेटायला गेले. दादासाहेबांची परिस्थिती फार वाईट होती. पुण्यात एका झोपडीवजा खोलीत आपल्या कुटुंबासह ते राहत होते. दादासाहेबांची अवस्था पाहून शांतारामांचे मन भरून आले. दादासाहेबांना औषधोपचारासाठी पैशाची गरज होती. त्यांनी मोठ्या जड अंतःकरणाने शांतारामांना हे सांगितले. शांतारामांनी ताबडतोब त्या रकमेची व्यवस्था केली. भारतीय चित्रपटसृष्टीच्या निर्मात्याचा असा शेवट व्हावा, याचे शांतारामांना फार दुःख झाले. 

मोहाचे क्षण 

शांतारामांच्या कर्तृत्वाला साजेल असेच त्यांचे रूप होते. सावळी पण तेजस्वी मुद्रा, काळेभोर मोठे डोळे, भव्य कपाळ, कुरळे केस, सरळ नाक, स्वच्छ पांढरे कडक इस्त्रीचे कपडे आणि चालण्या-बोलण्यात उमदेपणा! त्यांचे कर्तृत्व आणि उमदे व्यक्तिमत्व स्त्रियांना सहज आकर्षित करत असे. यातून अनेक मोहाच्या क्षणांना शांतारामांना सामोरे जावे लागले. परंतु आपल्या ध्येयापासून विचलित न होता त्यांनी कायम आपल्या कामाला महत्त्व दिले. 

प्रभातच्या ‘गोपालकृष्ण’ या पहिल्याच चित्रपटाच्यावेळी एका दुय्यम नायिकेने शांतारामांना मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. तिच्या कृत्याने शांताराम संतापले. त्यांनी त्या नटीला चांगलेच खडसावले. नंतर ती नटी शांतारामांकडे आली आणि तिने माफी मागितली. शांतारामांना कपटाने जाळ्यात अडकवण्यासाठी इतर स्त्रियांनी तिला भरीस पाडल्याचे तिने सांगितले. शांताराम जर्मनीत असताना एक प्रसंग घडला. जर्मनीत असताना शांतारामांना जेनी नावाच्या तरुणीला मदतनीस म्हणून देण्यात आले. जेनी कामात प्रामाणिक होती. शांतारामांना मनापासून मदत करत असे. एकत्र काम करत असताना ती शांतारामांच्या प्रेमात पडली. शांतारामांचे लग्न झाले आहे, हे माहीत असूनही तिने शांतारामांशी लग्न करण्याची इच्छा दर्शवली. मोठ्या मुश्किलीने त्यांनी तिला समजावले आणि ते भारतात परत आले. असे आणि अजून काही मोहाचे क्षण समोर आले असतानादेखील शांतारामांचे मन आपल्या कामापासून विचलित झाले नाही. 


जयश्री कामुलकर

शांता आपटे १९३९ मध्ये 'प्रभात' सोडून गेल्या. ‘शेजारी’ चित्रपटासाठी १९४१ मध्ये जयश्री कामुलकर यांना घेण्यात आले. जयश्रीबाईंचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. थोड्याच दिवसांत 'प्रभात' समूहात त्या मिसळून गेल्या. ‘शेजारी’च्या चित्रीकरणाच्या काळात आलेल्या अनुभवांतून जयश्रीबाईंच्या लाघवी स्वभावाचे शांतारामांना कौतुक वाटले. थोड्याच दिवसांत जयश्रीबाई शांतारामांकडे आकर्षित झाल्या. शांतारामांना जयश्रीबाईंचा सहवास आवडे, परंतु कोणत्याही भावना त्यांच्या मनात नव्हत्या. अखेर जयश्रीबाईंनी एकेदिवशी शांतारामांना आपल्या मनातील भावना स्पष्ट केल्या. 

शांतारामांनी विषय टाळला, परंतु डोक्यातून गेला नाही. त्याच सुमारास 'प्रभात'मध्ये शांतारामांचे इतर भागीदारांबरोबर खटके उडत होते. 'प्रभात'मधील कामाबाबत शांताराम विमलाबाईंबरोबर फारशी चर्चा करीत नसत. जयश्रीबाईंबरोबर वेळ घालवण्याने त्यांचे मन यातून हलके होत असे. शांतारामांचे जयश्रीबाईंकडे जाणेयेणे वाढले. याची कुणकुण अर्थात विमलाबाईंना लागली. त्या दोघांमध्ये खटके उडू लागले. विमलाबाईच नव्हे, तर 'प्रभात'मध्येदेखील लोक बोलू लागले. शांतारामांनी बराच विचार केला. जयश्रीबाईंबरोबर नुसतेच राहणे हा त्यांच्यावर अन्याय होता. त्यांच्याशी लग्न करणे हा विमलाबाईंवर अन्याय होता. शांतारामांची कात्रीत सापडल्यासारखी अवस्था झाली.

अखेर शांतारामांनी निर्णय घेतला. मुंबईला जाऊन २२ ऑक्टोबर १९४१ रोजी त्यांनी जयश्रीबाईंबरोबर रीतसर विवाह केला. पुण्याला परत आल्यावर विमलाबाईंसमोर त्यांनी याची कबुली दिली. विमलाबाईंना हा आघात असह्य होता. आपण जयश्रीबाईंना न्याय देण्याच्या नादात विमलाबाईंवर फार मोठा अन्याय केला आहे, याची त्यांनी कबुली दिली. परंतु, “मी जयश्रीशी लग्न केले, तरी तुला जराही अंतर देणार नाही. तुला व मुलांना काही कमी पडू देणार नाही,” असे समजावण्याचा प्रयत्न केला. विमलाबाईंनी प्रथम खूप त्रागा केला; परंतु हळूहळू त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा निर्णय घेतला.

'प्रभात'मधील बेबनाव 

स्थापनेपासूनच 'प्रभात'मध्ये दामले आणि फत्तेलाल एकमेकांना धरून असत. केशवराव धायबर यांना शांतारामांनी 'प्रभात'मध्ये आणले होते. परंतु १९३६ मध्ये केशवरावांनी 'प्रभात' सोडली. त्यांच्याजागी शांतारामांच्या आग्रहाने १९३९ मध्ये बाबूराव पै यांना पाचवा भागीदार म्हणून घेण्यात आले. बाबूराव पै अतिशय व्यवहारी होते. आपल्या फायद्याचा विचार करूनच ते कोणताही निर्णय घेत असत. चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाशिवाय 'प्रभात'च्या दैनंदिन व्यवहाराचे काम शांतारामच बघत. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये 'प्रभात'ची ओळख नकळतपणे ‘शांतारामांची कंपनी’ असा केला जात असे. दामले-फत्तेलाल यांना शांतारामांचे वर्चस्व पसंत नव्हते. वेळोवेळी सभासदांनी यावर चर्चादेखील केली. 

'प्रभात'ने १९४१ मध्ये ‘संत सखू’ आणि ‘रामशास्त्री’ हे चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला. ‘संत सखू’चे दिग्दर्शन दामले-फत्तेदार यांनी केले. शांतारामांना या चित्रपटापासून दूर ठेवले. इतकेच नाही, तर शांताराम स्टुडिओमध्ये असूनही त्यांना चित्रणाच्या मुहूर्ताला बोलावणेदेखील पाठवले नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठीदेखील शांतारामांना बोलावले नाही. शांताराम-जयश्रीबाई यांच्या लग्नानंतर जयश्रीबाईंना 'प्रभात'मध्ये काम करता येणार नाही, असा युक्तिवाद दामले-फत्तेलाल यांनी मांडला. शांतारामांनी तो अर्थातच धुडकावून लावला. 

भागीदारांच्या संबंधातली अखेरची ठिणगी पडली ती ‘उमरखय्याम’ या चित्रपटाच्या निमित्ताने! हा चित्रपट काढण्याचा विचार शांतारामांच्या मनात आला. तो त्यांनी बोलून दाखवला. त्यावर दामले-फत्तेलाल यांनी आक्षेप घेतला. शांतारामांनी दामले-फत्तेलाल यांच्या परवानगीशिवाय कोणतेही चित्रपट काढू नयेत, असे शांतारामांना सांगण्यात आले. शांतारामांचा संताप अनावर झाला. 'प्रभात'मध्ये राजा नेने आणि केशवराव भोळे या दोघांची दामले-फत्तेलाल यांना फूस होती, याची शांतारामांना कल्पना होती. त्यांच्या जोरावरच या दोघांनी हे धाडस केले आहे हे शांतारामांना माहीत होते. 'प्रभात'ची व्यावहारिक बाजू शांताराम सांभाळत होते. या आपल्या अधिकारात त्यांनी राजा नेने आणि केशवराव भोळे यांना 'प्रभात' सोडण्याच्या नोटीसा दिल्या. परंतु दोघांनी ते मान्य केले नाही. ‘दामले-फत्तेलाल यांनी या नोटीसकडे दुर्लक्ष करून आपले काम चालू  ठेवा, असे सांगितले आहे,’ असे त्यांनी शांतारामांना उर्मटपणे सांगितले.

दामले-फत्तेलाल आणि शांताराम यांच्यातला दुरावा विकोपाला गेला होता. सीतारामबापू कुलकर्णी 'प्रभात'चे मूळ भांडवलदार होते. केवळ भांडवल गुंतवून ते थांबले नव्हते, तर रोजच्या कारभारात फारशी ढवळाढवळ न करता 'प्रभात'च्या प्रगतीसाठी कायम कार्यरत होते. ते अत्यंत व्यवहारदक्ष आणि शांत स्वभावाचे होते. परंतु त्यांना दामले यांनी 'प्रभात'मध्ये आणले होते. त्यांना शांतारामांबद्दल आदर होता, परंतु 'प्रभात'मध्ये त्यांना भरपूर मोबदला मिळाला होता आणि त्याचे श्रेय ते दामले यांना देत असत. दामले यांच्या विरोधात ते जातील ही अपेक्षा शांतारामांना नव्हती. त्यांनी बाबूराव पै यांच्याशी या विषयावर फोनवर बोलणी केली. बहुधा त्यांना या प्रकाराची कल्पना होती. त्यांनी शांतारामांना गुळमुळीत उत्तर दिले. शांतारामांनी काय जाणायचे ते जाणले. 'प्रभात' मध्ये ते एकाकी पडले होते. 

शांतारामांनी 'प्रभात'वर जिवापाड प्रेम केले होते. 'प्रभात' सोडून जाण्याची कल्पनादेखील त्यांना असह्य होत होती. परंतु हातावर हात धरून होणारा अपमान सहन करत बसणे त्यांना शक्य नव्हते. अखेर शांतारामांनी निर्णय घेतला; १३ एप्रिल १९४२ रोजी शांतारामांनी 'प्रभात' सोडली.